आनंद बक्षी …एक शापित ‘ यक्ष ‘ कवी , गीतकार ज्याला कोणी दुर्देवाने कवी मानले नाही , त त्यांनी जी गाणी दिली आणि ते अजरामर झाले , ज्या समीक्षकांनी त्यांना कवी मानले नाही ते मात्र नावापुरतेही उरले नाहीत …. आज त्यांची पुण्यतिथी…30 मार्च
आनंद बक्षी आनंद प्रकाश वैद म्हणजेच गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी रावळपिडी येथे झाला. त्याच्या आईचे नाव सुमित्रा होते. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांचा सांभाळ त्याच्या आजी-आजोबानी केला. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा बक्षी कुटूंब दिल्लीला आले. तेव्हा ते १७ वर्षाचे होते. आनंद बक्षी याना कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांनी भारतीय सेनेत प्रवेश केला , तेथे वेळ मिळेल तेव्हा ते लिहित असत . तेथे होणाऱ्या कार्यक्रमात ते भाग घेत असत. त्यांचे शिक्षण जेमतेम आठवी पर्यंत झाले होते. भारतात आल्यावर ते परत आर्मीमध्ये आले . तेथे त्यांनी दोन-अडीच वर्षे काम केले आणि परत आर्मी सोडली. पुढे ते मुबंईला आले. मुबंईत आल्यावर त्यांना अचानक चार गाणी लिहिण्याची संधी मिळाली ती भगवान दादा यांच्यामुळे. ब्रिज मोहन यांच्या चित्रपटाची तयारी चालू होती , भगवानदादा ऑफिसमध्ये बसले असताना आनंद बक्षी तेथे गेले . दादांनी विचारले काय करतोस तर ते म्हणाले कविता लिहितो , गाणी लिहितो. नेमके त्याच दिवशी भगवान दादा परेशान झाले होते कारण त्यांचा गीतकार आलेला नव्हता. आनंदबक्षी यांना त्यांनी गाणी लिहिण्यास बसवले आणि त्यांनी चार गाणी लिहिली. ती रेकॉर्ड पण झाली . त्यांचे पाहिले गाणे होते ‘ धरती के लाल ना कर इतना मलाल..’ . आनंद बक्षी यांना वाटले आपला मार्ग सहज मोकळा झाला पण तसे नव्हते त्यांना पुढे खूप प्रयत्न करावे लागले .
त्याचे पाहिले खरे गाणे गाजले ते मिस्टर एक्स इन बोंबे ‘ यामधील ‘ मेरे मेहेबूब कयामत होगी ..’ हे गाणे किशोरकुमारने गायले होते. पुढे ‘ जब जब फुल खिले ‘ या चित्रपटापासून त्यांची गीतकार म्ह्णून खरी कारकीर्द सुरु झाली. त्यातील एक गाणे ‘ एक था गुल एक थी बुलबुल ..’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले . ह्या गाण्यात एक गोष्ट गाण्यातूनच सांगितलेली आहे. ‘ मीलन ‘ चित्रपटातील गाणी खूप गाजली त्यांनतर आनंद बक्षी यांनी मागे वळून पाहिले नाही. आनंद बक्षी यांची गाणी साधी सरळ तर होतीच परंतु कथानकाला पोषकही असायची. त्यांना लहानपणापासून वाटायचे की कधीतरी आपले नांव गीतकार म्ह्णून जाहीर केलं जाईल. त्यांनी सुमारे ६३० चित्रपटात गाणी लिहिली ती १९५६ ते २००० ह्या कालखंडात. त्यांनी एकंदर ५००० गाणी लिहिली .
ते कवी , शायर असो वा नसो परंतु इतकी गाणी लिहिणे म्हणजे सोपे नाही. विचार करा अमर प्रेम , आराधना , परदेस , बॉबी , मेहंदी लगी मेरे हाथ , आप की कसम , ताल ह्या चित्रपटातील गाणी आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात. आनंद बक्षी यांनी सुमारे २५० चित्रपट लक्ष्मीकांत प्यारेलाल याच्याबरोबर केले. ज्याप्रमाणे चित्रपटाची मागणी असे त्याप्रमाणे ते गाणी लिहीत असत आणि ती गाणी साध्या सरळ सोप्या भाषेत असत . आपल्याला कोणी कवी किंवा शायर समजात नाही यांची त्यांनी कधीही पर्वा केली नाही त्यांना एक माहीत होते आपली गाणी काय कविता काय साडेतीन टक्क्याच्या बुद्धीमतांसाठी नाहीत . ती सामान्य माणसांसाठी आहेत तरीपण साहिर लुधयानवी , गीतकार अंजान त्यांना मानायचे . त्यामुळे त्यांनी इतरांची पर्वा कधीच केली नाही हे महत्वाचे . आनंद बक्षी यांचे म्हणणे असे आहे की गाणे जितके साधे असते तितकेच लिहिण्यास कठीण असते. त्यांचे आन मिळो सजना मधील साधे गाणे बघा ‘ अच्छा तो हम चलते है…..’ या गाण्यात शब्दांची गुंफण इतकी सहजपणे केली आहे की त्या चित्रपटाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो . अमर प्रेम मधील ‘ चिंगारी कोई भडके …’ हे गाणे तर उत्तम कवितेचा नमुना आहे. तर सीता और गीता मधली भन्नाट गाणी कुणीच विसरणार नाही . सुभाष घेई म्हणतात की माझे चित्रपट त्यांच्या गाण्यांशिवाय होउच शकत नव्हते , मी कधी गीतकार बदलला नाही. ते पुढे म्हणाले की ते इतके साधे लिहीत की साध्या माणसाला देखील कळत असत. परदेस मधील ‘ दो दिलं मिल रहे है मगर चुपके चुपके…’ हे असेच वेगळे गाणे . आनंद बक्षी यांना लिहिण्याच्या बाबतीत कुठल्याही मर्यादा नव्हत्या. मेहबूब की मेहंदी मधील ‘ ये जो चिलमन है , दुश्मन है हमारी..’ हे गाणे तर वेगळेच गाणे आहे त्यात प्रेम , त्याग सर्व काही दिसते तर दुसरीकडे ‘ कर्ज ‘ चित्रपटातील गाणी वेस्टर्न संगीता मधील आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे हे तरुणाईला आकर्षित करणारे आहे. आशा चित्रपटातील ‘ शिशा हो या दिलं हो आखिर टूट जाता है…’ आजही लोकप्रिय आहे. आप की कसम मधील सर्व गाणी अप्रतिम आहेतच परंतु त्यातील ‘ जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम वो फिर नही आते …’ ह्या गाण्यात कोण म्हणत काव्य नाही ? हिरो चित्रपटामधील सर्व गाणी जबरदस्त आहेत एक गाण्यात तर हिरो , भाऊ आणि आई याच्या तोंडी गाणे लिहिले आहे तसे लिहिणे कठीण आहे . ‘ हिमालय की गोद मे ‘ मधील ‘ चाँद सी मेहबुबा ..’ हे गाणे किंवा डर चित्रपटातील गाणी आजही बघीतली जातात. त्यांच्या ‘ चोली के पिछे क्या है …’ ह्या गाण्याने धमाल उडवली , त्यांना टीकाही सहन करावी लागली . ते म्हणतात त्या गाण्याची त्या कथानकात गरज होती म्ह्णून लिहिले . त्यावेळेला ‘ घोस्ट रायटर ‘ म्ह्णून एक वादंग उठले होते त्यांनी ते खोडून काढले. त्यांनी आपल्याला शायर , कवी म्हणत नाहीत याची कधीच खंत केली नाही. त्यांची गाणी दोन-तीन पिढ्याची गाणी होती. त्यांनी दोन चित्रपटात गाणीही गायली होते. त्यांची नांवे ‘ मोम की गुडिया ‘ आणि ‘ चरस ‘ अशी होती. त्यांनी शेवटचे गाणे लिहिले ते बेडवर आजारी असताना ‘ नगमे है , शिकवे है , किस्से है , बाते है , बाते भूल जाती है ..यादे याद आती है ..ये यादे किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती है ‘ हे गाणे त्यांनी सुभाष घई यांच्या ‘ यादे ‘ या चित्रपटासाठी शेवटचे गाणे लिहिले होते.
आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले. मी माझ्या मित्राबरबर प्रवीण दवणे बरोबर धावपळ करून गेलो ते त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी घरी गेलो पण खालीच त्याच्या वॉचमन ने सांगितले ‘ साब , देर हो गई आपको …’ मिट्टी ‘ तो कभी के ले गये . आम्हाला त्यांचे शेवटचे दर्शन झाले नाही पण त्या वॉचमनचा ‘ मिट्टी ‘ हा शब्द आजही आठवतो
— सतीश चाफेकर
Leave a Reply