महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील परंतु लेखनविस्ताराच्या भयास्तव केवळ काही मोजकेच पैलू आम्ही येथे देत आहोत.
महाराजांकडून काय शिकावे ?
१) धार्मिक वृत्ती : महाराजांचे बालपण देहू आळंदी नजीकच्या परिसरात गेल्याने, त्यांच्या कानी संत ज्ञानेश्वर, जगतगुरु तुकोबाराय यांचे अभंग, कवने निश्चितच पडत होती. त्यांच्या धार्मिक वृत्ती बद्दल सांगताना गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर म्हणतात, ” सदाचारसंपन्न व धर्मशील मातेच्या सहवासाने महाराजांच्या ठायी धर्मबुद्धी अगदी अल्पवयापासूनच जागृत होऊन तिची वृद्धी कथापुराणादिकांच्या श्रवणाने उत्तरोत्तर होत गेली…… त्याच प्रमाणे मुक्तेश्वर, रामदासस्वामी, वामनपंडित, तुकरामबुवा, जयरामस्वामी, रंगनाथस्वामी, आनंदमूर्ती, केशवस्वामी इत्यादी महासाधू व ग्रंथकार महाराजांचे समकालीन असून, त्यांची कीर्ती व काही कवनेही त्यांच्या कानी वेळो वेळी पडत असत…. ” महाराज यथोचीत दानधर्म देखील करत असत. एकंदरीत त्यांचा स्वभाव हा धार्मिक वृत्तीचा होता.परंतु असे असले तरी ते धर्मवेडे किंवा धर्मांध नव्हते. आजकाल विशेषत: तरुणाईमध्ये धार्मिकतेचा आभाव जाणवतो, अशा तरुणाईने महाराजांकडून धार्मिकता जरूर शिकावी.
२) निष्कपटीपणा व मित्रभाव : महाराजांचा स्वभाव शत्रूंच्या बाबतीत जितका कठोर होता, तितकाच आप्तजनाबाबतीत मृदू होता. एखाद्यावर एकदा का विश्वास दाखवला की, त्याच्याशी कधीही कपटीपणा किंवा धूर्तता मनात ठेवून महाराज कधीही वागले नाहीत. ज्यांना मित्रत्वाचा दर्जा दिला त्यांचा विश्वासघात कधीच केला नाही.
पण फितुरीला मात्र तिथे क्षमा नसे. आपण राजे आहोत, आणि बाकी सारे क्षुद्र आहेत असा दिमाखी दुजाभाव त्यांच्याकडे नसे. कित्येक नियोजित बेत तडीस जाण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांशी प्रांजळपणे बोलत आणि त्यांच्याशी सल्लामसलत करत. स्वकीय, आप्तेष्ट यांच्या कडून कामात झालेल्या चुका ते स्पष्टपणे सांगत आणि प्रसंगी त्यांची कानउघाडणी देखील करत असत. सहकाऱ्यांनी कामात केलेल्या कचुराईमुळे काय नुकसान होऊ शकते हे देखील ते समजून सांगत.
स्वराज्याच्या कार्यात झालेल्या कचुराई बद्दल निवाडा, निर्वाळा करताना, हा आपल्या नात्याचा …. तो गोत्याचा… हा आपल्या जातीचा…. असल्या किनार वापरून कधीही कोणाला पाठीशी घातले नाही. त्यामुळेच कि काय त्यांना अठरापगड जातीचे सवंगडी मिळाले. पण असे असूनही काही व्याख्याते, लेखक महाभाग महाराजांना निधर्मी सिद्ध करतात परंतु त्याचवेळी ते अमुक एका जातीचे कट्टर शत्रू असल्यासारखे भासवतात. याला “विरोधाभास” म्हणावा की या तथाकथित अभ्यासकांनी इतिहासाच्या गळ्याभोवती टाकलेला “फास” म्हणावा तेच समजत नाही.
तर दुसरीकडे उथळपणे शिवचरित्राचे अध्ययन करणारे; शिवरायांच्या निष्कपटी स्वभावाकडे, गुणांकडे केवळ एक सद्वृत्ती म्हणून पाहतात; परंतु एक लक्षात घेतले पाहिजे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या आणि संघटनेचे नेतृत्व करू पाहणाऱ्या प्रत्येकाने महाराजांचा निष्कपटीपणा व मित्रभाव हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. अन्यथा कालान्तराने स्वार्थी, कपटी, उर्मट आणि मग्रूर वागणुकीमुळे सहकारी दुखावतात-दुरावतात आणि शेवटी “एकला चालो रे” म्हणायची वेळ येते.
३) कुटुंबवत्सलता : स्वराज्यसाधनेची अहोरात्र लगबग, प्राणावरचे प्रसंग, ठायी ठायी करावा लागणारा संघर्ष हे अविरत करत असतानाही, त्यांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. माँसाहेब जिजाऊ म्हणजे तर महाराजांचे आदराचे अत्युच्च्य स्थान, शंभूराजांना त्यांनी जसे राजकारणाचे धडे दिले त्याचप्रमाणे त्यांचे संस्कृत पांडित्य पाहून शंभुराजांना संस्कृत शिकण्यास, किंवा साहित्य निर्मिती करण्यास कधीही मज्जाव केला नाही. सईबाईसाहेबांवर तर त्यांचा विशेष जीव असे, असे काही बखरकार म्हणत. शहाजीराजे हे दक्षिणेतच गुंतल्याने शिवरायांना त्यांचा प्रदीर्घ असा सहवास मिळाला नाही परंतु त्यांनी आपल्या पित्याबद्दल कधीही गैरशब्द काढला नाही. त्याकाळी बहुपत्नीत्वाला सामाजिक तथा धार्मिक मान्यता होती त्यामुळे त्यांचा राणीवसा मोठा होता परंतु एक वाचकांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे कि हा राणीवसा महाराजांच्या विवाहित धर्मपत्नीचाच होता, कोण्या यवनी सुलतानाने जोर जबरदस्तीने वाढवलेला जनानखाना नव्हता. त्यांच्या धर्मपत्नीशिवाय इतर कोणत्याही प्रकारे अन्य स्त्री तश्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात आली नाही. कोणत्याही कुटुंबप्रमुखाने महाराजांची ही बाब नक्क्की लक्षात ठेवावी, घरातील कर्त्यापुरुषाचे चारित्र्य हेच कुटुंबाचे भूषण असते.
४) साधेपणा व सज्जनता : महाराज हे लौकिक अर्थाने जरी राजे असले तरी, वृत्तीने मात्र ते एखाद्या योग्याप्रमाणे वागत. त्यांचा पेहराव रुबाबदार परंतु साधा असे त्यामध्ये उगाचच श्रीमंतीचा थाट, दाखवणारा दिमाख नसे. निर्वसनीपणा हा त्यांचा प्रमुख सद्गुण म्हणावा लागेल. रायगड सोडल्यास अन्य कोणतीही भव्य वास्तू त्यांनी स्वतःच्या वास्तव्याकरता म्हणून बांधली नाही. दुर्गराज रायगड देखील स्वराज्याची राजधानी करायची म्हणून रायगडाचा एवढा पसारा एवढा भव्य दिव्य बनवला होता. रायगड सुरक्षित किंवा भव्य बनवण्यामागे देखील ऐष आरामापेक्षा, राजधानीची आणि पर्यायाने राज्याची सुरक्षा हाच हेतू दिसतो. किंवा स्वतःच्या, स्वतःच्या कुटुंबियांच्या नावाने कसलेही महाल, मिनार, मकबरे बांधणे, शहरे वसवणे असले प्रकार केले नाहीत. त्यांनी आपल्या मुला मुलींची सोयरीक करताना देखील सोयरिकांच्या मातब्बरीपेक्षा कर्तबगारीचाच विचार केलेला आढळतो. थातुर मातुर गोष्टींचे सोहळे, स्वतःच्या वाढदिवसाचे समारंभ यांमध्ये महाराज कधीच रमले नाहीत. अगदी स्वतःचा राज्याभिषेक होऊ घातला असतानाही त्यांनी मोहिमा थांबवल्या नाहीत. परंतु मग असे असतानाही राज्याभिषेकाचा एवढा थाट का बरे केला असेल असा प्रश्न वाचकांना पडू शकतो परंतु त्याबद्दल आम्ही शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने सांगूच परंतु तूर्तास एवढेच सांगतो की, महाराजांच्या रूपाने ३०० हुन अधिक वर्षानंतर हिंदवी सिंहासनाची होणारी पुनर्स्थापना ही बाबच त्यावेळी अलौकिक होती आणि म्हणूनच तो सोहळा त्याच डामडौलात होणे आवश्यक होते. वर म्हटल्याप्रमाणे त्यांचा स्वभाव धार्मिक असल्याने, संत सज्जनांची सेवा करण्यात त्यांनी कधीही कचूराई केली नाही. परस्त्रीला नेहमीच माता-भगिनी समान मानूनच तिचा आदर केला, मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून असो किंवा रायबाघन.
५) स्वधर्माभिमान व धर्मनिष्ठा : छत्रपतींचा स्वराज्यसाधनेचा अट्टाहास हा केवळ, भूमी संपादीत करून तेथील प्रजेवर राज्य करणे एवढ्यापुरता मर्यादित होता असे मानणे हे योग्य नाही. स्वराज्य याचा अर्थच मुळी स्व-धर्म, स्व-संस्कृती आणि स्वाभिमान यांवर आधारित आहे असे मला वाटते. दुसरे असे की, शिवरायांना केवळ राज्यलालसा असती, तर तशीही वडिलांकडून मिळालेली जहागिरी होतीच की. त्याच जहागिरीचे विस्तारीकरण करून आपले जीवन, तात्कालीन इतर जहागीरदारांप्रमाणे, हौसे मौजेत घालवणे हे शक्य होतेच की, परंतु केवळ तेवढ्यावर शांत न बसता, स्वधर्मावर होत असणारे हल्ले, त्याची विटंबना थांबवून रयतेला केवळ राजकीय दृष्ट्याच नव्हे तर धार्मिक दृष्ट्याही स्वतंत्र करण्याची प्रेरणा नाकारता येत नाही. त्यांच्या एका पत्रामध्ये महाराज स्वतः लिहितात की ” हे राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे “. तर दुसऱ्या एका पत्रामध्ये ते लिहितात,
” श्री रोहीरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमच्या डोंगर माथ्यावर, पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे, त्याने आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पूरवीणार आहे.”
त्याच प्रमाणे शिवरायांनी संत सज्जनांना, संस्थांनाना, मठाना इनामे दिली आहेत. काही प्रसंगी त्यांनी मशिदीची, पूर्वीपासूनची चालू इनामे तशीच चालू ठेवली होती असेही म्हटले जाते. परंतु एक बाब वाचक लक्षात घेतील की, परधर्माबद्दल सहिष्णुता दाखवण्याकरता स्वधर्माचा यथोचित अभिमान सोडण्याची काहीच आवश्यकता नसते. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे स्वाभिमानी करार आणि निर्लज्ज लाचारी यातील भेद महाराजांना नक्कीच ठाऊक होता. परधर्माबद्दल आदर दाखवताना स्वधर्माचा उपमर्द होउ न देणे हीच खरी सहिष्णुता असे माझे स्पष्ट मत आहे.
खरे तर शिवरायांबद्दल “अगदी थोडक्यात” असे काहीच लिहिता येणार नाही, परंतु लेखन सीमेची मर्यादा पाळणे हे देखील अनिवार्यच असते, म्हणून मला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
खरं सांगू ! लेखनसीमेचे भय हे एक निमित्त पण अखंड महासागराला कधी कोणी ओंजळीत भरून घेऊ शकले आहे काय ? महाराजांची थोरवी देखील अशीच आहे, त्यामुळे हा शिवसागर जेवढा ओंजळीत भरून घेता आला तेवढा आपणा पर्यंत पोहोचवला आहे. या लेखनातील जे जे उत्तम आहे ते ते महाराजांच्या अलौकिकतेचे तेज आहे आणि जे जे अनुचित आहे ते ते आमचे दोषकारणे आहे.
बाकी वाचक सुज्ञ आहेतच. अखेर एवढेच म्हणेन,
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी…. ||
शिवसेवेठाई तत्पर……. रामदासी निरंतर
— श्रीपाद श्रीकांत रामदासी
Leave a Reply