नवीन लेखन...

पॉझिटीव्ह एनर्जी

देशमुख साहेबांना रात्री दीड वाजता छातीत दुखू लागले. त्यांनी विराजच्या आईला उठवले आणि छातीत दुखतंय असं सांगितलं.
गेल्याच आठवड्यात पारकर साहेबांच्या पण रात्री छातीत दुखू लागले होते, पण त्यांना ॲसीडीटी झाली असेल असं समजुन मुलाने अँटॅसिड पाजले आणि झोपायला सांगितले. रात्री झोपलेले पारकर साहेब सकाळी उठलेच नाहीत. त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि मी ॲसीडीटी झालीय समजून दुर्लक्ष केले, अस सगळ्यांना बोलत होता.
पारकर साहेबांची आठवडाभरापूर्वी घडलेली घटना झटकन विराजच्या आईच्या डोळ्यासमोर तरळली.
त्यांनी क्षणभराचा पण विलंब न लावता देशमुख साहेबांना आधार देऊन बसवले आणि ताबडतोब विराजला फोन केला.
विराज आरे तूझ्या बाबांच्या छातीत दुखतेय त्यांना लगेच हॉस्पीटल मध्ये नेण्याची व्यवस्था कर, मला फार काळजी वाटतेय.
विराजने पलीकडून आई तू घाबरु नकोस मी करतो व्यवस्था, काळजी घे बाबांची अँबुलन्स येईपर्यंत.
अर्ध्या तासात अँबुलन्स च्या सायरनचा आवाज येऊ लागला. विराजच्या आईने सगळी तयारी केली होती, कार्डियाक अँबुलन्सचे दोन कर्मचारी स्ट्रेचर घेऊन आले आणि देशमुख साहेबांना त्यांनी त्यावर झोपायला सांगितले. त्यांच्या छातीचे दुखणे कमी झाले नसले तरी त्यांच्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित होत होत्या.
अँबुलंस मध्ये एक डॉक्टर सुद्धा होते त्यांनी पटापट देशमुख साहेबांच्या प्राथमिक तपासण्या करून देशमुख साहेबांच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लावला, अँबुलन्स वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती.
विराजची आई पण अँबुलन्स मध्येच होती. देशमुख साहेबांचे वय सत्तर तर विराजच्या आईचे पासष्ट. देशमुख साहेब बँकेत कॅशिअर होते तर त्यांच्या सौभाग्यवती एका खाजगी कंपनीत क्लार्क होत्या. दोघेही सेवानिवृत्त. त्यांना विराज नावाचा एकुलता एक मुलगा होता. विराजने कॉम्पुटर इंजिनियरिंग पुर्ण केल्यानंतर आणखीन शिकण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी देशमुख साहेबांची ऐपत नसूनही त्यांनी कर्ज काढले आणि त्याला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले. पुढे विराजने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांनी काढलेले कर्ज दोन वर्षांत फेडून टाकले. देशमुख साहेब रिटायर्ड व्हायच्या दोन वर्ष अगोदर अमेरिकेला गेलेला विराज चार वर्षांनंतर भारतात परतला तो एका बंगाली मुलीशी लग्न करूनच. तेही फक्त दहा दिवसांच्या सुट्टीवर.
देशमुख साहेब आणि विराजच्या आईला मुलाने न सांगता एका मुलीशी लग्न केले यामुळे खुप दुःख झाले होते. त्यांना विराजच्या बायकोचे रंग रूप बघून सुरवातीचे दोन दिवस कौतुक वाटले, त्यांचे एकुलत्या एक मुलाने स्वतःच्या लग्नाबद्दल विचारण्याचे जाऊ दे पण कळविले सुद्धा नाही या गोष्टीचे दुःख मावळते न मावळते तोच त्यांच्या सुनेने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली.
दोन तीन दिवसातच तिला सासु सासरे आणि त्यांच्या जवळ राहणे नकोसे वाटू लागले. ती विराजकडे चार दिवसांतच अमेरिकेला परत जाण्यासाठी हट्ट करू लागली. विराजच्या आईने विराजला समजावले आणि तिला घेऊन चार पाच दिवस गोव्याला जा असे सांगितले आणि तिथूनच अमेरिकेला निघून जा असे सांगितले.
देशमुख साहेबांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना खुप वाईट वाटले. विराज सुद्धा दहा दिवसांसाठी आलेला असताना पाचव्या दिवशी घरातून निघून गेल्याने त्यांनी दोन दिवस काही खाल्ले सुद्धा नाही. शेवटी विराजच्या आईने त्यांची समजूत घातली आणि पाखरे पिल्लांना जन्म देतात, वण वण भटकून चोचीत दाणे आणून पिल्लांना खायला घालून मोठी करतात पण जेव्हा त्या पिलांच्या पंखात बळ येते आणि ती स्वतः उडू लागतात तेव्हा तीच पिल्ले त्यांना जन्माला घातलेल्या पाखरांना त्याच घरट्यात सोडून भुर्रकन उडून जातात. आपण जन्माला घातलेले पिल्लू सुद्धा आता असेच भुर्रकन उडून गेले आहे असं समजा.
देशमुख साहेब विरजच्या आईला त्यावेळी फक्तं एवढंच म्हणाले, आपण पाखरं नाही आहोत आपण माणसं आहोत, पाखरांना मनं असतात की नसतात माहिती नाही पण माणूस म्हणुन आपल्याला जे मनं आहे ते विचार करतं, हळवं होतं, काळजी करतं,गहिवर होऊन रडु लागतं, कावरं बावरं होतं, आणि आयुष्यात काय मिळवलं याचा हिशोब देखील करतं.
विराजचा अमेरिकेला गेल्यावर आईला आणि देशमुख साहेबांना फोन आला, त्याने त्यांची माफी मागितली आणि पुढील वेळेस एकटाच येईन असे सुद्धा सांगितले.
पण पुढील आठ वर्षात विराज एकदाही भारतात परतला नाही. देशमुख साहेबांना पेन्शन मिळत असल्याने त्यात दोघांचाही खर्च भागत असे. विराज सुद्धा त्यांना अधून मधुन पैसै पाठवत असे. आर्थिक अडचण अशी नव्हतीच.
विराजला मुलगा झाला त्याच्या नंतर एक मुलगी सुद्धा झाली. पण देशमुख साहेब आणि विराज च्या आईला त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळाले नाही. नातवंडांना बघायला मिळत नाही तर स्पर्श कुठून करणार. देशमुख साहेब आणि विराजची आई, नातवंडांच्या ओढीने विराज लहान असताना त्याच्या बालपणातील आठवणीत हरवून जात. विराज बायको घरात नसताना मुलांना व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्या आजी आजोबांची भेट घडवून आणत असे. वर्षामागुन वर्ष जात होती आणि आज रात्री अचानक देशमुख साहेबांच्या छातीत दुखायला लागले.
अँबुलन्स हॉस्पीटल मध्ये पोचली. हॉस्पिटल मधील इमर्जन्सी टीम तयारच होती. स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा एका मग मागोमाग आले. तपासण्या झाल्यावर लगेचच विराजच्या आईला निरोप दिला गेला की त्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना डॉक्टरांनी भेटायला बोलावले आहे.
विराजच्या आईने डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यावर विराजला फोन लावून दिला. देशमुख साहेबांची शक्य तितक्या लवकर बायपास सर्जरी करावी लागेल, त्यांना वेळेत हॉस्पिटल मध्ये आणल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे असं सुद्धा सांगितले गेले.
विराज ने बायपास सर्जरी चे एस्टीमेट आणि पैशांची व्यवस्था कशी करायचे ते समजून घेतले व बाबांची बायपास करण्यासाठी सांगितले.
देशमुख साहेबांची बायपास सर्जरी होउन त्यांना पहिले काही दिवस आय सी यू आणि नंतर सेमी प्रायव्हेट रुम मध्ये ठेवण्यात आले.
बायपास सर्जरी झाल्यावर देशमुख साहेबांना पूर्ण शुद्ध आल्यावर त्यांनी विराजच्या आईला विराज आला आहे का असं विचारले. विराजच्या आईने, अहो त्याला लगेच कसं शक्य होईल यायला म्हणून वेळ मारून नेली होती.
पण सेमी प्रायव्हेट रुम मध्ये तीन दिवसांनी आणल्यावर त्यांनी पुन्हा विचारले विराज कधी येणार आहे.
त्यावर त्यांना विराजच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव बघून उत्तर मिळाले, आणि त्यांनी पुन्हा विराज कधी येणार असा प्रश्न विचारायचा नाही असं मनोमन ठरवले.
सेमी प्रायव्हेट रुम मध्ये पहिल्या दिवशी आणखीन दोन पेशंट होते त्या दोन्ही पेशंट जवळ सतत कोणी ना कोणी भेटायला यायचे. दहा पंधरा मिनिटे झाली की त्या पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकाला फोन यायचा मग तो नातेवाईक त्याचा पास घेऊन खाली जायचा, त्याने नेलेला पास घेऊन दुसरा नातेवाईक किंवा मित्र यायचा. संध्याकाळी व्हिजिटिंग अवर्स मध्ये तर अक्षशः मित्र परिवार आणि नातेवाईकांची रीघ लागलेली असायची.
देशमुख साहेबांना हॉस्पिटल मध्ये यापूर्वी दाखल होण्याचा किंवा राहण्याचा योग आला नव्हता त्यामुळे शेजारच्या पेशंट जवळ येणाऱ्या नातेवाईकांचे व मित्रांचे त्यांना अप्रूप वाटायला लागले.
देशमुख साहेबांचे फारसे कोणी नातेवाईक मुंबईत नव्हतेच तसेच गावाला सुद्धा एक चुलता सोडला तर दुसरं कोणी नव्हते. चुलत्याचे आणि देशमुख साहेबांचे लहानपणा पासून जुळले नव्हते पुढे मुंबईत आल्यावर तर त्यांनी गावाला जायचेच सोडून दिले.
विराजच्या आईचे पण कोणी जवळचे नातेवाईक नव्हते, तिला एक बहिण होती पण ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली असल्याने तिच्याशी पण फोनवरच संपर्क व्हायचा तेवढाच.
देशमुख साहेबांचा मित्र परिवार पण खूपच मर्यादित होता, विराज परदेशातून न सांगता लग्न करून आल्यापासून त्यांनी मित्र परिवारात जाणे येणे बंद केले होते.
देशमुख साहेबांची सर्जरी होउन आता दहा दिवस झाले होते, त्यांच्या शेजारी असलेल्या दोन बेडवर मागील पाच दिवसांत चार पेशंट बरे होउन निघून गेले होते.
बाजूच्या प्रत्येक पेशंट जवळ येणारे त्या पेशंटला त्याचा हातात हात घेऊन किंवा पाठीवर थाप मारून धीर द्यायचे, लवकर बरे व्हा, काळजी घ्या, काही लागले तर आम्हाला कळवा असं बोलायचे. देशमुख साहेब आणि विराजच्या आईला हे शब्द शेजारच्या पेशंटला भेटायला येणाऱ्या जवळपास सगळ्याच जणांकडून ऐकायला मिळायचे.
देशमुख साहेब वयाची सत्तरी ओलांडुन आणि विराजची आई पासष्टी ओलांडुन मुलगा ,सून आणि नातवंडं असूनही एकाकी जीवन जगत आहोत या कल्पनेने बायपास झाल्यापासून जास्तच दुःखी कष्टी व्हायला लागले होते. देशमुख साहेबांना तर असं वाटू लागले होते की, मला वेळेत दाखल केले नसते तर विराज मला अग्नी द्यायला तरी आला असता की नाही. माझे काही बरे वाईट झाले असते तर विराजच्या आईने एकटीने काय केले असते.
अजूनही माझे काही बरे वाईट झाले तर तिला एकटीला कोण सांभाळणार.
हे असे नकारात्मक विचार करून करून देशमुख साहेबांना खुप त्रास व्हायचा.
दहा दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या तब्येतीत पाहिजे तशी सुधारणा होत नव्हती. डॉक्टर सकाळ संध्याकाळ व्हीझिट साठी यायचे, तुम्हाला कसं वाटतं आता, लवकर बरं होउन घरी जायचेय ना असे विचारायचे.
देशमुख साहेब त्यांना मानेनेच होकारार्थी उत्तर द्यायचे पण त्यांच्या मनात कालवाकालव सुरू असायची.
ते मनात स्वतःशी बोलायचे, डॉक्टर माझ्या शेजारी असणाऱ्या पेशंट ला भेटायला येणारे त्यांचे नातेवाईक त्यांचा पेशंट लवकर बरा व्हावा म्हणुन रीघ लावायचे, ते नातेवाईक स्वतः एक पॉझिटीव्ह एनर्जी घेऊन येतात आणि पेशंट बरा व्हावा म्हणून त्याला जाताना देऊन जायचे. म्हणूनच ते लवकर बरे होउन निघून जायचे पण मला तर कोणीच भेटायला येत नाही, माझा पोटचा मुलगा सुद्धा नाही. तो मी बरा व्हावा म्हणुन हॉस्पिटलला लाखोंची बिले भरतोय पण मला पैशांची गरज नाहीये मला त्याच्या येण्याची गरज आहे, माझा हात हातात घेऊन बाबा तुम्ही लवकर बरे व्हा आणि घरी चला असं म्हणायची गरज आहे.
ऐपत नसतांना देखील मी कर्ज काढून त्याला अमेरिकेला पाठवावे यासाठी त्याच्या आईने मला रिटायर्ड होण्यापूर्वी दिलेल्या त्याच पॉझिटीव्ह एनर्जीची आज मला गरज आहे.
–प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM, DME.
कोन , भिवंडी ,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..