सामरिक रणनीती तयार करण्याची गरज
गेल्या वर्षी तंगधार परिसरात चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. आता पाकव्याप्त काश्मीरच्या नौगाम क्षेत्रात त्या वाढल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमध्ये विकासासाठी प्रकल्प उभे करण्याची योजना आखली आहे व हे काम चीनला दिले आहे. या प्रकल्पांच्या कामासाठी व संरक्षणासाठीही सुमारे 30-50,000 हजार चिनी सैन्य या प्रदेशात आहे. या प्रदेशातील रस्त्यांची, धरणांची व इतर बांधकामे म्हणजे भारतासाठी सामरिक दृष्टीने धोकेदायक आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम-नीलम जलविद्युत प्रकल्पाचे काम चीनमधील एक कंपनी करत आहे. त्या प्रकल्पामुळे उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा येथे भारत उभारत असलेल्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पातल्या पाण्याची मागणी पाकिस्तान करु शकतो. उत्तर काश्मीरमध्ये बांदीपोर येथे चायना गेझोबा ग्रुप ही कंपनी झेलम-नीलम हा 970 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प राबवीत आहे. हा जलविद्युत प्रकल्प भारताच्या किशनगंगा वीज प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून उभारला जात आहे. त्यात किशनगंगा नदीचे पाणी वळवून झेलम नदीच्या खोर्यातील वीज प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. 330 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम 2007 मध्ये सुरू झाले असून, चालू वर्षी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
भारताला शेजार्यांच्या माध्यमातून घेरण्याचे प्रयत्न
चीनला पाकिस्तानने काम द्यावे यातील सामरिक कारण महत्वाचे आहे. चीनचा या भागात प्रवेश या निमित्ताने होणार आहे. पाकिस्तानला ही कामे कमी किंमतीत करुन मिळणार असल्याने त्यांचा फ़ायदा आहे.भारत हा दोघांचा शत्रू आहे. चीनने या आधी भारताला शेजार्यांच्या माध्यमातून घेरण्याचे असे अनेक प्रयत्न केले आहेत. श्रीलंकेत बंदर बांधण्याची कंत्राटे मिळविणे, बांगला देशला फूस लावणे, नेपाळमधील राज्यघटनेवरुन झालेल्या आंदोलनाच्या काळात भारतातून टँकर जाण्याचे बंद होताच त्या संधीचा फायदा घेऊन चीनमधून नेपाळला पेट्रोल टँकर पाठविणे, या स्वरुपाच्या कारवाया चीन करत असतो.आताचा त्याचा पाकिस्तानला प्रकल्प उभारणीतील हातभार आणि त्या निमित्ताने आता पाकव्याप्त काश्मीरच्या नौगाम क्षेत्रात चिनी लष्कराच्या हालचाली वाढणे आहेत गंभीर आहे.
या बरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील दळणवळण सोपे व्हावे, यासाठी बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचेही काम चीन करत आहे. त्यामुळे काराकोरम पर्वत रांगांतून जाणार्या काराकोरम महामार्गाला पर्याय मिळेल.अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि भारताच्या सीमारेषेवर असणारा वाखाण कॉरिडोर, अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीरला उत्तरी लडाखातून जोडू शकतो. उजव्या बाजूला अक्साई चीन आणि डाव्या बाजूला पाकव्याप्त काश्मीर यांच्यामध्ये हा कॉरिडोर आहे. त्या कॉरिडोरमधून अक्साई चीन मधुन पाकव्याप्त काश्मीरपर्यंत रस्ता तयार करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. पुढे जाऊन हा रस्ता काराकोरम हायवेला मिळेल. कारकोरम हायवे हा बीजिंगपासून ल्हासापर्यंत आणि ल्हासापासून ग्वादर बंदरापर्यंत जाणारा आहे. आठ लेन असणारा हा मार्ग 120 फूट रुंद आहे. या महामार्गाच्या एका बाजूने डिझेलवाहिनी आहे, तर दुसर्या बाजूने नैसर्गिक वायू वाहून नेणारी पाईपलाईन आहे. तसेच याच भागातून चीनची रेल्वेही काही काळानंतर धावणार आहे. ही रेल्वे चीन आणि पाकिस्तानला जोडणारी असेल. हा मार्ग चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे कारण या मार्गामुळे चीनला हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात येण्यासाठीचा जवळपास 8000 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. चीनच्या पश्चिमेकडे कोणतेही बंदर नाही. सर्व बंदरे ही पूर्वेकडील बाजूस आहेत. सद्यस्थितीत चीनला दक्षिण चीन समुद्रातून मलाक्का खाडीच्या मार्गे हिंदी महासागरामध्ये येऊन इराण किंवा मध्य आशियाई देशांमध्ये जावे लागते; पण या कॉरिडोरमुळे ही सर्व यातायात सुलभ होणार असल्याने चीनसाठी हा कॉरिडोर आणि ल्हासामधून येणारा कारकोरम हायवे अत्यंत महत्त्वाचा आहे.
कारकोरम हायवेला समांतर मार्ग
चीनला लडाखवर ताबा मिळवायचा आहे. कारण, त्यामुळे वाखाण कॉरिडोरसाठीचा कारकोरममधून जाणारा रस्ता निर्धोक होणार आहे. कारकोरम हायवेवर चीनने चार मोठे बोगदे तयार केलेले आहेत. लडाखमार्गे जाणारा रस्ता समुद्रसपाटीपासून १०-१४ हजार फूट उंचावर आहे. त्यामुळे तेथे बर्फवृष्टीसह इतर अनेक नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. अशा आपत्तीच्या काळात हे बोगदे बंद होण्याची शक्यता असते. तसे झाल्यास कारकोरम हायवेवरून वाहतूक करता येणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन या भागातून एक पर्यायी मार्ग विकसित करत आहे. हा मार्ग कारकोरम हायवेला समांतर असणार आहे. या मार्गाला चालना देण्यासाठी चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक भुयारे तयार केलेली आहेत. हे सायलोज किंवा भुयारे क्षेपणास्त्रे आणि हत्यारे ठेवण्यासाठी वापरले जातात. अमेरिकन एजन्सींच्या अंदाजानुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनने अशाप्रकारचे 350 ते 400 सायलोज खोदलेले आहेत.
कारकोरम हायवे, वाखाण कॉरिडोरचा हायवे आणि जलविद्युत प्रकल्प यांच्या बांधकाम, देखभाल व दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी चीनने जवळपास दोन लाख चिनी तेथे तैनात करण्यात आलेले आहेत. यापैकी ३०-५० हजार सैनिक आणि उर्वरित दीड लाख हे कामगार असावे.
हा रस्ता तयार झाल्यास ते भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. खासकरून उत्तर लडाख भागाला याचा अधिक धोका निर्माण होणार आहे. हा भाग सध्या वादग्रस्त आहे. अशातच चीनचा हा मार्ग तयार झाला, तर हा भाग भारताच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न केले जाऊ शकतात. इतकेच नव्हे, तर चीन आणि पाकिस्तानचे लष्कर पी.ओ.के.च्या उत्तरेला असलेल्या वाखाण कॉरिडोरमार्गे लडाखमध्ये येऊन ते लेहपर्यंतही मजल मारू शकते. अक्साई चीनमधून चिनी सेना आणि पी.ओ.के.मधून पाकिस्तानची सेना लेहवर कबजा करू शकते. त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तान आणि चीन हे संयुक्तरीत्या या भागात कारवाई करण्याची शक्यता आता वाढली आहे.
भारताने काय करावे
याकडे वेळीच गांभीर्याने पाहिले पाहिजे. चीनला आपण थोपविले पाहिजे, अन्यथा पाकिस्तान चीनला हाताशी धरून पाकिस्तान अधिक कश्मीरमध्ये १९६२ सालची परिस्थिती निर्माण करतंय.. पाकिस्तानला अणुबॉम्ब, दारूगोळा तयार करून देण्यात चीन मदत करत आहे. हे दोन शत्रू एकत्र येऊन नवीन परिस्थिती भारता समोर तयार करत आहे. यासाठी सयुंक्त राष्ट्रसंघाकडे आणि जिनेव्हामधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याविरोधात तक्रार दिली पाहिजे.
पाकिस्तान आणि चीन देशाविरोधात तक्रार देणे आवश्यक
भारताने आपली ठोस भूमिका जाहीर करुन पाकिस्तानला पाकव्याप्त कश्मीरचा भाग चीनला देता येणार नाही हे लेखी कळविले पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, हे भारताने सांगितले पाहिजे. चीन भारताच्या सीमांचे उल्लंघन करतेय याची जाणीव पाकिस्तानला करून दिली पाहिजे. १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाने प्रस्ताव दिला होता. पाकव्याप्त कश्मीरमध्ये सैन्य असता कामा नये. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या प्रस्तावाकडे हे दोन्ही देश दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाकडे लेखी तक्रार केली पाहिजे. शिवाय जिनेव्हामधील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये घुसखोरी करणार्या पाकिस्तान आणि चीन देशाविरोधात तक्रार देणे आवश्यक आहे.
आपले राष्ट्रीय ध्येय आणि सामरिक रणनीती निश्चित करा
आज या भागात चीनचे सैन्य तैनात झाल्यामुळे भारतापुढील संकट अधिक गडद बनले आहे. दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहण्याची गरज आहे. अलीकडेच एअर मार्शल धनोआ यांनी चीन आणि पाकिस्तानशी एकाच वेळी लढण्याची आपली क्षमता नसल्याचे जाहीरपणाने सांगितले आहे. त्यामुळे आपली शस्त्रसज्जता आणि सैन्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. मात्र, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार सध्या आपल्याकडे सैन्यकपातीचा विचार सुरू झाल्याचे दिसते आहे. हे धोकादायक आहे.
चीन आणि पाकिस्तानशी दोन आघाड्यांवर युद्ध हे एक वास्तव म्हणून समोर उभे ठाकलेले असतानाही आपले राष्ट्रीय ध्येय आणि सामरिक रणनीती निश्चित झालेली नाही. मागील सरकारांनी काहीच केले नाही. या सरकारकडून मात्र संरक्षणाबाबत ठोस पावले उचलली जातील अशी आशा आहे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
उपयुक्त माहिती