महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते.
म्हणजे पहा न, गृहिणी कणकीच्या गोळ्याला लाटण्यानी पोळपाटावर पसरवत असते तेंव्हा पोळपाटाच्या परीघाबाहेर पोळी चुकुनही जात नाही. ” अंथरुण बघुन पाय पसरावे ” हे साध्या पोळीला मिळालेल बाळकडु फोडणीच्या पोळीकडेही अनुवंशिकतेने येतेच.
पोळीच्या डब्यात एकावर एक पोळ्यांची चळत उभी करणा-या गृहिणीला पुसटशीही कल्पना नसते की ह्यातली कोणती पोळी उद्याची फोडणीची पोळी असेल. सगळ्या पोळ्या शिस्तीत डब्यात पडुन रहातात. मधे घुसन शिस्त मोडण्याचा अगाउ पणा न करणे ही मूलभुत शिस्तही तिला पोळीच्या डब्यातच मिळते.
एकदा फोडणीच्या पोळीसाठी पोळीचा नंबर लागला की तिचे दोन्ही हातानी तुकडे किंवा मिक्सरमधुन बाहेर पडणे या पैकी एक पर्याय निवडला जातो. बाकी बारीक चिरलेला कांदा, चिरलेला बटाटा, दाणे, फोडणी वगैरे औपचारिकता कांदेपोहे सारखीच. तयार झालेल्या फोडणीच्या पोळीवर श्रध्देनुसार झिरो किंवा एक नंबर शेव आणि पाव लिंबाची फोड, लिंबू किवा अंब्याचे लोणचे आणि साईडला घट्ट दह्याचा बोल!! आ हा हा
अशी आपल्या घरची फोडणीची पोळी खाताना लाजायच काहीच कारण नाहीये. शिवाय सकाळी सकाळी ऐन नाष्ट्याच्या वेळेला अनपेक्षित टपकलेल्या गेस्टस्साठी ही खुमासदार डिश वेळ मारुन नेउ शकते.
एक आतली खबर म्हणजे शिळ्या पोळ्यांचे शंकरपाळ्या सारखे फ्राय केलेले काप पुण्या मुंबईकडच्या रेस्त्रॉं-बारमधे तिखटमीठ लाउन सत्संगासाठी ठेवण्याची पध्दतही रुढ होत चालल्याच मी ऐकुन आहे.
अशारितीने समर्थ रामदासांच्या “मरावे परी कीर्तिरुपी उरावे” या शिकवणीला अनुसरुन फोडणीच्या पोळीच्या स्वरुपात ती साध्या पोळीचा शेवटचा अवतार धारण करुन अनंतात विलीन होते.
— प्रकाश तांबे
8600478883