मराठी लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला.
गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचे निकटचे स्नेही ‘प्रतिभानिकेतन’चे सेवानिवृत्त प्राचार्य स. दि. महाजन यांच्या त्या कन्या. कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती.
कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आपल्या लेखनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत तसेच स्वयंसेवी संस्थांसह स्त्री-पुरुष संबंधातले राजकारण टोकदारपणे आणि तेवढेच हळूवारपणे त्यांनी आपल्या ‘ब्र’ या कादंबरीत मांडले. कादंबरीच्या नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या लेखनाने त्यांना ‘व्यवस्थेच्या विरोधात लढणारी लेखिका’ अशी ओळख मिळाली आणि ‘ब्र’ कादंबरी एकदम चर्चेत आली.
‘बायकांचे पाय भूतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळत असतात.’ हे या कादंबरीतील एक प्रसिद्ध वाक्य. कमीत कमी शब्दांत जगण्याचं तत्त्वज्ञान मांडण्याची या लेखिकेची ताकद आपल्या लक्षात येते. ‘ब्र’नंतर ‘भिन्न’ ही कादंबरीही सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून त्यांनी जगासमोर आणली. या लेखनानिमित्ताने साहित्यास समाजाचे अधिष्ठानही लाभले.
चित्र, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, ऑनिमेशन, संगीत यांसारखी विविध माध्यमे वापरून त्यांनी लिहिलेली ‘कुहू’ ही कादंबरीही वैशिष्टय़पूर्ण ठरली. तसेच ‘तुटलेले पंख’, ‘आग अजून बाकी आहे’, ‘आगीशी खेळताना’, ‘आबा गोविंद महाजन’, ‘बालसाहित्य आकलन आणि समीक्षा’, ‘कुमारी माता’, ‘तत्त्वपुरुष’, ‘धुळीचा आवाज’, ‘वारली’ (लोकगीत), ‘जागर’ (आदिवासी कार्यकर्त्यांनी रचलेली चळवळीची गाणी अशी विपुल साहित्यसंपदा, अनुवादित संकलित साहित्य, बालसाहित्य, कविता लेखन यांसारखी वैविध्यपूर्ण साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. या सर्व लेखनाचे बीज त्यांच्या काव्यलेखनात दडले होते. इस्मत चुग्ताई यांच्या ‘रजई’ या लघुकथांच्या अनुवादास साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार लाभला. ‘ब्र’ कादंबरीसाठी त्यांना मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
कविता महाजन यांचे निधन २७ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.
कविता महाजन यांची कविता.
‘‘तुझी सगळी तगमग
मुरवून घेईन मी तनामनात
आणि मग
तुझ्या मुठीतून निसटून जाईन
हळूहळू वाळूसारखी
ओघळेन तुझ्या डोळय़ांतून नकळत
वाहणाऱ्या पाण्यासारखी
मी जाण्यापूर्वी हसतमुख
एक क्षण डोळय़ासमोर उभा रहा माझ्या
निरोप दे
चिमुटभर शांततेचं बोट
माझ्या कपाळावर टेकव!’’
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply