कवी, कथाकार आणि कादंबरीकार डॉ.महेश केळुसकर यांचा जन्म ११ जून १९५९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे झाला.
मुळचे सिंधुदुर्गचे असणारे महेश केळुसकर साहित्य,संस्कृती व ग्रंथव्यवहारासाठी भरीव योगदान देत आहेत. एम.ए. पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण घेतलेले केळुसकर आपल्या साहित्याने, लेखनाने वाचकांच्या मनात घर करुन बसले आहेत. १९७६ साली सावंतवाडीच्या कोजागिरी कविसंमेलनात कविवर्य बा.भ,बोरकर यांच्या उपस्थितीत सतरा वर्षांच्या महेश केळुसकर यांनी ‘बाळगो नि मालग्या’ ही मालवणी कविता पहिल्यांदा स्टेजवर वाचून साक्षात बा.भ,बोरकर (बाकीबाब) यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळवली होती. मालवणी भाषेतल्या त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. केळव्याच्या कोकण साहित्य संमेलनात तर मंगेश पाडगावकरानी त्यांना कडकडून मिठी मारून वर म्हटलं होतं, ‘कविता प्रेझेंट करण्याच्या बाबतीत माजो हात धरणारो आजून कोण जन्माक येवक नाय; पण आज तुझी ‘झिनझिनाट’ आयकताना मी थरारून गेलंय….’
आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर डॉ. महेश केळुसकर २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. १९८३ पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी २६ अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी आदी लोकप्रिय कार्यक्रम दिले. त्यांची निर्मिती असलेल्या दोन आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.आतापर्यंत त्यांचे बहुविध साहित्य प्रकारांतील लेख प्रकाशित झाले आहे. ज्यात “मोर” (१९८६), “पहारा” (१९९६), “झिनझिनाट” (१९९७) हे कवितासंग्रह, “रोझ डे” व “मी (आणि) माझा बेंडबाजा” हे युवा कविता लेख, “डोंगर चालू लागला” हा बालकथासंग्रह, “साष्- टांग नमस्कार” (२०००) ही विनोदी गद्य पत्रे, “कमलबंदी” (२००२) हे आस्वाद समीक्षा लेखन तसेच “यु कॅन ऑल्सो विन” व “क्रमश:” या कादंबरींचा समावेश होतो. आतापर्यंत कविता,कथा, कादंबरी, संशोधन, संपादन, बालसाहित्य इ. त्यांची एकूण २७ पुस्तके प्रसिद्ध झालीत. ‘नागरिक’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे कथा- पटकथा- संवाद लेखन त्यांनी केले असून या चित्रपटाला १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.
फेब्रुवारी १९९१ मध्ये गोमांतक मराठी अकादमी आयोजित केलेल्या पाचवे मराठी साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष आहेत. डॉ. महेश केळुसकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. को.म.सा.प. च्या “झ पूर्झा” या मुखपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
“मालवणी” प्रयोगात्म लोककला या त्यांच्या पी.एच.डी. संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. “झिनझिनाट” या त्यांच्या कविता संग्रहाला यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, हा पुरस्कार १९९८ साली मिळाला होता. “साष-टांग नमस्कार” या विनोदी लेखनासाठी त्यांना उत्कृष्ट वाड्.मय राज्य पुरस्कार तसेच म.सा.प. पुणे चा ‘चि. वि. जोशी’ पुरस्कार मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply