‘ओम जय जगदीश हरे’ सारखे अजरामर गीत गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४२ रोजी झाला.
श्यामा चित्तार यांचा ‘अनाग्रही स्वरमुग्धा’ असा त्यांचा उल्लेख केला जायचा. आपले काम नेटाने करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा ही वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली.
श्यामा चित्तार यांनी मोजकीच पण लक्षात राहणारी गाणी गायली.
श्यामा चित्तार या सुमन कल्याणपूर यांच्या कनिष्ठ भगिनी. गाण्याचे सुरुवातीचे संस्कार त्यांना आईकडूनच मिळाले. तर प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण महाराष्ट्र संगीत विद्यालयाच्या बाबूराव गोखले यांच्याकडे झाले. त्यानंतर उस्ताद अब्दुल रहमान खान, केशवराव भोळे आदींकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. उर्दूचे उच्चार आणि लिखाण यासाठी त्यांनी इसाक पटेल यांचे मार्गदर्शन घेतले. गणेशोत्सव, शाळा-कॉलेजातील स्पर्धांपासून गाण्याच्या स्पर्धांत पारितोषिके पटकावणाऱ्या श्यामाबाई गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या.
संगीतकार सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पहिले गाणे ध्वनिमुदित केले. त्यानंतर बालगायिका म्हणून त्यांनी देवघर, देवाघरचे लेणे, गजगौरी आदी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले. त्या आकाशवाणीच्या ‘ए’ ग्रेडच्या गायिका होत्या. मराठी आणि हिंदीबरोबरच कोकणी, कन्नड, गुजराती, डोगरी, सिंधी, भोजपुरी भाषांमध्येही त्यांनी गाणी ध्वनिमुदित केली.
७० आणि ८० च्या दशकात त्यांनी मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, मन्ना डे यांच्यापासून कुमार सानू, उदीत नारायणपर्यंतच्या पार्श्वगायकांसोबत गाणी गायली. मराठी गायक-गायिकांच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांचे मार्गदर्शनही श्यामाबाईंना लाभले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे संत ज्ञानेश्वर, शोर, खिलौना, रोशन यांच्याकडे दूध का चाँद, कल्याणजी आनंदजीच्या पूरब और पश्चिममधील लोकप्रिय ‘ओम जय जगदीश हरे’ यांच्याबरोबरच उषा खन्ना, वसंत देसाई, एस. ए. त्रिपाठी यांच्या सिनेमांत त्यांनी गाणी गायली. अगदी अलीकडे त्यांनी संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात नवरात्रीची गाणीही गायली.
हेमंत कुमारांसोबत ‘दर्यावरी रे’ही कोळीगीतांची ध्वनिमुदिका, शांक-नील यांची प्रभात गीते, एन. दत्तांची गोकुळ गीते, प्रिया तेंडुलकर यांच्या ‘इमारत’ या मालिकेचे शीर्षकगीत यासोबतच, भजन, अभंग, गझल यांच्या रेकॉर्ड्स, एचएमव्ही, ओरिएंटल मेलडीज, प्राइम टाइमने काढल्या. या प्रवासात त्यांना सूरसिंगार संसद हा सन्मान लाभला. देशभर सर्वत्र त्या खाजगी कार्यक्रमांसाठी फिरल्या. पूरब और पश्चिम, शोर, संत ज्ञानेश्वर, खिलौना, दूज का चांद आदी हिंदी चित्रपटांसह, चैत्र पुनव, इये मराठीचिये नगरी आदी मराठी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
मराठी, हिंदीसह कोंकणी, कन्नड, गुजराती, डोंगरी, सिंधी आणि भोजपुरी भाषेतही त्यांनी गाणी गायली.
श्यामा चित्तार यांचे २० डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
श्यामा चित्तार यांनी गायलेली काही गाणी
थांब रे
देव माझा विठु सावळा
दर्यावरी रं तरली होरी
जीवन चलने का
सुख उभे माझीया द्वारी
ओम जय जगदीश हरे
Leave a Reply