कवी गीतकार व लेखक प्रा. अशोक बागवे यांचा जन्म १० मार्च १९५२ रोजी झाला.
कवी अशोक बागवे गेली २५ वर्ष ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळे लहानपणं येते ,पाऊस पडतो तेंव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येतं असं म्हणत निसर्गाच्या प्रेमात पडणारे, कवीतेच्या प्रवासातील महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं एक मोठं नाव. ख्यातनाम कवी,गीतकार प्रा.अशोक बागवे.
ज्यांनी कवीतेच्या गावा जावे या कार्यक्रमातून आपल्या अनेक कवी मित्रांच्या सोबतीने कवीता गावागावात पोहचवली .
मराठी साहित्याच्या प्रांगणात रांगोळी रेखणा-या अनेक साहित्यिकांपैकी एक अशोक बागवे आहेत.
आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे.
अशोक बागवे यांना सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, कविता राजधानी पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, गोजिरी चित्रपटातल्या गीतासाठी ग.दि.मा. पुरस्कार आणि झी ॲवॉर्ड , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अशोक बागवे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
कवी अशोक बागवे यांची एक अप्रतिम काव्य रचना.
कोरोनाष्टक
झाड हादरून गेलं आहे
मुळांना कीड लागल्याचा संशय
बळावत चालला आहे
फुलांना सर्दी नि फांद्यांना खोकला
छातीत घुसमटत
धाप लागली आहे मातीला
निस्तेज प्रकाश पानांवरून सरकत
विझून जातो
नि वारा जेमतेम इकडून तिकडे
आंधळ्यासारखा हेलपाटत वावरतो
ठेच लागून पाचोळा
मुक्याने भिरभिरतो आहे
आकाश ठणकतंय
धरती सुन्न
भरवसा उडून गेलाय
एकमेकांवरचा
आणि पोरकेपणा
दत्तक घेतल्या अपत्यासारखा
वारसहीन
अशोक बागवे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply