ध्यास बोध ( श्लोक )
*******
मना फेसबुकने असे काय केले
तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले
मना त्वा चि रे मित्र ही वाढविले
तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।।
मना नेट रात्रीस खेळु नको रे
सुखी घोर निद्रेस टाळु नको रे
नको रे मना रात्रिला जास्त जागु
नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।।
घरातील संवाद ही बंद झाला
अरे रात्रिचा एक वाजोनि गेला
मना आज या आवरी मोह जाला
करी बंद आराम दे तर्जनीला ।।३।।
मना कोणता ग्रूप काढु नको रे
हाताने असे विघ्न ओढु नको रे
तिथे अॅडमिनला बहु त्रास देती
बळे त्रासवोनी तया नागवीती ।।४।।
कुणी फेक अकाउंट ही काढीती रे
झणी एक दुस-यास ते नाडीती रे
अशा मिथ्य फोटोस भाळु नको रे
फुले स्वप्निचि त्यास माळु नको रे ।।५।।
मना यातुनि चांगले तेच घेई
अति मिथ्य ते सर्व सोडोनि देई
मना सत्य मित्रास ध्यानी धरावे
अशा पोस्ट वाचूनि लाईक करावे ।।६।।
जरी नेट ला खर्च काही न केला
अमर्याद डेटा जिओ चा मिळाला
आता कुठवरी संधी मिळणार पाही
फुकटचे महागात पडते कधीही ।।७।।
मना सर्व हा नश्वराचा पसारा
नको गर्व त्याचा नको त्यास थारा
अरे नेट गेल्यावरी मार्ग नाही
उगी पांढरे चक्र फिरते सदा ही ।।८।।
Leave a Reply