सूर्यनारायण आणि नवीन धान्यांची पूजा करणे, हे या सणाचे वैशिष्ट्य होय. तमिळनाडूच्या ग्रामीण भागामध्ये तसेच शहरातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
पुर्ण तमिळनाडूमध्ये पोंगल हा सुगीचा सण साजरा करण्यात येतो. पीकपाण्याशी संबंधित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने या सणाचे महत्त्व मोठे आहे. पोंगलच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी कुळधर्म, कुलाचार केला जातो. दक्षिणायनातील सूर्याला साक्ष ठेवून हा विधी केला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, पोंगलला भल्या पहाटे उठून स्नानादी कर्म आटोपून नवीन कपडे परिधान करून सूर्योदयाला सहकुटुंब सूर्यनारायणाचे दर्शन घेतले जाते. दक्षिणायनातील सूर्यदेवाने पिकांच्या रूपाने केलेली कृपा उत्तरायणात प्रवेश करणाऱ्या सूर्याने करावी, यासाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर, नवीन भांड्यात नवीन धान्य घेऊन पूजा बांधली जाते. आपल्याकडील घटस्थापनेसारखीच रचना असते. तमिळनाडूमध्ये प्रामुख्याने तांदळाचे पीक येत असल्याने तांदूळ, तसेच हरभरा, मूग, मसूर आणि उडीद यांची डाळ या घटामध्ये ठेवण्यात येते. काही भागात तांदळाची साळ मंदिराच्या दाराला तोरण म्हणून बांधण्यात येते. त्यानंतरच आलेले पीक विक्रीसाठी बाजारात नेण्यात येते. पूर्वी आलेल्या धान्यांपैकी साठ टक्के धान्य हे देवासाठी आणि आपल्या गावासाठी दान करण्यात येत असे. मात्र काळाच्या ओघात ही प्रथा राहिलेली नाही. मंदिराला तोरण बांधताना आगामी काळातही चांगले पीकपाणी यावे यासाठी सूर्याची करुणा भाकली जाते. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांसह गोडधोड जेवण केल्यानंतर त्यांचा उचित मानपान केला जातो.
पोंगलच्या दिवशी अग्नीला नैवेद्य दाखवणे हा सर्वांत महत्त्वाचा विधी असतो. पोंगल सण हा प्रामुख्याने शेतात साजरा केला जातो. शेणाने सारवलेल्या जमिनीवर तीन दगडांची चूल मांडून त्यावर नवीन भांड्यात तांदूळ आणि डाळी टाकून आधण दिले जाते. याच भांड्याभोवती हळकुंडाची खुंट बांधण्यात येतात. याशिवाय उसाचा सभामंडप तयार करण्यात येतो. चूल पेटवल्यानंतर अन्न शिजून ते उतू जाताच चुलीतील अग्नीला म्हणजेच सूर्यनारायणाला नैवेद्य मिळाल्याच्या खुषीत उपस्थित लोक “पोंगलो, पोंगलो‘ असा उच्चार करतात. गोडभातासह खारा भात तसेच उपलब्ध सर्व पालेभाज्या एकत्र करून त्यांचे सांबार/ रसम तयार करण्यात येते. त्याला कुट असेही म्हणतात.
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत हाही पोंगल सणात महत्त्वपूर्ण दिवस असतो. उत्तरायणात प्रवेश करणारा सूर्यनारायण आपल्याला चांगले धनधान्य मिळवून देईल, या अपेक्षेने किंक्रांतीला नवीन गाय-वासरू किंवा बैल खरेदी करून शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरवात करून पेरणीची तयारी करण्यात येते. शहरातील तमीळ समाज, हा सण प्रामुख्याने गोडभात तयार करून साजरा करतात.
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. आसाम मध्ये हा सण “भोगली बिहू” ,पंजाब मध्ये “लोहिरी “, राजस्थान मध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply