पुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ढोलीत येणा-या जाणा-यांचा राबता असायचा; जॉइंट फँमिली असावी कदाचित किंवा समाज कल्याणासाठी पोपट दांपत्यानी हिरव्या मिरच्यांचा मोठ्ठा साठा करुन ठेवला असेल येणार्या जाणार्यांसाठी आणि तेही नसेल तर मात्र पोपटीण दिसायला सुंदर असणार हे नक्की. या डोलीतुन कायम एक दोघ पोपट जास्तीत जास्त बाहेर येउन ३६०° त मान फिरवत डोकवताना दिसायचे. फावल्या वेळात आम्ही भावंडही मोठ्या कुतुहलानी ते विहंगम द्रुष्य बघायचो.
परंतु काही दुष्ट आणि स्वार्थी लोक त्यांच्यावर आरशाचा कवडसा पाडुन त्यांना खाली पाडायला बघायचे आणि मग जेरबंद करुन पिंज-यात टाकायचे वगैरे. त्या मंडळींचा आम्ही वेळेत बंदबस्त करुन “कवडसा” प्रकरणाचा पूर्ण नायनाट केला.
तरी पण लागोपाठ दोन तीन दिवस रोज एक दोन पोपट तिरीमिरी येउन किंवा मुर्छित होउन खाली पडायचे आणि कसेबसे तोल सावरत ढोलीत परत यायचे. अस का होतय कोणालाच काही कळे ना! शेवटी जेष्ठांच्या मध्यस्थी
नी प्रकरण बारकाईने छडा लावण्यासाठी माझ्याकडे सोपवण्यात आले.
मी दुर्बिण लाउन ढोलीच्या सभोवतालच बारीक निरिक्षण चालु केल. ढोलीतील गर्दीमुळे ढकलाढकलीत पोपट पडतायत का? ही शक्यता पडताळुन पाहिली. खाण्यात काही येत असेल का? तर तसही नव्हत. नंतर दुसर्या दिवशी माझ्या निदर्शनात एक आकल्पित खळबळजनक दृष्य आलं आणि मी अक्षरशः आश्चर्यचकीतच झालो. जोशीकाका बाल्कनीत भिंतीला पाय लाउन आरामखुर्चित एकाग्रचित्तानी पेपर वाचत होते आणि त्यांच्या कट्टर टक्कलावर पडलेली प्रखर सुर्यकिरणे परावर्तीत होउन ढोलीच्या प्रवेशद्वारावर पडत होती आणि बिचारे पोपट एकानंतर एक तिरीमिरी येउन पडत होते!
सर्व जेष्ठ आणि पोरासोरांनी मला थँक्स दिले आणि मी जोशीकाकांना हँट घालुन किंवा भिंतीकडे डोक टेकुन पेपर वाचायचा सल्ला दिला.
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply