महिमा कसा प्रभू तुझा आगळा,
पावन करसी तूं भक्ताला,
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।।
पुंडलीकाची महान भक्ती,
माता पित्याचे चरणी होती,
त्याची सेवा तुजसी खेचती,
कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
पातिव्रत्य हे दैवत समजूनी,
पतिसेवेला घेई वाहुनी,
सावित्रीने दिले दाखवूनी,
प्रभू वाकती सती शब्दाला, ।।२।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
कांहीं करीती सेवा गुरुची,
मानव सेवा हीच कुणाची,
शक्ती वाढवूनी सत्कर्माची,
पात्र ठरती प्रभू दर्शनाला, ।।३।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply