नवीन लेखन...

कवि विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर म्हणजे विंदा करंदीकर यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी देवगड तालुक्यात झाला. त्यांनी कविता विंदा करंदीकर या नावांनी लिहिल्या तर गद्य लेखन गो. वि करंदीकर या नावाने लिहिले. विंदा करंदीकर ह्यांनी कविता सामान्य माणसापर्यंत नेली. वसंत बापट, मंगेश पाडगांवकर आणि विदा करंदीकर यांनी आपल्या कविता वाचनाचे शेकडो कार्यक्र्म महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी केले. विशेषतः कॉलेजेस मध्ये खूप कार्यक्रम केले. विंदा करंदीकर ह्यांची कविता मनाला भेदणारी, भिडणारी आहे. ‘अरिस्टोटलचे काव्यशास्त्र’ हे पुस्तक लिहिणारे गो.वि करंदीकर आणि विंदा करंदीकर हे एकच आहेत हे कॉलेजला असताना जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आम्ही मुले चक्रावलो होतो कारण त्यांचे हे पुस्तक आम्हाला कॉलेजला होते खरे सांगू ते वाचता वाचता सगळ्यांची हालत खराब व्हायची आणि त्या मानाने आम्हाला विंदांची कविता खूप जवळची वाटायची, आपली वाटायची.

विंदांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस. आय. ई. एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.

विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर ह्यांनी देखील ‘रास’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. विंदा करंदीकरांच्या कविता आपल्याला विचार करायला लावतात.विशेषतः ‘ विरूपिका ‘ मधील कविता वाचताना वेगळ्याच विंदांचे दर्शन होते. प्रत्येक कविता बोचणाऱ्याला बरोबर बोचते, दुखापत करते आणि विचार करायला लावते. विंदांनी धृपद, स्वेदगंगा, विरूपिका जातक, मृदगंध, अष्टदर्शने हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांनी बालकविताही कँगूप लिहिल्या अडम् तडम्, परी ग परी, राणीची बॅग, सर्कसवाला, सशाचे कान, सात एके सात, टॉप, अजबखाना, एकदा काय झाले, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, एटू लोकांचा देश बागुलबोवा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर – “करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे.” त्यांचे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. विंदांनी परंपरा आणि नवता हे समीक्षेची पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे इंग्रजीत समीक्षेची पुस्तके लिहिली त्यांची नावे लिटरेचर लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट आणि अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज अशी आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अरिस्टोटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट भाग १, राजा लिअर ह्यांची त्यांनी भाषांतरे केली. त्यांनी संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठी रूपांतरही केले.

विंदांच्या कविता अनेक वेळा लहानपणापासून आम्ही त्यांच्या तोडून आईकातच आहोंत. प्रत्यक्षात विंदा अत्यंत साधे होते, मला अनेकवेळा माझ्या रमेश पारधे या मित्रामुळे त्याच्या घरी खूप वेळा जाणे होत असे. दरवेळेला मी थोडे विडिओ शूटिंग करत असे माझ्यासाठी. त्याच्या बऱ्याच दुर्मिळ क्लिप्स माझ्याकडे आहेत त्यात एकदा मला म्हणाले होते, “अरे मी कोकण्या. मी माझे काही कुणाला देत नाही परंतु मला जी बक्षिसाची रक्कम मिळते ती सर्व गरजूंना वाटून टाकतो.”

विंदांच्या सडेतोड वृत्तीबद्दल खूप लिहिता यईल त्यांना ज्ञानपीठ मिळाल्यावर आम्ही त्यांना एअरपोर्ट वर घ्यायला गेलो होत. एअरपोर्ट ते साहित्यसहवास संपूर्ण शूटिंग माझ्याकडे होते, त्यावरून मी एक लेख लिहिला त्यावरून मला खूप मान्यवरांची बोलणी खावी लागली होती परंतु विंदा मात्र पार निर्वीकार होते. त्यानंतरही मी त्यांच्याकडे जात होतो. विंदा नेहमी म्हणायचे आपण ‘ नाही ‘ म्हणण्याची ताकद हरवून बसत आहोत ते धोक्याचे आहे.आज हल्ली आपण समाजात पहाताच आहोत तर सर्वत्र ‘ होयबा ‘ ची गर्दी आहे. काही काळ विंदा डोबिवलीमधील सरखोत चाळीत रहात होते, आजही त्यांची ती खोली आहे. सरखोत मॅडम यांनी बंद केल्यामुळे आम्ही काही मित्रांनी तेथे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि त्यांचे निधन झाले तेव्हा कार्यक्रम केले. परंतु आमच्या ‘संस्कृती रक्षक डोबिवलीकरांना’ ह्याची किती जाण आहे, आस्था आहे काही कळात नाही. दुर्देवाने आतापर्यंत डोबिवलीचा उपयोग तेथे रहाणाऱ्या नागरिकाने ‘स्टेपिंग स्टोन’ सारखा केला आहे, झाली प्रगती की घेतली धाव मुंबईकडे, डोंबिवली सुधारू जेणेकरून इथून माणूस स्थलांतर करणार नाही याची कल्पना एकही ‘संस्कृती रक्षकाला’ किंवा ‘स्वयंघोषित सन्माननीय’ नागरिकांना, राजकारण्यांना का येत नाही ? आणि म्हणे ‘सांस्कृतिक डोंबिवली’. विंदा यांच्या पत्नी सुमाताई ह्या नेहमी म्हणायच्या ‘डोंबिवली कशी आहे’, तेव्हा मी म्हणायचो ठीक आहे अजून तुमची जुनी खोली शाबूत आहे. आज साहित्य सहवास मध्येही विंदांचे घर नाही, तेथे आता दुसरे रहातात.

विंदांना खूप अवॉर्ड्स मिळाले होते त्यात सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८), सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०), कुमारन् आसन पुरस्कार (१९७०), महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५), कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७), कबीर सन्मान १९९१, जनस्थान पुरस्कार १९९३, कोणार्क सन्मान १९९३, साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६), महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७), भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९), डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२), ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार), (इ.स. २००३) केशवसुत पुरस्कार. त्याच्या पत्नी सुमाताई यांचे आधी निधन झाले त्यांनतर काही वर्षांनी विंदांचे निधन झाले. विंदांनी आणि सुमाताई यांनी दोघांनी मृत्यूनंतर देहदान केले होते. अशा या महान कवीचे १४ मार्च २०१० रोजी मुंबईत साहित्य सहवासमध्ये निधन झाले.

मला आठवतंय विंदांचे निधन झाले तेव्हा, मी रमेश पारधे ह्याच्या मदतीने विंदांचा साहित्य सहवास ते जे. जे. हॉस्पिटल अंतिम प्रवास चित्रीत केला, आजही ती चित्रफीत माझ्याकडे आहे.

विंदांबद्दल खूप लिहिता येईल तूर्तास इतके पुरे.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..