चार दिवसांपूर्वी मी आॅफिसला पोहचल्यावर मोबाईल पाहिला, तर एक ‘मिस्ड काॅल’ येऊन गेला होता. मी तो नंबर लावल्यानंतर मला पलिकडून एका वयस्कर स्त्रीचा आवाज आला, ‘तुम्ही नावडकरच बोलताय ना?’ मी होकार दिल्यावर त्या मावशी पुढे बोलू लागल्या, ‘मी सुधा बोलतेय, मला तुम्ही व्हॅलेंटाईनवर लिहिलेलली कविता फार आवडली. ‘मी त्यांना समजावून सांगितले की, ती कविता नसून कथा होती. त्यावर त्या म्हणाल्या, ‘ती कथा वाचून मला दोन दिवस झाले. आज फोन करु, उद्या करु असा विचार करीत राहून गेले. मी पुण्यातच राहते, माझं वय आहे चौऱ्यांशी. माझ्या मिस्टरांचं वय अठ्याऐंशी. आम्ही दोघेच राहतो. आमची मुलं परदेशात असतात. रिकाम्या वेळात फेसबुक पाहते, खूप छान गोष्टी वाचायला मिळतात. आवडलेल्या पोस्टबद्दल फोन करून लेखकाला अभिप्राय देते.’ मी म्हणालो, ‘धन्यवाद, तुम्ही आवर्जून कथा आवडल्याचे सांगितल्याबद्दल. माझे फेसबुक पेजवर गेल्यास तुम्हाला अजूनही वाचायला भरपूर मिळेल.’
त्यांचे पुन्हा आभार मानून मी फोन ठेवला. आज २२ फेब्रुवारी, बरोबर वर्षांपूर्वी कोरोनाबद्दल पेपरमध्ये बातम्या येऊ लागल्या होत्या. महिन्याभरानंतर २२ मार्चला, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच पंतप्रधानांनी संपूर्ण देशात कर्फ्यु जारी केला. सायंकाळी पाच वाजता देशभर ‘थाळीनाद’ झाला.
लाॅकडाऊन टप्प्याटप्प्यानं सुरु झालं. आता संपेल, नंतर संपेल म्हणता म्हणता नोव्हेंबर उजाडला. सात आठ महिने घरात बसून काढले. खायचं आणि झोपायचं. या दिवसात मी फेसबुकवर आठवणी, व्यक्तीचित्रे, कथा, ललित लेख लिहू लागलो. काही महिन्यांपूर्वीच तशी लिहायला सुरुवात केली होती. आठवड्यातून एकदा लिहिणारा मी, वेळ भरपूर असल्यामुळे कधी रोज, तर कधी दिवसाआड लिहित राहिलो. वाचणारे मित्र, नातेवाईक वाचून प्रोत्साहन देत होते. लेखाला पाहून फक्त लाईक्स देणाऱ्यांपेक्षा वाचणारी मित्रमंडळी मला अतिशय महत्त्वाची वाटली.
काॅलेजमधील माझा मित्र, राजीव सायगावकर माझ्या प्रत्येक लेखाला अभिप्राय द्यायचा. चाळीस वर्षांत न भेटलेला संजय सुभेदार, लेख वाचून संपर्कात आला. रमेशचे अनेक मित्र लेख वाचून आवर्जून अभिप्राय देऊ लागले.
मकर संक्रांतीला न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील म. द. वारे सरांचा वाढदिवस असतो. या वर्षी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर ‘ब्रश नव्हे दीपस्तंभ’ हा लेख लिहिला. तो सरांना फार आवडला. त्यांच्याकडे येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना सर आवर्जून तो लेख दाखवू लागले. यातूनच परवा रात्री उकरंडे नावाच्या माजी विद्यार्थ्याने मला फोन केला. त्याला सरांवरचा लेख आवडला म्हणून त्याने तो त्याच्या ग्रुपवर शेअर केला. परदेशातील माजी विद्यार्थ्यांनाही तो आवडला व सरांच्या आठवणीने ते भावुक झाले.
माझे लेख वाचून काहींनी त्यापासून प्रेरणा घेऊन स्वतः लेखन सुरु केले. त्यामध्ये माईंचे बंधू दिनेश फडतरे, विद्याधरपंतजी जिंतीकर, इ. आहेत. फर्ग्युसन काॅलेजचे माजी प्राचार्य वसंत वाघ सरांनी लेख वाचून कौतुक केलेच शिवाय लेखांसाठी नवीन विषयही सुचविले. चित्रकार अनिल उपळेकर यांनी नामवंत चित्रकारांविषयी लिहिण्यास उद्युक्त केले. ते लेख सर्वांना आवडले. बंधूतुल्य सिने कलादिग्दर्शक सुबोध गुरूजी लेख वाचल्यावर, काही नवीन संदर्भ, माहिती पुरवू लागले. संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांनी ‘छान, लेखणी बहरलीय’ असं लिहून प्रोत्साहन दिले. माधव राजगुरू सर व लक्ष्मण वाळुंज सर, श्रीराम रानडे सर, मनोहर कोलते सर यांनी लेख वाचून शुभेच्छा दिल्या.
‘वारसा’ नावाची कथा वाचून कोथरूडमधील एका ताईंनी आवर्जून फोन केला व मी वर्षापूर्वी गेलेल्या वडिलांच्या उल्लेखाबद्दल त्यांनी माझं सांत्वन केलं. मी निशब्द झालो.
आजच कोल्हापूरहून एक फोन आला. जहांगीर व मुमताज जमादार यांचा एक प्रिंटींग प्रेस आहे. त्यांच्या वाचनात माझी ‘लेट व्हॅलेंटाईन’ ही कथा आली. त्यांना ती अतिशय आवडल्याचे सांगून ते फोनवर बोलू लागले, ‘साहेब, अभिनंदन करु की आभार मानू? मला तर काही सुचतच नाही. अभिनंदन यासाठी की, आमच्या पिढीच्या भावना आपण अगदी तंतोतंत रेखाटल्या आहेत. कशा काय इतक्या त्या हुबेहूब तुम्हाला वाचता आल्या? काहीही असो, आपण अभिनंदन व आभार दोन्हींचे हक्कदार आहात. पण हे ही खरंच आहे की, तुम्ही आम्हाला रडवलंत. अगदी ढसाढसा. यासाठी सुद्धा पुन्हा एकवार अभिनंदनही व आभारही. धन्यवाद!’ मी त्यांचे आभार मानले व विचार करु लागलो…
कोरोनानं गेलेल्या वर्षी अवघ्या जगाला वेठीस धरलं. तरीदेखील आपण सकारात्मक विचार केला तर मिळालेल्या संधीचं सोनं करु शकतो हे कित्येकांनी दाखवून दिलं. संस्कृतीच्या सुनीताराजे पवार यांनी याच कोरोनाच्या दिवसात ‘कांडा’ नावाची हत्तीच्या जीवनावरील कादंबरी लिहून काढली. नुकतीच ती प्रकाशित झाली आहे. माझा नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेता मित्र, संजय डोळे याने याच दिवसात ‘पुन्हा सौजन्य’ नावाचे, ‘सौजन्याची ऐंशी तैशी’ या धम्माल नाटकाचा सिक्वेल असणारे तुफान विनोदी नाटक लिहून काढले. याच महिनाअखेरीस ते रंगमंचावर येते आहे.
मला देखील या कोरोनाने कमर्शियल डिझाईनरचा लेखक केले. आता मला रोज काही तरी लिहिल्याशिवाय राहवत नाही…आणि तुम्ही ते वाचून ‘पोचपावती’ दिल्याशिवाय रहात नाही…
– सुरेश नावडकर
२२-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply