स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते.
पारतंत्र्यातील पोलीस अंमलदारांवर आणि भारतीय जनतेवर ब्रिटीश अधिकाऱ्यांची हुकमत चालत होती. त्यामुळे कधीकधी इच्छा नसतांना सुध्दा पोलीस दलातील अंमलदारांना वरिष्ठ ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आज्ञेने अन्यायकारक कारवाई करणे भाग पडत होते आणि आपलेच भारतीय पोलीस आपल्यावर अन्याय करीत असल्याचे पाहून भारतीय जनतेमध्ये पोलिसांबद्दल निर्माण झालेली प्रतिमा आजही काहीअंशी कायम आहे. भारतीय अधिकारी त्यांच्यावर देखिल अन्याय करण्यास कचरत नव्हते.
भारतीय राज्यक्रांती झाली, अनेक हुतात्मे झाले आणि अन्यायकारक ब्रिटीश राजवटीतून भारतमाता, भारतभूमी स्वतंत्र झाली. या स्वतंत्र्य झालेल्या भारताची अनिर्बंध सत्ता गेली ६७ वर्षे चालू आहे. देश स्वतंत्र झाला. राजवट बदलली. भारताच्या राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला.
स्वतंत्र भारतामध्ये अनेक स्वतंत्र घटक राज्ये, केंद्र, शासीत प्रदेश विभागावर तयार करुन वेगवेगळे घटक प्रमुख नेमण्यात आले. त्या घटक प्रमुखांच्या अखत्यारीत अनेक वेगवेगळ्या खाती, विभाग, संस्था तयार करुन, जनतेला सुविधा पुरविणे, शिक्षण देणे, त्यांचे संरक्षण करण्याकरीता प्रत्येक घटकांवर, खात्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली.
इतर खात्यांवर जशी सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी दिलेली आहे, तशी देशातील अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधक व गुन्हे तपास ह्या बाबींची जबाबदारी पोलीस खात्यावर सोपविलेली आहे. पोलीस दल हे पूर्वी ज्या पध्दतीने काम करीत होते, ते कायदे ब्रिटीशांनी तयार केलेले होते. काही ठिकाणी असं वाचनात आलं आहे की, ब्रिटीश अधिकारी हे सुरूवातीच्या काळात मूठभर संख्येने भारतात आले आणि त्यांनी करोडो भारतीयांवर राज्य केलं. ते का करु शकले राज्य?
भारतामध्ये अनेक जाती धर्माचे, पंथांचे लोक वेगवेगळ्या भागात वास्तव्य करुन राहतात. प्रत्येक चाळीस कोसांवर रितीरिवाज, प्रथा आणि बोलीभाषा यामध्ये थोडाफार फरक जाणवतो. ह्या गोष्टींचा ब्रिटीशांनी सखोल अभ्यास करून त्यांनी भारतीय लोकांमध्ये जाती-पातींवरून भेदभाव निर्माण करून, त्यांना आपसांत लढवत ठेवलं. त्यामुळे भारतातील करोडो लोकांची ताकद कधी एकत्र येऊन अन्यायाविरूध्द लढू शकली नाही. आपसांतील मतभेद व वाद घडवून आणून ते सतत शांतता बाधित करायचे. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय लोकांमध्ये एकी नव्हती. अगदी चार लोक सुध्दा एकाच दिशेला फक्त पाचवा खांद्यावर असतांनाच चालतांना दिसत होते.
इतर वेळी ते आपसांत भांडत होते. आणि याचाच फायदा घेऊन मूठभर ब्रिटीशांनी भारतावर दिडशेवर वर्षे साम्राज्य केलं होतं. हे इतिहासावरून दिसून येतं.
भारत स्वतंत्र झाल्यावर जाता जाता ब्रिटीश दोन जातींमध्ये वैमनस्याचे कायमस्वरुपी टिकून राहणारे बीज भारत भूमीमध्ये पेरून गेले. त्या बिजांची कडू फळे आम्ही सर्व भारतीय आज देखिल चाखत आहोत.
एक ना अनेक समस्या उदा. टाळेबंदी, आंदोलने, धरणे, संप, मोर्चा व उपोषणे यासारख्या घटनांनी भारत देश व पर्यायाने प्रशासन त्रस्त झालेलं आहे. वरील सर्व घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व त्या करता पोलीस खात्यास जबाबदार धरण्यात येत होतं.
अनेक महत्वाचे बाबतींत पोलिसांना प्रत्यक्ष सामना करावा लागतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असतांना अनेक वेळा पोलिसांनी वेळेपरत्वे योग्य त्या बळाचा वापर करणे भाग पडते. यामध्ये समाजात पोलिसांबद्दल घृणा किंवा तेढ निर्माण होते आणि मग पोलीस अत्याचारी, अमानुषपणे कारवाई करतात असा गैरसमज जनतेमध्ये झालेला असतो. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा आणखीनच मलीन होते.
पूर्वीच्या काळात पोलिस दलातील कनिष्ठ अंमलदार/ कर्मचारी यांचे शिक्षण सातवी-आठवी पर्यंत झालेलं असायचं. कमी शिक्षण असल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करतांना अनेक अडचणी येत असतात. त्या काळात अंगाने मजबूत, उंचापूरा असला की, त्याला पोलिस खात्यात भरती करुन घेतलं जात असे. त्या काळात एक पोलीस गावात आला तरी, अख्या गावातील लोक आपआपसांत कुजबूज करीत. पोलिसांच्या समोर बोलणं सोडा, उभं राहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पोलिसांचा दराराच तसा होता. देहयष्टी मजबूत, ओठांवर मिशांचा झुपका, हातात दांडा नाहीतर बंदूक अशा पेहरावात राहणारा पोलीस स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण पहात आहोत.
त्या काळापासून आजपर्यंत पोलिसांच्या कामाचे वेळापत्रक नाही, ड्युटीची वेळ नक्की नाही, जेवण्याचा झोपण्याचा ठिकाणा नाही. अशा परिस्थितीत मिळेल ते खाणे, वेळ मिळेल त्या वेळी व कोणत्याही ठिकाणी आराम करणे, यामुळे पोलिसांची प्रकृती अनेकदा बिघडलेली दिसते. जाड देह, त्यामध्ये भले मोठे पोट, या पोटावर बांधलेला पट्टा, यामूळे पोलिसांची समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. अगदी लहान मुलाला जरी पोलिसांबद्दल विचारले, तर तो सहजपणे हातवारे करून मोठे पोट असणारा असं सांगायचा.
आता परिस्थिती बदलली आहे. आजच्या काळात पोलीस दलात पदवीधर तरूण भरती होत आहेत. त्यांचे शिक्षण जास्त असल्याने त्यांना ज्ञान चांगले आहे. शरीरयष्टी चांगली आहे.
आज अगदी सिनेमातल्या नायकालाही लाजवतील असे काही पोलीस अधिकारी आणि अंमलदार रोडवर फिरताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस आणि सद्यस्थितीतील पोलीस यामध्ये कितीतरी फरक पडलेला आहे. पोलीसदलात सध्या आधुनिकीकरण झाले असून, नवनविन यंत्र सामुग्री, आधुनिक शस्त्रास्त्र, अतिरेक्यांविरुध्द कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन जय्यत तयार झालेली आहे.
आजच्या काळातला पोलीस हा जनतेचा आणि जनता पोलिसांची मित्र झाली आहे. पोलीस आणि जनतेमधील दुरावा संपला आहे. वर्दीच्या आतमध्ये सुध्दा एक माणूस असतो. याची जाण आता आमच्या समाजातील नागरिकांना झाली आहे.
त्या वर्दीतल्या माणसांना एक मन असतं, एक हृदय नावाचा अवयव असतो आणि त्या हृदयाच्या आतमध्ये माणुसकीची भावना देखील असते, त्यालाही एक कुटुंब, परिवार, नातेवाईक असतात, याचं ज्ञान आज समाजाला झालेलं आहे. परंतु त्या ज्ञानाचा वापर करून समाजात प्रबोधन करण्याची कोणाची इच्छा होत नाही. हे आमच्या स्वतंत्र भारत मातेचं दुर्दैव म्हणावं लागेल.
पोलिसांनी अहोरात्र काम करावं, त्याने सतत रस्त्यावर उभं रहावं, त्याचं अस्तित्व २४ तास असायला पाहिजे, असं सर्वांना वाटत असतं. परंतु त्याचा एक क्षणभरही सहवास कोणाला नको असतो.
पोलिसाने रस्त्यावर उभं रहावं, जनतेचं रक्षण करावं, रात्र-रात्र डोळ्यात तेल घालून पहारा करावा, पण त्यानं आम जनतेला काही विचारु नये. त्याने नियम/कायदे मोडणाऱ्यांना अडवू नये, अशी त्या प्रत्येकाची इच्छाच नाही, तर जन्मसिध्द हक्क असल्याची भावना असते. आणि अशा परिस्थितीत कोणावर कारवाई केली की, मग पोलीस खात्यासारखं दुसरं कोणीही दुष्ट/ वाईट नाही, अशी त्याची भावना तयार होते. त्याचेवर कारवाई करतांना जनतेनेच पुढाकार घेवून त्याला नको नको ती अमिषं दाखवून सुटका करुन घ्यायची, सुटका झाली की, पुन्हा आपणच गोंगाट करायचा, “पोलीस भ्रष्टाचारी आहेत. ”
पण आपली जनता त्यावेळी हा विचार करीत नाही की “सुरुवात कोणी केली? ” सर्व ठिकाणी पोलीस बरोबर असतील असेही नाही. तोही तुमच्या सारखा हाडामासांचा गोळा आहे, त्यालाही मन, भावना आहेत, तो चुकतही असेल, कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी तो चुकला की मात्र त्याच्या अगदी मामूली चुकीचा पराचा कावळा करून जगभर अवडंबर माजवून त्याची प्रतिमा जेवढी मलीन करता येईल तेवढी केली जाते.
सध्या चित्रपट सृष्टी, टिव्ही मालिका, जाहिरात यामधून जास्तीत जास्त पोलिसांची प्रतिमा मलीन करतांना दिसतात. फक्त पोलिस दलाची बदनामी का केली जाते? कारण शासनातील सर्व खात्यांपैकी एकमेव पोलीस हे असं खातं आहे आहे की, तो दिवसा – रात्री, उन्हा-तान्हात, पावसात २४ तास जनतेच्या समोर असतो. तो सदैव समोर असल्यामुळे, त्याला शोधून त्याच्यावर निशाणा लावण्याची गरज भासत नाही. अंधारातही त्याच्यावर अचूक निशाणा लागतो. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसाची खास अशी वेगळी ओळख त्याच्या वर्दीमुळे होते. सर्वसाधारण समाजामध्ये पोलिसाची वर्दी आणि त्या वर्दीतला पोलीस नावाचा मानव नेहमीच ऊठून दिसतो. त्यामुळे त्याच्यावर आरोप करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी लागत नाही.
पोलीस त्याच्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असतांना अनेक लोक त्याच्या चुकीच्या कामाची वाट पाहत असतात. कधी तो चुकतो आणि कधी त्याला कचाट्यात पकडून त्याची प्रतिमा मलीन करायला मिळेल, याची जणू समाजात स्पर्धाच लागलेली दिसून येते.
हे सर्व थांबविण्यासाठी जनतेने एक वेळ त्या वर्दीच्या आत डोकावून पाहिलं तर नक्कीच पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल यात शंका नाही.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply