नवीन लेखन...

पिठल…

महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात कधीही, केंव्हाही, अगदी कुठल्याही सुख दुःखात सदैव मदतीला धावून येणारा.. तत्पर असा हा एकमेव जिव्हाळ्याचा पदार्थ…

म्हणजे बघा एखाद्याच्या घरी मयत झाली असेल तर त्यांच्या दुखावट्यात अन्न म्हणून पिठल भात नेवुन देतात किंवा करतात….आणि दर गुरुवारी महाराजांना प्रसाद म्हणून पिठल्याचाच नैवैद्य करतात…

बेसन हा या पिठल्याचा आत्मा…

पिठल्याचा तसा विशेष तामझाम काही नसतो….

पण याच्या जातकुळी सर्व दूर पसरलेल्या..

नांदेड जवळच्या एका दुर्गम भागात खाल्लेल पिठल आणि तेच कोकणातल्या खेड्यात चाखलेले पिठल एकाच प्रकारे बनवल असल तरी चव मात्र वेगवेगळी असते..हे मी अनुभवलेय…

तसे हा सर्वसामान्य पदार्थ असला तरी घरच्या गृहिणीला कधीही पटकन मदतीला धावून येणारा..

तसे याचे भाऊबंद खुप…म्हणजे बघा…

कांद्याच पिठ पेरुन केलल पिठल…लसणाच्या फोडणीचे पिठल….गोळ्याचे पिठल…वड्या पडतील अस केलेल पिठल ….तव्यावरचे पिठल.. घोटीव पिठल …असे आणि कितीतरी प्रकार..

त्यातल्या त्यात म्हाळसाच्या हातच कांदा घालून केलेले घट्ट मऊ पिठल आणि मायानंदाच्या हातच वडया पाडून केलेले पिठल म्हणजे जिभेला पर्वणीच…

या कांद्याच्या मऊ घट्ट पिठल्यावर मस्त ताज़ी हिरवीगार कोथिंबीर पेरावी आणि त्यावर कच्च्या तेलाची चवी पुरती एक धार सोडावी…ते सगळ एकजीव करुन टम्म फुगलेल्या दुपदरी गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एक घास तोंडात टाकला आणि तो जिभेवर पोहोचला की ब्रम्हानंद टाळी लागलीच म्हणून समजा…

प्रत्यक्ष ब्रम्हादेवालाही दुर्लभ असा हा मेनू …

आणि त्या बरोबर तोंडी लावायला कांदा व हिरव्या मिरचीचा खरडा ( ठेचा नव्हे…खरडा वेगळा, ठेचा वेगळा…त्यावर एक स्वतंत्र लेख तयार आहे पण तो पुन्हा कधीतरी ) असेल तर खाणाऱ्याच्या दृष्टीने सुवर्ण कांचन योग…

हेच मऊ गरमागरम पिठल छान ताटात वाढून घ्याव …बाजूला वाफाळलेला पांढराशुभ्र भात असावा…या पिठल्यावर अर्धा चमचा कच्या तेलाची धार सोडावी…आणि थोड़ा भात थोड़ पिठल अस एकत्र कालवत… एकजीव करत हळूहळू आस्वाद घेत खाण्याची मजा नुसती अवर्णनीयच…

सगळ पिठल आणि सगळा भात भसकन एकत्र करून खाण म्हणजे त्या पिठल्याचा अनादर केल्यासारख…

खरी मजा अशी लावून लावून खाण्यातच…

याच पिठल्यातला एक प्रकार म्हणजे तव्यावरच हिरवी मिरची लसुन याची फोडणी देवून केलेल पिठल…असल चमचमीत आणि खुसखुशीत असत की विचारु नका…हे तव्यावरच पिठल खाताना अगदी सहज त्यात असलेला खरपुस लसुन जेंव्हा दाताखाली येतोना तेंव्हा ती जी काय चव असते… त्याच वर्णन शब्दात होवुच शकत नाही…

सहलीला जाताना नेहमी उपयोगी येणारा हा पिठल्याचा प्रकार….

या तव्यावरच्या पिठल्याचा मधला भाग खावून संपला की त्या तव्याचा गोलाकार कडेला जो खरपुस खमंग भाग असतो तो खरवडून खायला जी मजा आहे ती दुसऱ्या कशात नाही…

लहानपणी आम्हा भावंडाची त्यासाठी नेहमी भांडणे व्हायची…

अर्थात हे तव्यावरच अस्सल जातिवंत पिठल खाव ते आपल्या आई किंवा आज्जी कडूनच …त्यामागे त्यांचा चवीचा प्रदीर्घ अनुभव असतो..

आता हे पिठल तयार होत असताना ते तयार करणाऱ्या गृहिणीचा मूड पण फार महत्वाचा बर का…

रागात घोटून केलेले पिठल आणि प्रसन्न मनाने मन लावून घोटून केलेले पिठल या दोघांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक असतो…

तेंव्हा चविष्ट पिठल हवे असेल तर गृहलक्ष्मीचा मूड सांभाळला गेलाच पाहिजे…

कोकणात मिळते ते कुळीथाच पिठल …त्याची चव वेगळी…ते भाकरी बरोबर खाताना एक वेगळीच मजा येते.

नुसतच पिठल भात खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही पंचतारांकित पदार्थात नाही… आणि हो… हे पिठल आणि त्याचे प्रकार म्हणजे पिठल भात वगैरे कुठल्याही हॉटेलात विकतही मिळत नाही…

असो

कुलकर्ण्यांचा ” पिठलमय ” प्रशांत

Avatar
About Guest Author 524 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..