सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या. आम्ही तीन भाऊ, आता दोन लहान भाऊ आपापले व्यवसाय व नोकरी करीत आहेत.
सन १९८० सालात रयत शिक्षण संस्थेतून आदरणीय कै. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद वाक्य, ‘ या विचारांनं प्रेरीत होऊन बारावी उत्तीर्ण झालो. जीवनाताला हा काळ कसोटीचा होता. पुढे शिक्षण की नोकरी?
फक्त शिक्षण घेऊन चालणार नव्हतं. उद्योगधंदा किंवा नोकरीची जोड आवश्यक होती. त्यासाठी पोलीस खात्यात काम करणारे माझे चुलते (काका) श्री. भिमराव भाऊ यांच बोटं पकडून ठाणे शहर गाठलं. तेव्हा माझं वय अवघं १८ वर्षे होतं.
आम्ही शाळेत जात असू, त्यावेळी बुधगांव मधील पोलिसवसाहती समोरुन सायकलवर डबलसिट बसून जाण्यास सुध्दा कचरत होतो. तेथून जातांना मागच्याला खाली उतरवित असू. कारण लहानपणा पासूनच पोलिसांबद्दल भीती तर होतीच, पण एक प्रकारचा आदरही वाटत होता. पोलीस खात्यात नोकरी करण्याचं ध्येय उरात बाळगून सन १९८० च्या जून महिन्यात आपलं गांव, गोतावळा, गणगोत यांना गावी सोडून छातीच्या डाव्या बाजूच्या हृदयाच्या कप्प्यात त्यांच्या आठवणी ठेऊन ठाणे शहरात दाखल झालो.
१९८० जून ते डिसेंबर या कालावधीत ठाण्यात मध्यवर्ती मैदान, त्याच्या बाजूचे पोलीस मैदान व पोलीस खात्याची ओळख करुन घेतली. पहाटे पाच वाजता उठून नियमित उन असो, वारा असो वा पाऊस असो धावण्याचा व इतर शारीरिक व्यायाम करण्याचा सराव केला. पोलिसांची परेड पहाता पहाता, स्वत:ला पोलीस वर्दी घालून धावतांना पहात होतो. डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे, ‘पोलीस खात्यात भरती व्हायचं.’
याच ध्येयाने प्रेरीत होवून मी सहा महिने मैदानी सराव केला. सरावासोबत टेंभी नाक्यावरील ग्रंथालयात जावून अभ्यास सुरु केला. त्यानंतर बाजुलाच फडके यांच्या टाईपिंग क्लासेसमध्ये टायपिंग शिकायला सुरुवात केली. राहिलेल्या वेळात घरातली कामं करायची असा नित्यक्रम सुरु होता. सकाळी पाच वाजता सुरु झालेला दिनक्रम रात्री अकरा वाजता संपायचा.
पहाटे, पाच ते सहा वाजेपर्यंत मैदानावर सराव, त्यानंतर प्रातर्विधी. सकाळी सात वाजता माझं आराध्य दैवत श्री. सिध्दीविनायक गणपती मंदिर, जांभळीनाका येथे आरतीला हजर राहायचो.
माझ्या आयुष्यातील प्रगतीची सुरुवात ह्या श्री गणपती मंदिरातून सुरु झाली. आजपर्यंत त्याच माझ्या लाडक्या गणरायाच्या आशिर्वादाने माझ्या आयुष्याचा रथ प्रगतीपथावरुन चालतो आहे.
आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडील आप्तस्वकीयांची, आई-वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा. मन भ्रमिष्ठ व्हायचं. देह ठाण्यात आणि मन चौखूर गावाकडे धावायचं. मी ज्या ठिकाणी रहायचो, त्या पोलीसलाईनच्या बाजूला पोस्ट ऑफीस होतं. मग सरळ पोष्ट ऑफीसात जायचं. पंधरा पैशाचं पोष्ट कार्ड घ्यायचं आणि पोष्टात बसूनच घरी पत्र लिहायचं. आठवड्यातून किमान चार पत्रं मी घरी पाठवित असे. त्यावेळी मोबाईल फोन ह्या सुविधा नव्हत्या. एक पत्र पाठवलं की, गावाकडून येणाऱ्या पत्राची चातकासारखी वाट पहायची.
पहिले दोन-तीन महिने असेच गेले. येतांना आईने मला दहा रुपये खर्चायला दिले होते. त्या दहा रुपयांतले अर्धे पैसे मी पत्रांकरीता खर्च केले. पत्र लिहितांना कधी कधी वाटायचं, जावं परत गावाकडे, पुन्हा अंतर्मन विचारायचं, ‘काय करशील गावाकडे जावून? ‘ तेच शेतीकाम, जनावरांचे शेणघाण काढणं, जास्तीत जास्त माधवनगर सुतमिलमध्ये नोकरी?
मी स्वत:ला समजावत असे. ‘अरे थांब, वेड्या सर्व दिवस सारखे नसतात. नशिबानं, तुला ठाण्यात येण्याची संधी दिली आहे. या संधीचं सोनं कर. ‘
अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही, मी स्वत:ला समजावत होतो तर कधी स्वत:ला अनेक प्रश्न विचारत होतो. दरम्यानच्या काळात मला एक खूप चांगला मित्र भेटला. तो म्हणजे, ‘विजय काटकर’ खरंच काय मित्र होता माझा? लाखांत एक, पण दुर्दैव, तो आज माझ्या सोबत नाही. एका अपघातात त्याने माझीच नाही तर सर्व जगाची साथ सोडून इहलोकीचा मार्ग धरला.
मी नाराज असलो की, मला म्हणायचा, ‘ए व्यंक्या, चलरे, आपण तलावपाळीला चक्कर मारुन येवूया’.
मी म्हणायचो, ‘नको रे विजू, तलावपाळीला नको आपण सेंट्रल मैदानात बसूया.’
त्याला माहिती होतं, माझ्याकडे पैसे नसायचे. मग माझ्या आग्रहाखातर तो आणि मी मैदानात थोडावेळ गप्पा मारत असू.
एके दिवशी गप्पा मारता मारता मारता मी त्याला म्हणालो, ‘विजय, मी होईन का रे पोलीस खात्यात भरती? ‘
तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणायचा, ‘व्यंकट, तुझ्यासारखा जिद्दी माणूस मी बघितला नाहीय रे, तू नक्की होणार बघ पोलीस.’
खरंच, त्याचा हा आधार मला लाख मोलाचा होता. आणि त्या नोकरीच्या आशेने मी अधिक जोशाने मैदानी सराव करीत होतो.
मला सुरुवातीला ठाण्यातील रस्त्यांची, एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादींची माहिती नव्हती. ती मला विजयनेच करुन दिली.
माझ्या जीवनात अशीच एक झालेली गंम्मत व्यक्त केल्याशिवाय रहावत नाही. एके दिवशी असंच मन भरकटलं होतं, काही केल्या करमेना, उठून सरळ गाव गाठावं, असं वाटू लागलं. अशा अवस्थेतील तंद्रीतच तडक चालत रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर आलो खरा, पण खिशात एकही दमडी नसल्याची जाणीव झाली. विजयचे शब्द आठवले, ‘तू होणार भरती, तू जिद्दी आहेस.’ त्याच्या शब्दांनी दिलेल्या विश्वासाच्या बळाने, दृढ निश्चय करुन स्टेशनवरुन मागे फिरलो. पण स्टेशनवरुन बाहेर येताच, दोन काळ्या कोटवाल्या तिकीट तपासनिसांनी अडवले. म्हणाले, ‘तिकीट दाखवा.
मी जरी रेल्वेतून प्रवास केला नव्हता, तरी स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट हे लागतं. तेही माझ्याकडे नव्हतं. काढणार कसं? खिशात दमडी नव्हती.
मी त्यांना विनवणी करीत म्हणालो, ‘मी मुंबईत नवीनच आलो आहे. मी काही रेल्वेतून प्रवास केलेला नाही, माझ्याकडे तिकीट नाही.’ त्यांनी दरडावत विचारलं, ‘नांव काय तुझं? कुठं राहतोस?’
मी त्यांना माझं नांव सांगितलं. माझे काका पोलीस लाईनमध्ये राहतात असं सांगितलं. मी, चूक कबूल करुन व त्यांना विनंती करुनही, ते मला त्यांच्या ऑफीसमध्ये घेऊन गेले. माझ्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकू लागले. मी त्यांना पुन्हा विनंती करून पुन्हा कधीही तिकीट घेतल्याशिवाय प्लॅटफॉर्मवर येणार नाही, असं सांगितलं. मनात गणपतीचा धावा सुरुच होता आणि माझ्या देवाने माझा धावा ऐकला.
त्या तिकीट तपानिसांनी ‘उद्या येवून दहा रुपये दंड भर’ असा दम देऊन मला सोडून दिलं.
मी सुटकेचा नि:श्वास सोडत, मनात देवाचे आभार मानत स्टेशनबाहेर आलो. सरळ घर गाठलं आणि त्याच वेळी मनाशी एक खुणगाठ बांधली, ‘पुन्हा रेल्वे स्टेशनवर विनातिकीट जायचं नाही. ‘
घरी आलो, पण रात्री काही केल्या झोप लागेना, उद्या दहा रुपये कोठून आणायचे? घरी काय सांगायचं? हे प्रश्न सतत भेडसावत होते. सकाळी उठल्याबरोबर प्रथम विजयला भेटायचे, तोच यातून काहीतरी मार्ग दाखविल, असं ठरवून झोपी गेलो.
सकाळी उठलो, प्रातर्विधी आटोपून प्रथम विजयला जाऊन भेटलो.
तो म्हणाला, ‘चल, कोर्ट नाक्यावर जाउन येऊया.’
मी त्याला स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगण्यापूर्वीच, आम्ही चार पावलं चालतो ना चालतो तोच, समोर दोन काळे कोटवाले येतांना दिसले.
त्या दोघांना पाहून वाटलं, ‘हे दोघे बहुधा मलाच शोधायला आलेत’ मी पटकन विजयला म्हणालो, ‘विज्या, दोन मिनिटं थांब मी आलोच.’ मला काय झालं हे विचारण्यासाठी विजय तोंड उघडतच होता, तोपर्यंत मी पळतच बाजूच्या पोष्ट ऑफीसमध्ये घुसलो. थोडा वेळ आत थांबून, ते टीसी गेल्याची खात्री झाल्यावर बाहेर आलो. विजय सोबत चालू लागलो.
तोच पुन्हा दोन टीसी दिसले, मी हैराण झालो. हे सगळे टीसी मलाच शोधायला निघालेत की काय? अशी शंका मनात आली. मी विजयला काहीही न सांगता, मागच्या मागेच बाजूच्या ड्रायव्हर लाईनच्या कंपाऊंडच्या आत लपून बसलो. विजय मला शोधत असल्याचं मी लपून पहात होतो.
काही वेळाने मी कंपाऊंडच्या बाहेर आलो. मी खुप घाबरलो होतो. विजयनं माझ्या चेहेऱ्याकडे पाहुनच ओळखलं की काही तरी प्रॉब्लेम आहे. त्याने मला विचारलं, ‘काय व्यंकट झालंय काय तुला? असा इकडे तिकडे लपतोयस?’
मला देखिल त्याला सगळं सांगून माझं मन मोकळं करायचं होतं. मी विजयला कालची रेल्वे स्टेशनची सर्व घटना सांगितली आणि म्हणालो, ‘मघाशी ते दोन काळे कोटवाले टीसी आडवे आले आणि आता पुन्हा दुसरे दोन टीसी समोर आले, ते नक्की मलाच शोधत असणार.’
‘अरे, कुठे आहेत टीसी? ‘ विजयने विचारलं.
‘ते काय, ते चाललेत दोघे.’ मी विजयला म्हणालो.
ते ऐकून विजय मोठमोठ्याने हसू लागला. मी त्याच्या हसण्याकडे पहातच राहिलो. मनात म्हणालो, ‘मी कसला टेन्शनमध्ये आलोय, आणि ह्याला हसणं सुचतयं? ‘
तो हसत हसतच म्हणाला, ‘अरे, व्यंकट ते टीसी नाहीत. ‘ समोरच्या इमारतीकडे बोट दाखवित तो म्हणाला, ‘हे बघ, इथं कोर्ट आहे आणि ते काळे कोटवाले टीसी नसून कोर्टातले वकील आहेत वकील. समजलं? ‘
ते ऐकून माझा चेहरा बघण्यासारखा पांढरा फटक झाला होता. मग मात्र मी त्याच्यासोबत ठाण्यातील सर्व परिसर फिरुन माहिती करुन घेतली.
बघता बघता सहा महिने निघून गेले. सन १९८१ नववर्षातील जानेवारी महिना सुरु झाला. नवीन वर्षातील नवीन ‘गूड न्यूज’ माझ्या कानी आली. ती म्हणजे,
१० जानेवारीला ठाणे पोलीस मैदानावर पोलीस भरती होणार !’
माझ्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार उरला नाही. मी पुन्हा नव्या जोमाने मैदानी सरावाला सुरुवात केली. शेवटी तो दहा जानेवारीचा दिवस उगवला. पहाटे पाच वाजता उठून, तयारी करुन, भरतीसाठी लागणारी प्रमाणपत्रे बरोबर घेतली आणि जांभळी नाक्यावर येऊन सर्वात प्रथम श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले व बरोबर सात वाजता मैदानावर हजर झालो.
सकाळी प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यानंतर पुन्हा दिवसभर शारीरिक चाचणी स्पर्धा पार पडल्या. मैदानी चाचणी पूर्ण झाल्यावर, मी शारीरिक चाचणी परिक्षा नक्की उत्तीर्ण होणार याचा मला आत्मविश्वास निर्माण झाला. लेखी परिक्षा आणि तोंडी मुलाखत जानेवारी महिन्यात घेण्यात आली.
दोन महिने वाट पाहिल्यानंतर, सोमवार, ३० मार्च १९८१ रोजी मला पोलीस अधिक्षक कार्यालय, ठाणे येथे हजर होण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. त्यावेळी ठाणे ग्रामिण आणि शहर एकच होते. १ मे १९८१ रोजी ठाणे जिल्हा स्वतंत्र होऊन ठाणे शहराकरीता वेगळ्या पोलीसआयुक्त कार्यालयाची स्थापना झाली.
हातात आदेश घेवून, ३१ मार्च १९८१ रोजी ठाणे मुख्यालयातून सर्व तयारीनीशी मी आणि माझे इतर १८१ सहकारी यांची पोलीस प्रशिक्षणाकरीता जालना येथे रवानगी करण्यात आली.
वयाच्या १९व्या वर्षी जीवनाची नवीन वाटचाल सुरु झाली होती. आज त्या एका सर्वसामान्य मुलाचे रुपांतर एक सुजाण नागरीक आणि जनतेचा रक्षक असं झालं आहे. पोलीस वर्दी अंगावर चढवून नऊ महिन्यांचं प्रशिक्षण जालना येथे सुरु झालं.
एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी १९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.
ठाणे ग्रामिण आणि ठाणे शहर आयुक्तालय असे दोन विभाग झालेले असल्याने आमच्या १८२ उमेदवारांच्या बॅचमधील ५१ पोलीस कर्मचाऱ्यांची ठाणे ग्रामिण या विभागात नेमणुक झाली.
जालना येथे पोलीस प्रशिक्षण घेऊन कवायत, कायद्याच्या परीक्षा देऊन पोलीसशिपाई या पदावर रुजू झालो. परंतु पोलीसस्टेशनमधील कामकाजाचा शुन्य अनुभव गाठीशी असतांना आमची रवानगी पोलीस स्टेशनला झाली.
हातात नियुक्तीचा आदेश, आदेशात पोलीस स्टेशन ‘विरार’.
विरार पोलीस स्टेशन नांव वाचलं. पुन्हा डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह?
‘विरार’ आहे कुठे? त्यावेळी आजच्या सारखी गुगल नेटवर्क, मोबाईल ऑन केला की, लगेच विरार कुठे आहे, ते दिसण्याची सुविधा नव्हती.
‘किटपेटी!’
किटपेटी, म्हणजे पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या पोलीस अंमलदारांना त्यांचा सर्व सरंजाम ठेवण्यासाठी लागणारी एक पत्र्याची मोठी पेटी दिली जाते ती.
काकांकडून तसेच आणखी काही लोकांना विचारून, विरारची माहिती घेतली, किटपेटी उचलली आणि लोकलच्या माध्यमातून विरारचा मार्ग धरला.
सकाळी ०९.०० वा. विरार रेल्वे स्टेशनला उतरुन विरार पोलीस स्टेशनची माहिती घेऊन साडेनऊ वाजता आयुष्यात प्रथमच पोलीस ठाण्याची पायरी चढणार होतो.
विरार रेल्वे स्टेशनवर उतरुन बाहेर आलो. तेथे टांगेवाले उभे होते. एका टांग्यात पेटी ठेवली व आमची स्वारी विरार पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. पोलीसठाण्यात प्रवेश करुन हातातली पेटी खाली ठेवली व समोर असलेल्या एका वयस्कर हवालदारांना कडक सॅल्युट केला. ते हवालदार होते श्री. अघटराव.
त्या हवालदारांनी माझं नांव-गांव विचारुन आस्थेने चौकशी केली. त्यांनी बघितलं, हा नवखा जवान, अजून दाढीमिशी आलेली दिसत नाही. त्यांनी मला बसायला सांगितलं. माझा पहिलाच दिवस होता. मी कावरा – बावरा होवून पोलीस ठाण्याची इमारत, त्यातली माणसं न्याहाळत होतो. मनावर प्रचंड दडपण होतं. तसं ट्रेनिंग सेंटरमध्ये पोलिसांची कर्तव्ये शिकविली होती, पण आता प्रत्यक्षात मी कर्तव्यावर हजर झालो होतो.
विरार पोलीस स्टेशन हे रेल्वे लाईनवरच विरार स्टेशनच्या पश्चिमेला आहे. त्या काळात ३०-३५ अंमलदार, व पोलीस स्टेशनच्या हद्दीत पन्नास गावं होती. विरारच्या हद्दीतून मुंबई – अहमदाबाद हा महामार्ग जातो. तसेच अहमदाबाद – दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मार्गाचा काही भाग विरार पोलीसस्टेशनच्या हद्दीत येत असल्याचं, हवालदार श्री. अधटराव यांनी मला समजावून सांगितलं.
त्यांनी मला पोलीस ठाण्याचे प्रमुख वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री. रेणगुंटवार साहेब यांच्या समोर हजर केलं. त्यांचं व्यक्तीमत्त्व बघितल्यानंतर त्यांच्या नजरेला नजर भिडविण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, झुपकेदार मिशा ते घोगऱ्या आवाजात मला जुजबी प्रश्न विचारून म्हणाले, ‘नवीन आहात खात्यात, शिकून घ्या, तपासणीची माहिती घ्या, गुन्हेगारांची माहिती पोलीसस्टेशनच्या रेकॉर्डवरुन बघून घ्या,’ अशा अनेक सूचना करुन ते म्हणाले, ‘भरपूर वर्षे काढायची आहेत खात्यात. तरुण आणि होतकरु दिसता, फौजदार परीक्षा देऊन फौजदार होण्यासाठी प्रयत्न करा.’ मी, ‘जी सर’ म्हणून मानवंदना देऊन केबिनमधून बाहेर आलो.
मी दिवसभर पोलीस ठाण्यातली वेगवेगळी रजिस्टर्स पहात होतो. हजर असलेल्या सहकाऱ्यांची ओळख करुन घेतली. हवालदार अधटराव यांनी मला दिवसभर त्याच्या सोबत मदतनीस म्हणून ड्युटीला नेमलं होतं.
रात्री नऊ वाजता हजेरी झाल्यानंतर माझी दिवसपाळी ड्युटी संपल्याचं सांगितलं. माझा पहिलाच दिवस असल्यानं बाजूच्या एका रुममध्ये मी कपडे बदलून फ्रेश झालो. समोरच एक खानावळ होती, तिथे मी आणि अधटराव हवालदार दोघांनी जेवण केलं. अधटराव हवालदार हे ठाणे अंमलदार ड्युटी करायचे. विशेष म्हणजे ते देखिल ठाण्यात रहायला होते.
त्या काळात दूर रहायला असलेले अंमलदार चोवीस तास ड्युटी करुन मग घरी जात. त्या दिवशी माझी ड्युटी संपली आणि अधटराव यांच्या बरोबर मदतनीस म्हणून जाधव नावाचे अंमलदार हजर झाले. मी त्यांच्याशी ओळख करुन घेतली. थोडा वेळ गप्पा केल्या. त्यांचे अनुभव ऐकले आणि साधारण रात्री अकरा वाजता मी पोलीस स्टेशनमधील एका रुममध्ये झोपण्यास गेलो.
अंथरुणाला पाठ टेकली. आज पहिला दिवस व्यवस्थीत ड्युटी झाली, म्हणून देवाला हात जोडून डोळे मिटले. तेवढ्यात रात्रपाळीचे जाधव मी झोपलेल्या ठिकाणी धावत आले. मला म्हणाले, ‘पाटील उठ, चल लवकर आपणाला जायचं आहे. ड्रेस कर, चल, उठ, आवर लवकर.’
त्या अंमलदारानं मला काही एक पुढे विचारु न देता ड्रेस करायला सांगितल्यानं, मी उठून पुन्हा वर्दी अंगावर चढवली. पेटीतील बॅटरी, काठी घेऊन ठाणे अंमलदार अधटराव यांच्या समोर आलो. त्यांच्या समोर अगोदरच दोन माणसं बसली होती. त्यापैकी एक सांगत होता, ‘साहेब, हायवेवर जंगलात मुंबईकडे जाणाऱ्या बाजूला एका ट्रकने एका रिक्षा टेम्पोला धडक दिली आहे साहेब. टेम्पोचा ड्रायव्हर जागेवरच पडला आहे. ‘
अधटराव हवालदारांनी त्याचा चार ओळींचा जबाब नोंदवून म्हणाले, ‘पाटील, तू आणि जाधव यांच्या सोबत हायवेवर जाऊन बघा आणि तिथंच थांबा. उद्या सकाळी लवकर पंचनामा करायला बिट हवालदार पाठवतो.’
ते काय सांगत आहेत, याकडं माझं लक्ष कमी होतं, माझी उत्सुकता वाढली होती.
कसा झाला असेल अपघात?
आपण काय करायचं?
जाधव मला म्हणाले, ‘चल पाटील.’
मी, जाधव आणि ती दोन माणसं असे आम्ही चौघेजण एका रिक्षातून विरारमधून निघालो. रात्रीचे साडेअकरा वाजून गेलेले, विरार गावचा परिसर रात्रीच्या अंधारात सामसुम होता. आम्ही बसलेल्या रिक्षाचा आवाज तेवढा येत होता. जवळ जवळ अर्धा तास रिक्षा चालत होती. मुंबई अहमदाबाद हायवेच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल. मधून मधून एखादा ट्रक भरधाव वेगाने जात होता.
एका ठिकाणी हायवेवर रिक्षा थांबली. आम्ही चौघेही खाली उतरलो. रिक्षामधले दोघे आम्हा दोघांना सोडून परत विरारला निघून गेले. काळाकूट्ट अंधार, जंगलात रातकीड्यांचा आवाज, भयानक परिस्थिती. मी हातातील बॅटरी चालू करुन प्रकाश केला. रोडच्या एका बाजूला एक ट्रक आणि त्यांच्या समोरुन रिक्षा.
टेम्पोला धडक दिल्याने, रिक्षा टेम्पोचा पुढचा भाग दबून त्याच्या आत ड्रायव्हर सीटवरील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
चेहरा रक्ताने माखलेला, बघण्याचा माझा पहिलाच प्रसंग ‘बापरे? ‘ माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले.
‘काय रे पाटील घाबरलास काय? ‘ जाधवनं विचारलं.
मी मान हलवत ‘नाही’ म्हणालो. पण ते दृष्य पाहून माझ्या पोटात गोळा आला होता.
जाधवनं आजुबाजूचे मोठ-मोठे दगड स्वत: उचलून मला दोन दगड उचलायला सांगितले. मला कळेना जाधव काय करतोय ते?
जाधवने त्या दोन्ही गाड्यांच्या रोडच्या बाजूला दगड लावून ठेवत मला म्हणाला, ‘अरे, रात्रीची वेळ आहे. हा हायवे आहे. रात्रीच्या गाड्या जोरात चालतात ना, म्हणून हे दगड बाजूला लावायचे. मग गाड्या हळूहळू जातात. नाहीतर अजून एक अपघात आणि आपण दोघे त्या रिक्षा टेम्पोतल्या ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसू.’ जाधव हे वाक्य सहज बोलून गेला.
मी मनात म्हटलं, हा किती डेंजर माणूस आहे? अजिबात घाबरत नाही. मला लहानपणी गावाकडच्या काही गोष्टी आठवल्या. त्यावेळी गावात सांगायचे, ‘बुधगाव रस्त्याला पठाणाच्या घराचे जवळ एक माणूस अपघातात कधीतरी मेला होता. त्याचं भूत दिसतंय अधुन मधून.’
म्हणून त्या रस्त्याला आम्ही अंधारात कधी जात नसू.
जाधवनं मला टपली मारली, म्हणाला, ‘ए पाटील तू थांब इथं, मी बाजूच्या गावात जावून बैलगाडीची सोय करुन येतो. सकाळी हे प्रेत घेऊन जावं लागणार वसईला पोस्टमार्टम करायला.’ जाधव म्हणाला.
‘मग मी एकटा थांबू इथं? ‘ मी विचारलं.
‘नाही, नाही तू एकटा कसा? तो काय टेम्पोतला ड्रायव्हर आहे की तुझ्या सोबतीला. ‘ जाधव म्हणाला.
असल्या गंभीर वातावरणात पण जाधव जोक मारुन निर्वीकारपणे हसत होता.
मी विचार करीत होतो, इतकी भयाण काळोखी रात्र, त्यात जंगल,
कधीतरी एखादी गाडी ‘सॉय’ आवाज करीत निघून जायची. कुणी माणूस नाही, की वस्ती नाही.
जाधव हातात काठी घेऊन बाजूच्या गावाकडे निघाला. जातांना त्याने पुन्हा माझ्या पायात साप सोडला, म्हणाला,
‘ए पाटला, झोपू नकोस, अधून-मधून त्या टेम्पोवर बॅटरीचा प्रकाश टाकत रहा. नाही तर जंगलातला एखादा कोल्हा किंवा श्वापद त्या रिक्षावाल्याचं प्रेत ओढून नेतील लक्ष ठेव.’ असं बोलत तो एकटाच पायवाटेने बाजूच्या गावाकडे निघून गेला.
मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो.
त्या दरम्यान एक भाडोत्री टॅक्सी त्या ठिकाणी येऊन थांबली. त्यातून चारजण खाली उतरले. मी आवाज दिला,
‘कोण आहे? ‘
त्यातला एकजण म्हणाला,
‘हा ड्रायव्हर मेला आहे, त्याचे आम्ही नातेवाईक आहोत.’
त्यांनी ते प्रेत पाहिलं. त्यातील एकजण ओक्साबोक्सी रडू लागला. ते थोडा वेळ थांबले नंतर टॅक्सीत बसून निघून गेले.
मी, सारखा घड्याळाकडे आणि जंगलात जाधव ज्या दिशेने गेला, त्या दिशेला बॅटरीचा प्रकाश टाकून बघत होतो. आयुष्यातला पहिला पोलीस खात्यातला दिवस. इतक्या भयानक परिस्थितीत अडकलो होतो. अनुभव नसल्यामुळे भीती वाटत होती. पण सांगणार कोणाला?
त्या घनदाट अरण्यात, एकटाच कर्तव्यावर होतो. एका हातात काठी
आणि एका हातात बॅटरी घेऊन सारखा देवाचा जप करीत एकाच जागी फेऱ्या मारत होतो.
तीन वाजले असतील आणि अचानक मागून आवाज आला, ‘काय रे पाटला?’ अचानक आलेल्या आवाजाने मी दचकून मागे पाहिले.
जाधवला समोर उभा बघून माझ्या जिवात जीव आला.
‘जाधव, अहो, किती उशिर केलात? ‘ मी विचारलं.
‘मी काय फिरायला गेलो होतो की, गोट्या खेळायला? जाधवनं विचारलं. ‘
‘तसं नाही हो जाधव, रात्रीची वेळ आणि आज माझा पहिलाच दिवस आहे.’ – मी म्हणालो.
‘आता सवय करायची. कधी कधी मसणात झोपावं लागतं, ते देखील प्रेत उशिला घेवून, मनात भीती ठेवायची नाय, समजलं का? अरे राजा, माझी २० वर्षे नोकरी झाली आणि ती देखील या ग्रामिण भागात. हे सगळं बघून बघून मन मेलंय रे ! ‘ग्रामिण भाग हा असाच आहे. काही सुविधा नाहीत, गाड्या नाहीत. अशी प्रेतं सांभाळत रस्त्यावर उभं राहायचं. आठ आठ दिवस घरी जायचं नाही. रजा मागितली तर, मिळणार नाही. गप-गुमान न बोलता पोलिसानं आपलं काम करत रहायचं. चोवीस तास बंदोबस्त करायचा. ड्युटीला अर्धा तास उशिर झाला की शिक्षा मिळणार आणि घरी जायला उशिर झाला किंवा जायला मिळालं नाही की घरच्या लोकांची बोलणी खायची. ‘ जाधवचं बोलणं बराच वेळ चालूच होतं. त्याच्या प्रत्येक वाक्यातच नाही तर शब्दा- शब्दातून व्यथा बाहेर पडत होती. तो बोलत होता आणि मी ऐकत होतो.
त्या रात्रीत जाधवने पोलीस खात्याची माहिती व अनुभव एवढे सांगितले की, मी मनाशी ठरवून टाकलं, ‘यापुढे आपण आपल्या कर्तव्यात कधी कसूर करायची नाही. आणि कर्तव्य बजावतांना कधी रडगाणं गायचं नाही.
जाधवने रात्रभर मला अनेक घटना, बंदोबस्ताची माहिती, वरिष्ठ आणि सर्वात महत्त्वाची आपली जनता आपल्याशी कशी वागते याबाबतचे अनेक अनुभव सांगितले.
त्यांचं बोलणं ऐकण्यामध्ये रात्र कशी सरली हे मला समजलं नाही. पण पोलीस खात्यातील पुढील प्रवासासाठी उपयुक्त असे पोलीस खात्यातले अनुभव आणि घटना यांची शिदोरी मात्र एका रात्रीत भरपूर मिळाली होती.
खरचं, त्या रात्री जाधव मला एकट्याला सोडून गेला, तेव्हा त्याचा खूप राग आला होता. पण परत आल्यानंतर रात्रभर त्यानं मला जे ज्ञान दिलं, ते मला भविष्याकरीता खूप उपयोगी पडलं आहे आणि अजुनही मी त्या ज्ञानाचा उपयोग करीत आहे.
सकाळी दिवस उजाडल्यानंतर जाधवनं माझ्याकडून पंचनामा व इतर कागदपत्रं तयार करुन घेतली. तो सांगत होता, मी लिहीत होतो. पहिल्याच दिवशी मला खूप काही शिकायला मिळालं.
आम्ही दोघांनी सर्व कागदपत्र तयार करुन घेतले. त्या ठिकाणावरुन सात-आठ किलोमीटर अंतरावर वसई येथे सरकारी हॉस्पिटलामध्ये बॉडी बैलगाडीतून घेऊन गेलो. आमचा सर्व प्रवास पायी चालू होता. हॉस्पिटलमधील प्रक्रिया पार पडायला सायंकाळचे सहा वाजले. मग ते प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.
दिवसभर ना आंघोळ, ना चहा, ना जेवण. आम्ही दोघे उपाशीच होतो. संध्याकाळी सात वाजता आम्ही दोघांनीही एक एक मिसळपाव खाल्ला आणि आठ वाजता विरारला परत आलो. मग त्या अपघातातील ड्रायव्हर विरुध्द गुन्हा दाखल करणं, आरोपी अटक करणं, हे सर्व सोपस्कार करता करता रात्रीचे दहा वाजले होते.
दहा वाजता मला त्या कामातून मुक्त करुन जाधव निघून गेला. मग मी बाजूच्या रुममध्ये कपडे बदलले. नळावर जाऊन थंड पाण्याने आंघोळ केली. समोरच्या खानावळीत जाऊन दोन घास पोटात घातले आणि पोलीस स्टेशनच्या रुममध्ये आडवा झालो.
माझा पोलीस खात्यातला पहिला दिवस असा अविस्मरणीय ठरला होता.
पहिल्या दिवसाने जशी सुरुवात करुन दिली, तशीच गेली ३४ वर्षे मी या अशा पोलीस खात्यात नोकरी करीत आहे. सध्या पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करीत असतांना अनेक वेळा असे अविस्मरणीय प्रसंग अनुभवले. परंतु तो अनुभव हाच माझ्या आयुष्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडला आहे. त्या अनुभवाची शिदोरी घेवूनच, मी खात्यात यशस्वी वाटचाल करीत आहे.
— व्यंकट पाटील
(व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.)
Leave a Reply