दिवाळी संपून दहा दिवस झाले. परवा मी एकटाच ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा आमचे शिंदे पोस्टमन व त्यांचे सहकारी, दोघेही आत आले. शिंदे यांनी मला नमस्कार केला व ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणून ते निघूनही गेले.
मी क्षणार्धात भूतकाळात गेलो. १९८३ साली अनेक दिवाळी अंकांचे काम केले होते. त्यामुळे पोस्टमनची घरी रोजचीच चक्कर होत असे. कधी पत्रं तर कधी दिवाळी अंकाचे पार्सल पोस्टाने येई. त्या दिवाळीला आलेल्या दोघां पोस्टमनच्या हातावर ‘पोस्त’ची रक्कम देताना मला अतिशय समाधान वाटलं होतं आणि या वर्षी कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने मी लाॅकडाऊनमध्ये घरात बसून काढले. त्यामुळे ऑफिसचे कामही बंद. आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे, परवा मला समजून घेणाऱ्या पोस्टमनचे मी कितीही आभार मानले, तरी ते कमीच पडतील.
प्राथमिक शाळेत असतानाच पत्रलेखन शिकविले जाते. वरती उजव्या कोपऱ्यात आपला पत्ता. मग ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव. ती व्यक्ती वडिलधारी असेल तर ती. रा. रा. हा मायना. त्याच्याखाली पत्रास कारण की, असं लिहून पत्र मजकुरास सुरुवात करायची. त्याकाळी वर्गातच मित्राला पत्र लिहून, पोस्टात टाकून त्याचा कार्यानुभव घेतला होता.
त्यावेळी पोस्टकार्ड एक आण्याला, म्हणजे सहा पैशात मिळायचे. पत्राचं उत्तर हवं असेल तर जोडकार्ड बारा पैशात मिळायचे, त्या दोनपैकी एका कार्डावर ‘जवाबी’ असं छापलेलं असायचं. मी पाचवीपासूनच गावी, मुंबईला, नातेवाईकांना पोस्टकार्ड लिहून पाठवू लागलो. माझं अक्षर मोठं असल्यानं पत्र कमी मजकुरातच भरुन जायचं. लहानपणी पत्रलेखन ठोकळेबाज व्हायचं. आम्ही इकडे खुशाल आहोत, तुम्ही कसे आहात? थोरांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. पत्राचे उत्तर न विसरता पाठवा. आपल्या पत्रोत्तराची वाट पहात आहे. आपला, सुरेश…
मी माध्यमिक शाळेत गेलो आणि पोस्टकार्डची किंमतही वाढून दहा पैसे झाली. पत्रलेखन चालूच होतं. गावाहून येणारी मोठ्या काकांची पत्र, शेतीच्या कामाविषयीची असायची. कधी शेतीचा खर्च भागविण्यासाठी वडिलांकडे, आजीने पैशांची मागणी पत्रातून केलेली असायची.
आजोबा आजारी होते म्हणून वडील गांवी गेले होते. त्यांनी आजोबा जास्त आजारी असल्याचे पत्र पुण्याला पाठविले, ते मिळाले दोन दिवसांनी. मी आणि आई त्वरीत गांवी निघालो, पोहोचलो संध्याकाळी. जाईपर्यंत सर्व आटोपलं होतं. त्याकाळी असं कोणी गेल्याचं पत्राने कळवायचं झाल्यास पत्राच्या वरती ‘श्री’ लिहिलं जातं नसे. असं पत्रं बघताक्षणी काळजाचं पाणी पाणी व्हायचं. कुणी तरी गेल्याची ‘अशुभ वार्ता’ वाचण्याचं धाडस होत नसे.
सदाशिव पेठेत असताना आमचं घर रस्त्यावरच असल्यानं नेहमीचा पोस्टमन सकाळी दहा वाजताच पत्रांचं मोठं बंडल घरात आणून टाकत असे. त्यातील निम्मी पत्रे घेऊन तो दुपारी उरलेली घेऊन जाण्यास परत येत असे. त्याकाळी पोस्टमनला भरपूर काम असे. पत्रं, मनीआॅर्डर, रजिस्टर पत्रे, मासिके, वार्षिक अहवाल, कॅलेंडर, इ. च्या ओझ्यामुळे तो दमून जाई. तार घेऊन येणाऱ्या पोस्टमनबद्दल सर्वांना धास्ती वाटत असे. शहरापेक्षा खेड्यात तार आली म्हणजे कुणीतरी ‘गेल्याची’ बातमी आहे हे नक्की असायचं. लग्न कार्यात ‘आठ नंबर’ची तार म्हणजे ‘शुभेच्छा’ची तार असायची.
पूर्वी शाळेचा रिझल्ट हा एप्रिलच्या शेवटी लागायचा. ज्या मुलाला पेपर अवघड गेले आहेत, त्याला रिझल्टच्या आदल्या दिवशी पोस्टमन घरी येऊच नये असं वाटत रहायचं. पण तो नापास झाला असेल तर पोस्टमन मात्र आपलं कर्तव्य बजावून शाळेचं पोस्टकार्ड घरी टाकून जायचा.
दिवाळीच्या दिवसात शुभेच्छा कार्डांचे गठ्ठे, राखी पौर्णिमेला राख्यांची पाकीटं, संक्रांतीच्या भेटकार्डांना पोस्टमनची पिशवी तोकडी पडायची. कधी एखाद्या केलेल्या कामाचे पैसे मनीआॅर्डरने आले तर पोस्टमन आपल्या डाव्या खिशातून पैसे काढून मोजून द्यायचा. त्याला खुश करण्यासाठी त्याच्या हातावर दहाची नोट ठेवल्यावर तो खुश होऊन जायचा.
२००० नंतर काॅम्प्युटर व इंटरनेटमुळे पोस्टमनचं काम कमी होत गेलं. नंतर मोबाईल आला. पत्रलेखन कधीच संपलेलं होतं, त्याला पूर्णविराम मिळाला. आता कोणीही सातासमुद्रापार असलेल्या माणसाशी बोलू शकतो, त्याला बोलताना पाहू शकतो. व्हाॅटसअपने मजकूर, पत्र, निमंत्रण पाठवू शकतो. ई-मेल करु शकतो.
परिणामी आता पोस्टाला किंवा पोस्टमनला काम असं काहीच राहिलेलं नाही. त्यांच्याकडे वाटपासाठी असणारी पाकीटं कमीच असतात. आता रजिस्टर पार्सलपेक्षा कुरीयरने वस्तू देशात परदेशात पाठविल्या जातात. स्पीडपोस्टचा वापर हा क्वचितच केला जातो.
आता पोस्टकार्ड पन्नास पैशाला मिळत असलं तरी पत्रं लिहिणं, सर्वजण विसरुन गेलेत. मग जग एवढं पुढं गेलेलं असताना पोस्टमन ही व्यक्तीरेखा पुढच्या पिढीला ‘गुगल’मध्येच शोधावी लागेल. काही वर्षांनी आजोबांना त्यांच्या नातवानं ‘दिवाळी पोस्त’ म्हणजे काय? असं विचारलं तर त्यांना वरती लिहिलेलं सर्व ‘रामायण’ त्याला वाचून दाखवावं लागेल.
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२६-११-२०.
Leave a Reply