शतायु श्री. नारायण वासुदेव गोखले (दर्यापूर) उपाख्य नाना गोखले यांच्या शतकोत्तर ४थ्या वाढदिवसाचे निमित्य साधून, त्यांच्या ‘श्रीमद्भगवद्गीतेचे दोन भाष्यकार शंकराचार्य व ज्ञानेश्वर’, आणि त्यांचे सुपुत्र आचार्याचार्य विवेक गोखले यांच्या, ‘साहित्याच्या कलास्वरूपाचे दोन भाष्यकार मर्ढेकर व करंदीकर’ या दोन ग्रंथांच्या प्रकाशनाचा सोहळा मान्यवर श्री. म.गो. वैद्य यांचे अध्यक्षते खाली दि.३ जून,२०१४ रोजी नागपूर येथे काही मोजक्याच, साहित्याशी परिचितांच्या उपस्थितीत, संपन्न झाला. त्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य या मूढमतीला आचार्याचार्यांचा बाल-मित्र म्हणून लाभले.
दोन्ही विषय हे मूढमतीच्या आकलना पलीकडचे होते. मंचावरील उपस्थित, सहित्य व कला या विषयांचे गाढे अभ्यासक व तत्ववेत्ते, यांनी दोन्ही ग्रंथांतील गंभीर विषयांवरील त्यांचे विचार, आपापल्या प्रज्ञे नुसार पुरेशा गांभीर्याने श्रोत्यांसामोर मांडले. या विचार मंथनाचे नवनीत किती उपस्थितांनी चाखले याची कल्पना नाही पण ज्यांना या मंथनाने गरगरायला लागले त्या पैकी हा मूढमती एक होता हे निश्चित. मात्र समारोपा नंतरच्या अल्पोपहाराच्या रुचकर पदार्थांचा या मूढमतीने यथास्थित आस्वाद घेतला आणि भरल्यापोटी व रिकाम्या डोक्याने घरी परतून झोपला.
मूढमती जरी झोपला तरी समारंभातील मान्यवर विदुषींच्या घणाघाती वक्तृत्वाचे आघात, कर्ण-रंध्रा द्वारे मश्तीस्कात शिरून त्याच्या स्मृती-पटलावर कोठेतरी तरंगत होते. ते मूढमतीस स्वस्थ झोपू देईना. त्याने थेट कविवर्य मर्ढेकर व विंदा करंदीकर यांचेशीच संपर्क साधावयाचे ठरविले.
परलोकीच्या या साहित्यकार द्वयीला इह-लोकातून संपर्काचे कल्पनाशक्ती हेच एकमेव माध्यम उपलब्ध असल्याने, त्यांच्या मुलाखतीची वेळ ठरविण्यासाठी, कल्पनेच्या माध्यमातून या मूढमतीने त्यांचेशी संपर्क साधला. आचार्याचार्यांनी, मर्ढेकर-करंदीकर या द्वयींच्या साहित्यावर लिहिलेल्या प्रबंधाबद्दल,या मूढमतीने त्यांना थोडक्यात माहिती दिली. त्या विषयावर त्यांचे विचार जाणण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.
दोन्ही महानुभवांना मी सांगितलेली माहिती ऐकून आश्चर्याचा गोड धक्का बसल्याचे जाणवले. पुढे कधी काळी आपल्या कार्याची दखल घेऊन त्यांचे कार्य वाद-विवादाचा व संशोधनाचा विषय ठरेल आणि त्यावर मोठ- मोठे प्रबंध लिहिल्या जातील असा विचार त्यांचे हयातीत, स्वप्नात देखील आला नव्हता. नाही म्हणायला विंदा करंदीकरांना तसा धोडासा अंदाज असावा असे वाटले.
कविवर्य बा. सी. मर्ढेकरांनी लगेचच वेळ दिली तर विंदांनी त्यांच्या लिखाणा बद्दल त्या दिवशी त्यांचा सन्मान समारंभ असल्याचे निमित्य पुढे करून नंतर फोन करून वेळ ठरवून घेण्यास सांगितले. त्यामुळे त्यांची मुलाखत घेता आली नाही.
मूढमती ठरल्या वेळी मर्ढेकरांना भेटण्यास गेला. कविवर्यांनी चिंतातूर चेहऱ्याने मूढमतीचे स्वागत केले. मूढमतीने त्यांच्या चिंतेचे कारण विचारले.
कविवर्यांनी भू लोकातून त्यांचे नावे आलेले समन्स दाखविले. त्यांच्या “ मी एक नेता, तू एक नेता, हा एक नेता, तो एक नेता” व “नरकात जागा नुरली आता” या नुकत्याच केलेल्या काव्याचे कोण्या नतद्रष्टाने ‘स्टिंग’ ऑपरेशन करून भू लोकी पाठविले होते. त्या मुळे भू लोकीच्या भारत देशात भूचाळ आला. कावलेल्या राजकारण्यांपैकी कोण्या एकाने त्यांचेवर, नसलेल्या अब्रू-नुकसानीचा खटला भरला होता.
मूढमती: मग आता?
कविवर्य: बघू आता. नाहीतरी मला याची सवय आहेच. नुकताच एक जेष्ठ नेता या लोकी आला आहे व त्यांचा भारत देशात चांगलाच वशिला आहे असे ऐकिवात आहे. त्याच्या मते भारतात आता ‘अच्छे- दिन’ आले आहेत. निघेल काहीतरी मार्ग.
मूढमती: साहित्य प्रकारात, आपल्या नंतरच्या काळात प्रसिद्ध पावलेल्या, व पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या कविश्रेष्ठ विंदा करंदीकर या लेखक, कवी व सहित्यकारांनी, आपण निर्मिलेल्या साहित्याचा सखोल अभ्यासा नंतर, आपण साहित्यात मांडलेल्या ‘अभिरौचिकीय’ विचाराशी (इस्थेटिक्स) मत-भिन्नता दाखवली. साहित्याची प्रकृती इतर कालाकृतींपेक्षा वेगळी असली तरी त्या सर्व कला, ललित-कला या एकाच वर्गात मोडतात ह्या आपल्या मताला विरोध दर्शवत, विंदा करंदीकरांनी सहित्य ही ललितकला नव्हेच, ती एक ‘जीवन-वेधी’ कला असल्याचे मत मांडले. त्यांच्या या साहित्या संबंधीच्या मतांतराने साहित्याच्या कला स्वरूपा विषयी अभ्यासकांमध्ये दोन विचार-धारा निर्माण झाल्या. या पैकी कोणती विचारधारा जास्त संयुक्तिक आहे या बद्दल सांप्रतच्या साहित्यिकांमध्ये व अभ्यासकांमध्ये भ्रांत आहे.
आपल्या व कविश्रेष्ठ विंदा मधील साहित्य-सौन्दर्यातील साम्य व विरोधाभास शोधताना साहित्य-कारांना ग्रंथ अपूरे पडत आहेत. या विषयावरील शोध निबंध लिहिताना विद्वानांच्या लेखण्या तोकड्या पडत आहेत. या वरील अभ्यासकांच्या प्रबंधांचे समीक्षण करण्याचे देखील प्रस्थापित साहित्यक व विद्वान टाळत आहेत. इतर अभ्यासकांचे प्रबंध परीक्षणार्थ अहमहमकीने मागून घेणारे या विषयावर मात्र टिपणी करण्याचे अथवा समीक्षा करण्याचे ‘इस्थेटिक्स हा आमचा प्रांत नाही’ हे कारण दाखवून कटाक्षाने टाळत आहेत. आपली अभिरौचीक (इस्थेटिक्सची) साहित्याची कल्पना व कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांची जीवनवेधी कलेची (व्हायटल आर्ट्स) धारणा या विषयावर विद्वान साहित्यिक स्पष्ट भूमिका घेणेस कचरत आहेत.
अशा परिस्थितीत अचार्याचार्यांनी (विवेक गोखले) या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला. आपल्या दोघांच्याही सहित्य कलाकृतींचा, ज्ञात अशा साहित्याच्या सर्व कसोट्यांवर तपासून, तौलानात्मक उहापोह त्यांच्या ग्रंथात केलेला आहे. निष्कर्ष काहीही असला तरी आपल्या दोघांपैकी कोणाची विचारसरणी संयुक्तिक आहे हे द्वैत अजूनही कायम आहे.
जरी काही विद्वान मंडळी व अभ्यासक आपल्याला मर्ढेकर व करंदीकर समजले आहेत असा आव आणीत असले तरी दोघांच्याही सहित्याच्या कलास्वरूपाचे नेमके स्वरूप त्यांना कळले आहे का या बद्दल शंका निर्माण होते.
कविवर्य: हे पहा, विंदा करंदीकर यांचे नाव या लोकी गेल्या १-२ वर्षात वरचेवर ऐकत असलो तरी त्यांचे बद्दल मला काही माहिती नाही.
एकदा घरातील पाण्याचे पिंप साफ करताना त्यात काही मेलेले उंदीर आढळून आले. त्यावर दोन ओळी खरडाव्याश्या वाटल्या. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या वेळच्या नुकत्याच संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर, झालेल्या ज्यूंच्या शिरकाणाशी त्या काव्याचा संबंध जोडण्यात आला आणि एकच गहजब झाला. माझ्या लिहिलेल्या त्या कवितेच्या, माझ्या कल्पना शक्ती पेक्षाही वाचकांच्या कल्पना शक्तिची भरारी फार फार मोठी होती.
मला तेंव्हाच साक्षात्कार झाला की आपल्या हातून फक्त शब्द लिहिल्या जातात, वाचकच त्यात निरनिराळे अर्थ शोधतात. कधी ते महान असतात कधी हीन असतात. अशा लिखाणाचा वाचकांनी काढलेल्या अर्थाच्या मताधिक्यावर त्याचा रचनाकार साधारण अथवा थोर होत असतो.
मिळालेल्या प्रतिसादाने प्रेरित होऊन मी मुंगीवर देखील काव्य केले. आणि मग लिहीतच सुटलो. ‘शिशिरागम’ ही माझी पहिली कविता. त्या नंतर ‘काही कविता’ व ‘आणखी काही कविता’ मी लिहिल्या. लिहिताना कदाचित काही तरी थोर विचार मांडत असल्याच्या अविर्भावात चुकून असे काही अवजड शब्द वापरल्या गेले असावेत कि ज्याचा आशय समजण्यास अवघड जावे. तसेही आपले विचार किती थोर आहेत हे दाखवण्यासाठी अवघड शब्द रचना करण्याचा सहित्य क्षेत्रात प्रघातच आहे.
कविता करताना काहीतरी वेगळे विषय मांडण्याच्या प्रयत्नातून माझ्या हातून जे काही निर्माण झाले त्यास त्या वेळच्या लोकांनी डोक्यावर घेतले इतकेच. माझ्या पुढील लेखनात मी विविध विषय हाताळताना स्वानुभवास पसंती दिली. अशीच माझी एक रचना चवीने चघळताना कोण्या एका वाचकास अचानक अश्लीलतेचा उमासा आल्याने त्याने माझ्या विरुद्ध थेट न्यायालयात धाव घेतली. परिणामी थोरा-मोठ्यांनी आवर्जून ‘चढू नकोस’ अशी सांगितलेली न्यायालायची पायरी चढावी लागली. माझ्या चाकोरी बाहेरील लिखाणामुळे मी साहित्यातील एक “बंडखोर” म्हणून ओळखला जाऊ लागलो.
साहित्यात नेहमीच काहीतरी नवीन शोधणाऱ्या वाचकांपैकी एका वर्गाला ही बंडखोरी भावली. एवढाच यातून अर्थ घ्यावयाचा. माझ्या लिखाणात काही भव्य-दिव्य अथवा उदात्त होते असे निदान मला तरी काही वाटले नाही, वाटत नाही. तसे जाणवत असल्यास, त्याचे श्रेय वाचकांच्या भन्नाट विचार शक्तीस जाते असा माझा प्रामाणिक समज आहे.
मला वाचनाचा व्यासंग असल्याने मी त्या काळातील उपलब्ध असलेले वांग्मय व साहित्याचे भरपूर वाचन केले. अगदी पाश्चात्य देशातील वांग्मय सुद्धा. वाचन ही विचारांची किल्ली असल्यामुळे माझ्या विचारांना चालना व गती मिळाली असण्याची शक्यता आहे. माझ्या जीवनातील प्रत्ययाच्या स्वानुभवाचा व कल्पना-शक्तिचा वापर करून मला जे सुचले, रुचले व आवडले ते मी बिनधास्त पणे माझ्या लेखनात मांडले.
मला देखील त्या काळच्या प्रस्थापित विद्वान साहित्यकांचे काही विचार पटले नसतील पण मी त्यावर भाष्य करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. साहित्यातील डाव्या-उजव्याचा निर्णय सूज्ञ वाचकांवरच सोडलेला बरा. हयात नसलेल्या व्यक्तींच्या विचारांशी असहमती असू शकते पण म्हणून ती व्यक्त करणे आवश्यकच आहे असे नाही कारण त्यात प्रतिवादास वाव नसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे, असावयास हवे. वैचारिक मत-मतांतराच्या मंथनाने व वाद्विवादानेच सहित्य प्रगल्भ होते, सिध्द होते.
प्रत्येकाचा विचार हा एकतर त्याची कल्पनाशक्ती, त्याचा अनुभव व त्याची जडणघडण या पैकी कोण्या एकाचा, दोघांचा अथवा या सर्वांचा परिपाक असतो. समाजाच्या चौकटी बाहेरील विचार सार्वजनिक करण्यास धाडस असावे लागते. जातिवंत लेखकाने आपले विचार तेवढ्याच धाडसाने व ठाम पणे मांडावे अन्यथ: लिहिण्याचा विचारच सोडून द्यावा.
मूढमती: पण मग अशा लेखकाचा सलमान रश्दी होतो त्याचे काय?
कविवर्य: ह S S ! आपले वक्तव्य अथवा लिखाण सार्वजनिक करण्याऱ्या प्रत्येकाला हा धोका पत्करावाच लागतो. ही एक व्यावसायिक अपरिहार्यताच समजावी.
मूढमती: साहित्याची प्रकृती, ललितकला, अभिरौचीकीय, इस्थेटिक्स ?
कविवर्य: अभिरौचिकीय हा शब्द कलात्मक याचा समानार्थी आहे. इंग्रजी भाषेत त्यास इस्थेटिक् असा प्रतिशब्द आहे. अभिरौचीकीय विचार म्हणजे कलात्मक विचार. अशा कलात्मक विचारास एक मूल्य असते. त्यास ‘कला-मूल्य’ म्हणतात. असे कला मूल्य प्राप्त करून देण्याच्या इराद्याने केलेल्या प्रयत्नांना ‘कलासाधना’ म्हणतात. अशा या साधनेतून यशस्वी झालेल्या प्रयत्नांना ‘कला’ असे संबोधल्या जाते.
कलेतून प्रकट होणारे ‘कलात्मक-मूल्य’ म्हणजेच कलामूल्य (अभिरौचिक मूल्य) होय. असे ‘कला-मुल्य’ असलेले वांग्मय म्हणजे सहित्य. साहित्याची निर्मिती ही देखील एक कलाच असल्यामुळे साहित्यासकट सर्व कला या ललित कला या एकाच वर्गात मोडतात असा एक विचार मी माझ्या लिखाणात मांडला आहे. साहित्याच्या बाबतीत भाषेला आणि भावनेला जास्त प्राधान्य दिले जात असल्याने त्याची प्रकृती इतर कला-कृती पेक्षा वेगळी असते असे म्हणता येईल.
एखाद्या विषया संबंधीच्या आपल्या विचारांचे, त्यातील ‘अवास्तव’ काढून टाकून अथवा भाषेतील आणि विचारातील ‘असौन्दर्य’ काढून घेऊन, वास्तवाचा अथवा सौंदर्याचा अविष्कार घडविणारे लिखाण म्हणजे साहित्य असे मानावयास हरकत नसावी. असे साहित्य घडविणारा ‘साहित्यीक’ तर विचार अक्षर-बद्ध करून मांडणारा लेखक होय.
मूढमती: कविवर्य, आपण इतके लिखाण केलेत, गौरवशाली मराठी साहित्याची निर्मिती केलीत. आपणास पी.एच.डी. मिळवावीशी नाही वाटली? ज्ञान पीठाचे मानकरी व्हावेसे नाही वाटले? आपणासाठी त्यात काही अवघड नव्हते.
कविवर्य: माझ्या काळी असली ‘उपाधी’ अथवा ‘मान-पान’ यास स्थान नव्हते. परम पूज्य आद्य गुरु श्री शंकराचार्य यांनी स्थापिलेली ‘पीठे’ व नित्य भोजनातील वापरात असणाऱ्या गहु, ज्वारी, बाजरी, तांदुळ अथवा रुचकर थालिपीठाच्या पिठा व्यतिरिक्त कोणतीही ‘पीठे’ माहित नव्हती. आपण फक्त लिहावयाचे आणि लोकांसमोर ठेवायचे. त्यातही दोन प्रकार. आपल्याला पटेल तेच लिहावयाचे अथवा वाचकांना आवडते ते लिहायचे.
आपले लिखाण वाचकांना आवडले व तात्कालिन प्रस्थपित विद्वानांनी प्रशंसिले तर तो आपला बहुमान समजावयाचा. लिखाणाला बहुमान मिळावा. बहुमानासाठी लिखाण असू नये. मला जे मिळाले ते माझ्या अपेक्षे पेक्षा जास्तच मिळाले हे माझे मत आहे.
मूढमती: हल्ली विद्यापीठा कडून ‘आचार्य’ ( Doctor of philosophy) हा किताब विकत न घेता मिळवायचा असेल तर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते व ते पार करूनही तुम्ही यशस्वी व्हाल याची खात्री नाही. यावर आपण काही उपाय सुचवाल का?
कविवर्य: मुळात ‘आचार्य” ( Doctor of philosophy) किंवा दुसरा कोणताही किताब मिळवण्याची गरजच काय? तुम्ही तुमच्या निवडलेल्या विषयातील तुमचे ज्ञान सिद्ध करणे महत्वाचे आहे. तुमच्या, विषयातील ज्ञानाच्या ‘सामाजिक उपयुक्ततेची’ समाजाला प्रचिती आली की तुम्ही त्या विषयातील आपोआपच ‘आचार्य’ होता. तुमच्या विनंती वरून तथाकथित चार विद्वानांनी एकत्र येऊन तुम्हास आचार्याचा किताब देणे आणि तुमच्या ज्ञानाची दखल घेतल्या जाऊन समाजाने तुम्हाला आचार्य हा किताब बहाल करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. असा किताब ‘मागावा’ की ‘मिळावा’ हे ज्याचे – त्यानेच ठरविणे उत्तम.
तुमच्या ज्ञानाची समाजाने घेतलेली दखल जाणून, विद्यापीठाने स्वत: पुढाकार घेऊन, त्या विषयातील चार तज्ञांच्या सल्ला-मसलतीने, ‘आचार्य’ या सारखा किताब बहाल करून ज्ञानाची बूज राखावी. अशा रीतीने मिळालेला किताब मिळणाऱ्यास तसेच देणाऱ्यास देखील ‘भूषणावह’ असेल. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती, त्याने निवडलेल्या क्षेत्रात परिपूर्ण असतेच असे नाही. या न्यायाने साहित्याचे क्षेत्र देखील त्यास अपवाद असू शकत नाही. पुरस्कार प्राप्त साहित्याकाची स्वत: ची अशी काही ठाम मते अथवा विचार असतात. क्वचित प्रसंगी त्यात काही उणीवा अथवा चुका राहून पुरस्काराच्या वलयाने त्या नजरे आड होऊन त्याचा दुष्प्रभाव पुढील सहित्य निर्मितीवर पडू शकतो. अभ्यासक व विद्यापीठे या दोघांनीही या बाबत विचार करावा.
मूढमती: आपण आपला अमुल्य वेळ खर्च करून व साहित्या विषयीची आपली मते दिलखुलासपणे मांडून या मूढमती च्या साहित्य संबंधातील अज्ञानाचे विमोचन केल्या बद्दल शतशः आभारी आहे. आपली मते भू लोकी पोहचवण्याचे प्रयत्न मी नक्कीच करीन. भू-लोकीच्या उदयोन्मुख साहित्यीक/ लेखक/कलाकारांसाठी आपण काय संदेश द्याल?
कविवर्य: मी एकच सांगेन, साहित्याला जीवनवेधी कला समजा अथवा ललित कला म्हणून संबोधा, त्याची दर्जेदार निर्मिती होणे महत्वाचे आहे. मला लाडू आवडतात करंदीकरांना जिलबी आवडत असेल. आपली आपली रुची आहे. त्या दोन्हीचा एकत्र कुस्करा करून दोन्हीची चव का घालवावी? तेंव्हा लिहा. खूप खूप लिहा. हव्या त्या विषयांवर लिहा पण तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहा. लेखन करताना जबाबदारीने लिहा आणि हवेतितके पुरस्कार मिळवा. सर्व कलम बहाद्दरांना माझ्या शुभेच्छा !
आणि विचाराच्या तंद्रीतून मूढमती जागा झाला. त्याने कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांची घेतलेली मुलाखत विसरायचे आत रात्रीचे किती वाजले आहेत याची तमा न बाळगता तीस कलमबद्ध केले.
— अविनाश यशवंत गद्रे
Leave a Reply