|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
योगायोग का अनुभूती?
मानवी बुद्धीच्या कुवती बाहेर एक विज्ञान आहे – अनेक अतिसूक्ष्म लहरींचे विज्ञान!
काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते. केवळ ते मी स्वतः अनुभवले म्हणून खरे म्हणायचे. त्या अनुभवांची सुसूत्रता निव्वळ योगायोग असेल, असं मानायला ही तयार होत नाही.
मानवाला माहीत असलेल्या लहरींच्या पलीकडे ह्या लहरी असाव्यात.मनातील गाभाऱ्यात खोल कुठेतरी त्याची पाळ मूळ असावीत. आणि एका सामायिक प्लॅटफॉर्मवर त्या एकमेकांशी communicate करत असाव्यात. ह्या पेक्षा जास्त ह्या गोष्टींचे विश्लेषण मी करू शकत नाही. तेवढी माझी कुवत नाही. ह्या अती सूक्ष्म लहरींच्या विज्ञानालाच तर अध्यात्म म्हणत नसावेत? कर्मकांड आणि अंधश्रद्धेची पुटं त्या विज्ञानाला झाकोळून टाकत असतील. परत श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा एक पूर्ण वेगळा विषय होतो. त्यात एक सूक्ष्म लाईन आहे. तो फरक ओळखता आला तर कदाचित आपण स्वच्छ नजरेने त्या विज्ञानाचा अभ्यास करू शकू.
असो! हे विषय खूप गहन आहेत आणि त्याचा अभ्यासही खूप खोलवर आहे. त्यामुळे त्याचे जास्त विवेचन न करता मी माझे अनुभव इथे सांगू इच्छिते. वाचकांनी ते निव्वळ योगायोग म्हणून वाचावेत किंवा अनुभूती म्हणून वाचावेत. हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे. माझ्यासाठी ते खूप positive energy देणारे आणि श्रद्धेची प्रचिती देणारे अनुभव आहेत.
— यशश्री पाटील
दर दोन दिवसातून एक भाग प्रदर्शित करीन. लिखाण पक्कं करणं चालू आहे. जशी गिरनार यात्रा लेखमाला आवडली, उपयोगी पडली तशीच ही देखील आवडेल अशी आशा आहे. शेवटी ही गुरूंची इच्छा आहे. मी फक्त निमित्त आहे.
Leave a Reply