नवीन लेखन...

प्लॅस्टिकचा शोध आणि बोध !

सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेच्या निमित्ताने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिकच्या कचऱ्याबाबत सादर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. देशात दररोज तब्बल १५ हजार ३४२ टन इतका प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो, त्यापैकी ४० टक्के प्लास्टिक कुठेही संकलित न होता निसर्गात पडून राहते. याचे प्रमाण आहे रोज सुमारे ६१३७ टन. अर्थातच त्यात सर्वाधिक भर घालतात दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई यांसारखी महानगरे. देशात २००० सालचा घनकचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी कायदा आणि २०११ सालचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अस्तित्वात आहे. त्यात कचऱ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे, तरीसुद्धा ही स्थिती आहे. या कचऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘ही आकडेवारी भीतीदायक आहे. याबाबत पावले टाकली नाहीत तर केवळ आपल्या पिढीलाच नव्हे तर पुढील कित्येक पिढय़ांना त्याचा उपद्रव सहन करावा लागेल.’ आता न्यायालयाने केंद्राला व सर्वच राज्यांना प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत माहिती पुढे येईल तेव्हा आणखी धक्के बसले तरी आश्चर्य वाटायला नको. मुळात आपल्याकडे कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जात नाही. बाजारात कोणतेही उत्पादन येताना त्याच्या कचऱ्याचे काय, याचा विचार होत नाही. त्यात उत्पादित मालाचा दोष काय?

गरज ही शोधाची जननी मनाली आहे. त्या वेळाची गरज, सुरक्षितता, मागणी आणि पुरवठ्याच्या तत्वानुसार माणसाला असा काहीतरी नवीन पदार्थ त्याकाळी हवा होता की त्याने वरील गोष्टींची गरज भागविली जाईल. विज्ञान-तंत्रज्ञान आणि संसाधनांची कमतरता असूनही काही शास्त्रज्ञांचा अथक प्रयत्न, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विशिष्ठ हवा असलेल्या पदार्थाचा शोध लावण्याचा प्रयत्न चालला होता. पुढील शतकात विविध टप्यांवर विविध नावांनी, गुणधर्मानी, आकारांनी त्याला प्लास्टिक संज्ञा मिळाली. त्याचाच इतिहास थोडक्यात पुढे पाहू.

वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक आहेत ज्याचा शोध लावला गेला आहे. पहिले प्लॅस्टिक १८५५ साली अलेक्झांडर पार्कने तयार केले आणि त्याला पार्कसाइन असे संबोधले गेले. पार्कसाइनला नंतर सेल्यूलिड असे म्हटले गेले. प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी विकास आणि तंत्रज्ञानात मोठा बदल झाला. प्लास्टिक हा शब्द ग्रीक ‘प्लास्टोस’ या शब्दापासून बनला आहे. प्लॅस्टिकला चांगला टिकाऊपणा आणि जुळवून घेण्याच्या क्षमता असल्याकारणाने वेगवेगळ्या आकारात उत्पादिती केले जाऊ शकते.

प्लॅस्टीक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमधून तयार केलं जातं. प्लास्टिकचे विविध प्रकार आहेत. प्लास्टिक बनवण्यासाठी सेल्युलोज (कापूस व लाकडापासून), स्टार्च (शेती उत्पादनातून), झाईन (मक्यातील प्रोटीन), केसिन (गाईच्या दुधापासून), एरंडेलतेल, लाख, रबर किंवा कधी कोळसाही वापरत. सेल्युलोज आधारित प्लास्टिक अलेक्झांडर पार्कस यांनी बनवले होते. बकायलाइट हे प्लास्टिकचे एक रूप आहे जे कृत्रिम पॉलिमर म्हणून तयार केले गेले होते आणि फिनोल व फॉर्मलाडायहाइडच्या मिश्रणापासून बनविले गेले होते.

पहिल्या महायुद्धा नंतर लगेचच, तांत्रिक नवकल्पनांनी रासायनिक तंत्रज्ञान आणि पोलिस्टीरीन (पीएस) आणि पॉलीविनायल क्लोराईड (पीव्हीसी) सारख्या नवीन प्रकारच्या प्लास्टिकची निर्मिती जर्मनीने केली. इतर प्रकारच्या प्लास्टिकमध्ये नायलॉन, सिंथेटिकरबर आणि रबरचा समावेश आहे.

शास्त्रज्ञ लिओ हेंड्रिक बेकलॅंडचा जन्म बेल्जियम देशातील घेन्त या शहरात १४ नोव्हेंबर १८६३ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. मोटार उद्योगात क्रांती घडवून आणणा-या हेन्री फोर्डचा जन्मही याच वर्षातला. बेकलॅंडचा पिता अशिक्षित आणि पादत्राणे बनवत असे आणि त्याची आई एक मोलकरीण म्हणून काम करत असे. बेकलॅंडला तरुणपणी बेन्जामिन फ्रॅंकलिनचे आत्मचरित्र वाचून आपण काही तरी नवीन करावे अशी प्रेरणा निर्माण झाली. एक यशस्वी व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि थोर नेता अशी बेन्जामिनची उदात्त प्रतिमा होती. त्याचा युवा लिओवर मोठा परिणाम झाला. लिओच्या आईने आपल्या बुद्धिमान आणि कष्टाळू पुत्राला आपले स्वप्न पूर्ण करण्यास उत्तेजन दिले. घेन्त विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर लिओ बेकलॅंडला रसायनशास्त्र व छायाचित्रण यांविषयी कमालीची आवड निर्माण झाली. त्याने आपल्या आवडीच्या विषयाचा इतका कसोशीने अभ्यास केला, की वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याला डॉक्टरेट मिळाली.

१९०७ मध्ये लिओ हेंड्रिक्स बेकलॅंड हा रसायनशास्त्रातील तज्ञ योन्कार्स न्यूयॉर्क येथील आपल्या खासगी रासायनिक प्रयोगशाळेत काम करत होता. त्या काळात विद्युत उद्योग अगदी जोरदार चालला होता. त्यात शेलॅक हे विद्युत निरोधक इन्शुलेटिंग मटेरीअल वापरले जात असे. त्याला पर्यायी मटेरीअल शोधून काढण्यात लिओ मग्न होता. शेलॅक हे मटेरीअल बनवण्यासाठी दक्षिण मध्य आशियातील झाडांवर परोपजीवी म्हणून राहणा-या कीटकांच्या स्रारावर प्रक्रिया करावी लागे आणि यासाठी अमेरिकन लोक वर्षाकाठी पाच कोटी पौंड शेलॅक आयात करत असत.

ब्रिटीश शास्त्रज्ञ मायकेल फेरेडे यांनी असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक (मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता.

१८६२ साली अलेक्झांडर पार्कस् याने लंडनमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सेल्युलोज नायट्रेट व कापूर मिसळून पहिले कृत्रिम प्लास्टिक बनवले. त्यापासून त्याने चाकू, सुऱ्यांच्या मुठी, बटणे, कंगवे, टाक, पेन्सिलीची टोपणे वगरे वस्तू बनवल्या. या प्लास्टिकला त्याने ‘पार्कसाइन’ असे नाव दिले.

१८९७ साली डब्ल्यू क्रिशे याने दुधाच्या प्रोटीनपासून प्लास्टिक बनवले. त्याला ‘केसिन प्लास्टिक’ म्हणत. त्यापासून त्याने सुऱ्यांच्या मुठी, छत्र्यांचे दांडे बटणे, कंगवे इत्यादी वस्तू बनवल्या. आणि या वस्तू ज्वलनशीलही नव्हत्या. अ‍ॅडोल्फ स्पिटलर यांना असे आढळून आले की केसिन प्लास्टिकपासून बनवलेले तक्ते फॉर्मल्डिहाइडच्या द्रावात बुचकळले तर त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या केसिन प्लास्टिकचा उपयोग केसिन अ‍ॅडेसिव्ह बनवण्यासाठी करता येऊ लागला.

अ‍ॅडोल्फ बायर यांचे संशोधन पुढे बेकलंड या शास्त्रज्ञाने चालू ठेवले व फिनोल आणि फॉर्मल्डिहाइड रेझिन्स बनवले. त्यांना पुढे बेकलाइट असे म्हटले गेले. १९२४ साली स्टाउडिंगरने प्लास्टिक व रबर ही लांब साखळी असलेल्या रेणूंपासून बनलेली असतात, असे सिद्ध केले. स्टाउडिंगरला या शास्त्रज्ञाला पुढे रसायनशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळाले.

१९२७ साली पीव्हीसी आणि सेल्युलोज अ‍ॅसिटेट, तर १९२८ साली अ‍ॅक्रिलिकचा शोध लागला. अ‍ॅक्रिलिकचा वापर लढाऊ विमानांच्या खिडक्यांच्या काचा आणि विमानातील कॉकपीट बनवण्यासाठी करतात. १९२९ साली युरिया फोर्मल्डिहाइड व १९३० साली पॉलिस्टायरीनचे उत्पादन सुरू झाले. द्युपोंड कंपनीतील शास्त्रज्ञांनी नायलॉन ६६ या प्लास्टिकच्या धाग्याचा शोध लावला. १९३६ साली पॉलिक्रिलोनायट्रील स्टायरीन, अ‍ॅक्रिलोनायट्रील व पॉलिव्हिनल अ‍ॅसिटेट यांचा उगम झाला. तर १९५२ साली झिग्लरने पॉलिथिलीनचा शोध लावला.

१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये अ‍ॅलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअ‍ॅसिटलचा आणि १९५७ साली बहुगुणी पॉलिकार्बोनेटचा उदय झाला. १९६५ ते १९८५ या २० वर्षांत इंजिनीयिरग प्लास्टिकचा उदय झाला. यात पॉलिसल्फोनस, पॉलिमिथाइल पेंटिन, पॉलिथिलीन टेरेथेलेट, अ‍ॅरोमेटिक पॉलिएस्टर्स, पॉलिइथर, इथर किटोन्स, द्रव स्फटिकरूप पॉलिमर्स इत्यादींचा समावेश आहे.

हाय डेन्सिटी पॉलिथिलीन हे लो डेन्सिटी पॉलिथिलीनपेक्षा गुणधर्मात सरस असते. यात ताण आणि दाब सामर्थ्य अधिकच्या तापमानाला टिकून राहण्याची क्षमता हे ते गुणधर्म आहेत. सोसायटींच्या गच्चीवर ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्या हाय डेन्सिटी पॉलिथिलीनपासून बनवलेल्या असतात. या टाक्या खूप जाड असतात व त्या वर्षांनुवष्रे टिकतात. त्या सतत उन्हात असल्या तरी उन्हाने तडकत नाहीत.

अश्या प्रकारे प्लास्टिक जन्माला आलं पण त्याचा काही दोष नाही तर तो आपला आहे. आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या प्लास्टीकचा आपण आपल्या दैनदिन जीवनात चांगला उपयोग करून घेत आहोत हे वरील माहितीतून समजले. पण आपला आळस, बेशिस्तपणा, कुठेही, कधीही, केंव्हाही रत्यात, ट्रेनमध्ये गुटका, पान खाऊन थुंकण्याची, समुद्र व नदीत प्लास्टिक कचरा टाकण्याची वाईट सवयी निसर्ग साखळीचा आणि पर्यावरणाचा बिकट प्रश्न निर्माण करीत आहे, त्याला काळिमा लावत आहे. आधी समस्या उभी राहू द्यायची आणि मग उपाय शोधत फिरायचे, हा जणू आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला आहे. विशेषत: पर्यावरणीय समस्यांमध्ये तर ही बाब प्रकर्षांने जाणवते.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..