मला लहानपणापासून आठवतंय की, गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरु होतो.. त्यावेळी काही कळायचं नाही. नंतर त्या दिवसांत गावी असताना कळलं की, आपल्या आजी, आजोबा, पणजी, पणजोबा अशा सर्वांचं, त्यांच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध तर्पण केलं जातं. दुपारी बाराच्या आधी त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचं पान करुन ते घराच्या छपरावर कावळ्यासाठी ठेवलं जातं. एक पान गाईला दिलं जातं..
सदाशिव पेठेत असताना माझे आई-वडील, आजोबांच्या तिथीला हे न चुकता करायचे. नंतर आई-वडील गांवी गेले. दरवर्षी पितृपंधरवड्यातील त्या तिथीला आजी व आजोबांचं ते दोघेही तर्पण करीत होते..
दरम्यान बरीच वर्षे गेली. वृद्धापकाळाने ते दोघेही देवाघरी गेले. त्यामुळे आता आम्ही या पितृपंधरवड्यात त्या दोघांचं श्राद्ध तर्पण करु लागलो..
भारतीय संस्कृतीनुसार वर्षभरातून या पंधरवड्यात आपण आपल्या घरातील दिवंगत व्यक्तींच्या पवित्र स्मृतिंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, श्राद्ध तर्पण विधी करुन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करु शकतो. या विधीत गाय, कुत्रा व कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालून पितरांच्या आत्म्याला शांती लाभते असा समज आहे. पितृदोष लागू नये म्हणून हा विधी करणे आवश्यक असते.
या श्राद्धपक्षात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. आम्ही चित्रपटांच्या जाहिराती करताना अनेक वर्षे असे अनुभवले आहे की, या पंधरवड्यात कोणताही निर्माता नवीन चित्रपट प्रदर्शित करीत नसे. एखाद्याने धाडस करुन जर चित्रपट प्रदर्शित केलाच, तर तो अपयशी ठरत असे…
तसेच कोणत्याही नाटकाचा शुभारंभ या कालावधीत होत नसे. सहाजिकच त्यामुळे हा पंधरवडा पूर्ण शांततेत जात असे.
आपले आई-वडील, किंवा ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण वाढलो, त्यांची जाणीव ठेवण्यासाठी व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे विधी करणं अत्यावश्यक असतं.
जर आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले, त्यांना घरातून बाहेर काढून पीडा दिली. त्यांच्या पश्चात वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला, आपल्या भावंडांचा वाटा, त्यांना कपटीपणाने दिला नाही तर पितृदोष लागतो. तो एका पिढीपुरताच न राहता पिढ्यानपिढ्या तसाच रहातो..
पितृदोषामुळे व्यवसायात प्रगती होत नाही, घरात कलह राहतो, संपत्ती असूनही तिचा उपभोग घेता येत नाही, अनाठायी पैसा खर्च होतो, रात्री झोप लागत नाही, व्यसनाधीनता होते, संतती सौख्य लाभत नाही.. असे अनिष्ट परिणाम भोगावे लागतात..
आजच्या विधीच्या तयारीसाठी मी गेले दोन दिवस हव्या त्या गोष्टी बाजारातून घरी आणत होतो. आपण आहोत तोपर्यंत हे करणं आपलं कर्तव्य आहे.. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना हे कितपत जमेल, ही शंकाच आहे..
अजून तीस वर्षांनंतर, कदाचित असं घडू शकेल….
आम्ही दोघेही या पृथ्वीवर नसू.. माझ्या पुढच्या पिढीतील दोघांचीही साठी उलटलेली असेल.. साठी उलटलेले ते, मोठ्या फ्लॅटमधील एका खोलीत असतील.. त्यांचा मुलगा व सून या दिवसासाठी खास झोमॅटोकडून आॅनलाईन पितृपदार्थांचं पार्सल मागवतील. त्या एम्बाॅस केलेल्या प्लेटमध्ये या विधीसाठी लागणाऱ्या विविध भाज्या नाममात्र स्वरुपात असतील.. एक पुरी, एक भजी, एक बाॅबी, एक भाताची मूद, त्यावर कढी. मोबाईल किंवा लॅपटाॅपवरील आम्हा दोघांच्या फोटोपुढे ती प्लेट ठेवून नमस्कार करतील व नंतर बिल्डींगच्या चोवीसाव्या मजल्यावर असलेल्या टेरेसवर ती प्लेट ठेवली जाईल.. क्वचितच एखादा कावळा एवढ्या उंचीवर येऊन त्या प्लेटमधील पदार्थाला चोच लावेल.. आम्ही दोघेही लांबून, पाण्याच्या टाकीवरुन भरल्या डोळ्यांनी ते पहात असू…
‘कालाय तस्मै नमः’ असं मनात आणून व ‘सुखी रहा…’ असा त्यांना आशीर्वाद देऊन, पुढच्या वर्षीच्या पंधरवड्याचं लक्षात ठेवून एका वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा आकाशात भरारी घेऊ…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-९-२१.
Leave a Reply