२६.०२.१९
संदर्भ : लोकसत्ता – पुणें आवृत्तीमधील बातमी : ‘राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार’
• सुरुवातीला हें स्पष्ट केलेलें बरें की, ही ‘पोस्ट्’ मी एक सर्वसाधाधारण नागरिक म्हणून लिहीत आहे. मी आर्. एस्. एस्. चा किंवा बीजेपी चा स्वयंसेवक वा सदस्य नाहीं व कधीच नव्हतो. हें मुद्दाम सांगण्यांचें कारण म्हणजे माझ्यावर कसलाही हेत्वारोप होऊं नये.
• आजची एक बातमी काय सांगते, तर , महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा !
• राज्यपालच काय, राजेंद्रप्रसादांपासून ते फक्रुद्दीन अली अहमद व झैल सिंह, ते प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत, आजवरचे जवळजवळ सर्व राष्ट्रपती हे उघडउघड भूतपूर्व काँग्रसी होते ( अब्दुल कलाम यांच्यासारखा एखादाच अपवाद ). त्याबद्दल न त्यांना स्वत:ला कांहीं गैर वाटलें, न राजकारण्यांनाही.
(टीप : हा मुद्दा काँग्रेसविरोधात म्हणून मांडलेला नसून, भूतकालीन घटनांचा उल्लेख म्हणून मांडलेला आहे).
• उपराष्ट्रपतींबाबत तशीच उदाहरणें देतां येतील.
• लोकसभेच्या सभापतींचेंही तेंच ( आणि विधानसभांच्या, विधानपरिषदांच्या सभापतींचेंही तेंच) . त्या पदासाठी जर कुणां राजकारण्याची निवड केली गेली, तर, तो, पूर्वी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी, संघटनेशी संबंधित असणारच ! आधीचे मंत्री, नंतर लोकसभेचे सभापती बनून, त्यानंतर पुन्हां मंत्री बनलेलेही आपण पाहिले आहेत.
• पण , या सर्वांबद्दल आधी गहजब केला गेलेला कुणी पाहिलेला नाहीं.
• व्हॉट् इज् एक्सपेक्टेड् ? अपेक्षा काय, तर त्या त्या पदांवर आसीन झाल्यावर त्या व्यक्तीनें नि:पक्षपणें काम करावें, एवढेंच .
• राजकारण्यांनो, तें होतें आहे की नाहीं , तें पहा . त्याबद्दल बोला , जरूर पडल्यास टीकाही करा. पण , केवळ इलेक्शन जवळ आलें आहे म्हणून त्यांच्या भूतकाळावरून राजकारण करूं नका . जनता शहाणी झाली आहे , प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ तिला कळतो. तुमच्या कृतीतलें वैयर्थही जनतेला कळणारच ! ‘An empty vessel makes too much noise’ ही म्हण जनतेला माहीत आहे. तेंव्हां स्वत:च्या वागण्यानें आमच्यासारख्या सुशिक्षितांना एलिनेट् करूं नका . एवढें केलेत तरी पुष्कळ.
• एक साधारण माणुस हें पोटतिडीकीनें सांगतोय्. पहा पटतंय् कां.
— सुभाष नाईक
Leave a Reply