कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे उगावकर यांना गुरुस्थानी होते. राम उगावकर यांना भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कवी कुसुमाग्रज यांचे संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले. शाहिरीपासून त्यांनी आपल्या कला जीवनाची सुरुवात केली. लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, चित्रपट गीते, पोवाडे, वैचारिक लेख आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.
‘जिद्द’, ‘पायगुण’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मोसंबी-नारंगी’, ‘भीमगर्जना’, ‘घरंदाज’ आदी चित्रपटांसाठी तसेच ‘संत गाडगे बाबा’ या मालिकेसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. उगावकर यांनी ‘नारदमुनी मुंबईत’, ‘एक मास्तर चंदेरी दुनियेत’ हे एकपात्री कार्यक्रमही सादर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतीकार, संत गाडगे महाराज, हॅलो इन्स्पेक्टर, पुरुष पात्र नसलेले आज येणार पाहुणे, मुलांचा हरिजन दिन अशी त्यांची बारा नाटके रंगभूमीवर आली. तर गीतागीत सुगंध (काव्य), अंतराळ स्नेह (काव्य), मस्करी (विनोदी कविता संग्रह), शिवबाची शौर्यगाथा (पोवाडा), भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा, लोकमान्य (नाटक) जादूचा मणी, टिल्लू ही बालनाट्ये, परिताईचा मंगू असे काव्य, नाट्य व बालसाहित्य प्रकाशित आहे.
त्यांनी काव्यमय असे एका सच्चा शिक्षकाचे मनोगत, एक मास्तर चंदेरी दुनियेत या पुस्तकाद्वारे तर दाखवलेच पण त्यावर उत्कृष्ट कविता लिहून त्यांनी स्वत:चेच चरित्र काव्यातून सादर केले.
उगावकर यांनी लिहिलेली २० नाटके रंगभूमीवर सादर झाली होती. त्यांची तीन हिंदी तर सुमारे ४० मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दलित मित्र’ या पुरस्कारानेही उगावकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
संत गाडगे महाराज यांचे ते उपासक होते. त्यामुळे भगवे कपडे न घालणारे साधू म्हणूनही उगवकारांचा परिचय करून दिला जातो. परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे ते विश्वस्तही होते.
राम उगावकर यांचे ५ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply