|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं. एक मेन हर्डल इतक्या सहजतेने पार पडले. जिना चढणे व उतरणे , प्लॅटफॉर्म चालणे हेच प्रामुख्याने कठीण गेलं असतं आईला. सुरवातीलाच इतकी अलगद सोय करून ‘दत्तगुरुनी तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठीशी आहे’ असा जणू संदेशच दिला. आम्ही दुसऱ्या दिवशी सामलकोटला 8 वाजता उतरणार होतो पण तिथे एक नंबर प्लॅटफॉर्म लाच गाडी येते आणि जिने चढ उतार करावी लागणार नाही असं स्मिता काकूंनी आधीच फोन वर आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे ह्या प्रवासातील मुख्य कठीण गोष्टी ज्याचा आईला त्रास होऊ शकतो त्या निकालात निघाल्या. २६-२७ तासांचा प्रवास होता. चला, २६ तासांची निश्चिंती झाली. आता छान ट्रेन प्रवासाचा आनंद आम्ही लुटणार होतो. दोघींनाही lower birth मिळाला होता त्यामुळे window seat होती. खूप छान सुरवात झाली प्रवासाची!
गाडी बरोबर ६.५५ ला निघाली. आमचा एक व्हॉट्स अप ग्रुप स्मिता काकूंनी आधीच केला होता. Personally कोणाला ओळखत नव्हतो पण ट्रेनचा ठाव ठिकाणाच्या updates मी ग्रुप वर टाकत राहिले. आम्ही B2 मध्ये होतो.पण ग्रुप मधील कोणी B2 मध्ये नव्हते. मग बोगी नंबर आणि कोच पोझिशन ग्रुपवर टाकले त्याप्रमाणे इतरांनी त्यांच्या बोगीचा अंदाज लावला. कल्याणला गाडी अगदीच 2 मिनिटे थांबली आणि आम्हाला कुर्ला टर्मिनसला चढण्याची बुद्धी दिली देवाने, त्याचे आभार मानले. सर्वांना चढायला जरा घाईच झाली असे नंतर त्यांच्या बोलण्यातून कळले. गाडी कर्जतपर्यंत अगदी व्यवस्थित गेली. मी आणि आईने दत्त बावनी ऐकली. ते ऐकून आमच्या मागच्या सिट्सवर बसलेले एक वयस्क जोडपे आमच्या इथे आले आणि त्यांनी विचारले पिठापूर – कुरवपूर यात्रा का? चला दोघांची ओळख झाली. मेघना काकू ( विद्वांस) आणि बळवंत काका. ते ही आमच्याबरोबरच यात्रेला होते. बळवंत काका हे संयोजिका स्मिता काकूंचे चुलत भाऊ आहेत असे कळले.
थोड्याच वेळात स्मिता काकू आम्हाला शोधत आल्या. प्रत्यक्षात आम्ही प्रथमच बघत होतो एकमेकांना. ओळख- पाळख झाली. चेहऱ्यावर प्रसन्नता आणि शांत – मृदू आवाज, खूपच आपुलकीने केलेली चौकशी हे सगळं इतकं positive vibes देणारं होतं की आईची तब्येत सांभाळून तिला दोन्ही दर्शन मिळावीत ह्याच जे टेन्शन होतं माझ्यावर ते गायब झालं.
त्या कुठल्या तरी दुसऱ्या डब्यात होत्या. सगळे मिळून 23 जण आहेत आणि B1 ते B5 असे विखुरले आहेत. असं कळलं.आणि त्या प्रत्येक डब्यात जाऊन सगळ्यांशी ओळख करून घेत होत्या आणि विचारपूस करत होत्या.
त्यांच्याबरोबर त्यांचा सहयोगी गुप्ताजी ह्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याही चेहऱ्यावर नेहमी एक आश्वासक हसू असायचं. जणू काही ‘तुम्ही काळजी करू नका. मी आहे!’ असं ते म्हणत आहेत असं वाटायचं आणि ते खरही ठरत होतं. काही अडचण आली किंवा बाहेर फिरताना चहाची वेळ झाली की आम्ही त्यांना ‘गुप्ताजीsss… चहाsss..’ अस म्हणालो की, लगेच पुढच्या 10 मिनिटात गाडी थांबलीच पाहिजे. ते सुध्धा बऱ्यापैकी चांगलं हॉटेल किंवा ढाबा बघून.असो, तर अशी ओळख पाळख झाल्यावर त्यांनी कर्जतला नाश्ता पाठवते अस सांगत निरोप घेतला. बराच वेळ आम्ही गाडी बाहेरची मजा बघत प्रवास करत होतो. भुकेची जाणीव होताच नजर आता वळवली आणि गुप्ताजी नाष्टा घेऊन हजर!दत्त म्हणून उभे रहाणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ ठायी ठायी जाणवत होता.
2 मऊ लुसलुशीत नीर डोसे आणि चटणी असा घरगुती चविष्ट नाष्टा मिळाला. आणि एक लहान पाण्याची बाटली. त्यांच्याशी बोलताना कळलं की डोंबिवली मध्ये एक जण घरगुती पदार्थ बनवून देतात. त्यांच्याकडून पहाटे ते आणून कल्याणलाच त्यांनी ते सगळं गाडीत चढवल होतं. त्यांच्या नियोजनाची खूप कमाल वाटली.
भरपेट नाष्टा, वर गरम गरम वाफाळता चहा घेऊन आम्ही घाटातली मजा लुटत होतो. सर्व काही सुरळीत चालू होतं. आमच्या शेजारी दोन 30-32 वयाची आंध्रची मुलं होती. ती आमच्या एक स्टेशन आधी उतरणार होती. आणि एक couple आणि त्यांची किशोरवयीन मुलगी होती. ते सोलापूरला उतरूनगाणगापूरला जाणार होते.
घाटातली मजा संपल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. लोणावळा आलं. तोपर्यंत गाडी इतकी सुपर फास्ट जात होती आणि अचानक लोणावळ्याला 15 मिनिटे halt. आता काय झालं? काही कळत नव्हतं. पुढे जवळपास प्रत्येक स्टेशनवर ती अशीच 5 ते 10 मिनिट थांबत पुढे सरकत होती. अशी रडत खडत गाडी शेवटी एकदाची पुणे स्टेशनला पोहोचली तेंव्हा दुपारचे 12.30 वाजले होते. 10-10.15 ला पोहोचणारी गाडी 2 ते 2.30 तास उशिराने पुण्याला पोहचली. तिथे श्री.घैसास सरांनी जेवण आणले होते. त्यांच्याशी आधी एकदा अरुताईमुळे माझे बोलणे झाले होते आणि त्यांनी मला तू एकटी जाऊ शकतेस काहीच प्रोब्लेम नाही असे सांगून, मला एकटीला जाव लागलं तर ओके ना? या माझ्या शंकेला पूर्ण विराम दिला होता. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी खाली उतरले. बोलणं झाल्यावर थोडं पुढे मस्त मोठ्ठे पेरू दिसले. पण नेमकी पर्स नव्हती म्हणून पैसे घ्यायला मी आत आले आणि गाडीने सिग्नल दिला. पेरू खायची इच्छा मारली जाणार म्हणून मी निराश झाले. पण तेवढ्यात गाणगापूरला जाणाऱ्या सद्गृहस्थनी तुम्हाला हवाय का पेरू.मी देतो आणून म्हणत पटकन खाली उतरून 2 पेरू आणून दिले. पळत पळतच ते गाडीत चढले. मग मेघना काकूंना 1 पेरू नेऊन दिला. आम्ही एक खाल्ला. तिथे कळले की लोणावळा ते पुणे दरम्यान सिग्नल केबलचा प्रोब्लेम होता म्हणून गाडी लेट झाली. Hope so, की आता पुढे नीट जाईल अशी आशा करत पुढचा प्रवास चालू झाला. लगेच गुप्ताजीनी जेवण आणून दिले. घरगुती सुंदर जेवण आणि ताक … अहाहा!
त्या दुपारच्या उन्हात, एसी डब्बा असूनही बाहेरचा रखरखाट डोळ्यांना अश्रांत करत होता. ते गोड ताक खूपच भावले. पण मोठ्ठा पेरु खाऊन आधीच पोट भरले होते. म्हणून आम्ही जेवणाचे एकच पॅकेट ऊघडलं. त्यातच दोघींचं झालं. एक पॅक तसाच होता.
हे कोणाला द्यावं असा विचार चालू असताना गाडी दौंड स्टेशनमध्ये शिरली. तिथे official halt नव्हता, पण ती स्टेशन वर होती. दोन्ही बाजुला प्लॅटफॉर्म नव्हता. प्लॅटफॉर्मवर उतरून कोणाला देता येईल का? असा विचार मनात होता. पण आता नाईलाज झाला. समोर प्लॅटफॉर्मवर एक गरजू दिसला पण तो खूप लांब होता. माझ्या बरोबर एक यात्रेकरू दारात उभा होता.त्याने विचारले, हे द्यायचे आहे का त्याला? सगळं बहुतेक करून खाणा-खुणानी. कारण तो पण आंध्रचा होता. मी हो म्हणाल्यावर तो खाली ट्रॅकवर उतरला. इकडे yellow signal चालू झाला. त्यामुळे त्याला फार पुढे जाता आले नाही. थोडं पुढे जाऊन एका स्वच्छ चौथऱ्यावर त्याने ते पाकीट ठेवले आणि खुणा केल्या. त्या माणसापर्यंत किती पोहोचल्या माहीत नाही पण आमच्या तर्फे आम्ही प्रयत्न केले हे एक समाधान घेऊन गाडी बरोबर आम्ही दौंड सोडले.
आता डोळ्यांवर झोपेचे साम्राज्य पसरले. मी वरती जाऊन मस्त पैकी एक झोप काढली. दुपारी 2-2.30 वाजता येणार सोलापूर 4-30 सुमारास आलं. तोपर्यंत एक छान झोप होऊन आम्ही चहा घेतला. मग पत्ते खेळणे, गाणी, भजने म्हणणे असं करत वेळ घालवणे चालू होते. अधे मध्ये भेळ घे, कॉफी पी. मधेच गुप्ताजीनी स्नॅक्स आणून दिले. वाडी जंक्शनला गुप्ताजिंनी चविष्ट जेवण आणून दिलं.
लाँग distance journey मध्ये खाणे आणि गाणे, दोन हमखास शस्त्रे आहेत वेळ घालवण्याची!
यथावकाश वाडी जंक्शन, कलबर्गी, विकाराबाद जंक्शन अशी एकेक ओळखीची स्टेशन्स भराभर मागे पडत होती आणि मन पीठापुर कडे धावत होतं.
— यशश्री पाटील
Leave a Reply