कवी, गीतकार आणि निवेदक अरुण म्हात्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.
अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य.
अरुण म्हात्रेंचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. कॉमर्सचे पदवीधर झाल्यावर त्यांनी अकाउंटन्सीची कामं केली. काही दिवस प्राध्यापकी केली. नाटकं दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. अनेक सामाजिक मोर्चांमध्ये भाग घेतला. काही आंदोलनांत कारावाससुद्धा भोगला.
कविता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि कवितेविषयी लोकांच्या मनांत आवड उत्पन्न व्हावी या हेतूने अरुण म्हात्रे यांनी आपल्या सहा कवी मित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या रसिल्या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण करायला सुरुवात केली आणि पाहतापाहता तो कार्यक्रम लोकप्रिय झाला होता.
महाराष्ट्रातल्या अगदी आडगावीसुद्धा कविता पोहोचवण्याचं श्रेय अरुण म्हात्रे यांच्याकडे जातं.
त्यांना बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, स्नेहदा चषक- अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा कविता राजधानी पुरस्कार अरुण म्हात्रे यांना मिळाला आहे.
ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे?, कोसो मैल दूर आहे चांदणी – अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply