कितीक गावांच्या अंगणात रमलो
स्थिर कुठेच होऊ शकलो नाही ||
पोटभरू पाखराची भटकंती ती
दानापाणी सरता थांबू शकलो नाही ||
भरभरून दिले त्या माणसांनी
घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही ||
मायेचे झरे या माणसांच्या मनात
दुस्वास त्यांचा करू शकलो नाही ||
साधी भोळी माणसे होती फार ती
माणसांना अंतर देऊ शकलो नाही ||
भाषा वेगळी अडसर नाही भासला
बोललो भाषा ती लिहू शकलो नाही ||
उमेदीच्या वर्षात आधार दिला यांनी
कुणालाच विसरू शकलो नाही ||
त्यांच्या कडून शिकलो थोडे फार
बरोबरी त्यांची करू शकलो नाही ||
— अरुण वि. देशपांडे – पुणे.
9850177342
Leave a Reply