नवीन लेखन...

प्रबोधन सूर्य : संत तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख


संत तुकाराम म्हणजे देहू गावच्या मोरे – अंबिले घराण्यात जन्म घेतलेला एक सुपुत्र . वोल्होबा आणि कनकाई या मातापित्यांच्या उदरातील एक बालक . शेती – भाती आणि दुकानदारी करणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या कुटुंबाचा वारस . आपणा सर्वांच्या प्रपंचात येणारे दुःख , भोग आणि लौकिकातील आरिष्टांशी झुंज देत जीवनाची लढाई लढणारा एक प्रापंचिक माणूस . सर्वांभूती ईश्वराचं वास्तव्य मानून सर्व जगाच्या कल्याणासाठी , मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील , सहवेदना घेऊन जमलेल्या डोळस श्रद्ध – भक्तीचा पाईक . इहवादी दृष्टीतून लौकिक आणि अलौकिकाचा विवेकनिष्ठ विचार घेऊन सनातनी ब्राह्मणी प्रवृत्तीचा विरोध व अत्याचारांना बळी पडलेला विद्रोही संत . खऱ्या – खोट्याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याची सम्यक बुद्धी असलेला प्रापंचिक भक्त माणूस . वेद , पुरुष नारायण म्हणत , ‘ वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा ‘ असा ठामपणे भूमिका मांडणारा सत्यनिष्ठ विचारवंत .. कर्म – ज्ञान – भक्ती यांचा सगम्य आणि व्यवहारिक लौकिक अर्थ प्रतिपादन करणारा संत – साहित्यिक आणि विचारवंत . अनुभवाशिवाय लिहू नये , जाणल्याशिवाय बोलू नये आणि कृतीशीलतेने प्रश्नांची सोडवणूक करावी . काया – वाचा – मनानं , कृतीशील , जाणिवेतून भक्तीला ज्ञानात्मक पातळीवर शोधणारा जीवनवादी संत . या कर्म – ज्ञान – शक्तीची एकसंध विचारधारा म्हणजे त्यांची अभंगवाणी , ‘ तुकाराम गाथा . ‘ जी बुडाली नाही . म्हणजे या जीवनाच्या भवसागरात तरली अशी अभंग विचारांची खाण म्हणजे त्यांची बुद्धीनिष्ठ विवेकाची वृत्ती . ढोंगीवृत्ती , पाखंडीपणा आणि धर्माच्या नावाखाली सर्व वैभव भोगणाऱ्या भोगवादीवृत्तीवर त्यांनी प्रखर टीका केली . असे धर्मशास्त्राचे व जीवनाचे भाष्यकार . अशा अनेक दृष्टीने संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाच्या कर्तृत्ववान आणि लौकिकचा शोध आणि बोध घ्यावा लागतो .

संत तुकारामांच्या जीवनाकडे आणि विचारवैभवाकडे जात – धर्मादि संकुचित सनातनी विचारांचा परिप्रेक्ष्यातून पाहता येत नाही . अशी व्यापक स्वयंप्रज्ञा आणि विवेकी प्रतिभा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे . चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आणि आचारधर्मात जो धर्माचाराच्या नावाखाली चाललेली लुबाडणूकीचा व्यवहार त्यावर प्रहार करीत त्यांनी ‘ सत्य ‘ मांडले . निर्भीडपणानं त्यांनी जुनाट रूढी- विचार आणि कर्मविपाकातील अवडंबराला कालबाह्य ठरवले . कर्मकांडरहित भक्ती , नामभक्ती आणि ज्ञानात्मक कर्मभक्तीचे प्रतिपादन करीत त्यांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून समाजप्रबोधनाचे अद्वितीय कार्य आरंभले . ‘ बुडती हे जन देखवेना डोळा , म्हणुनी वक्रवळी येतसे ‘ या भूमिकेतून त्यांनी अज्ञान – पाखंडादि विचारांवर शब्दांनी प्रहार केला . स्वयंज्ञानी होण्यासाठीचा जीवनवादी वास्तवाचा त्यांचा अभ्यास त्यांनी सोप्या सहज भाषेत मांडला . त्यामुळे वेदांचा सार आणि अडाणी लोकांना कळला तर आपली परंपरागत उच्चभ्रू दुकानदारी बंद होईल अशी भीती मंबाजीसारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीला वाटणे साहजिक होते म्हणून त्यांनी संत तुकारामांच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण केले . परंतु त्यांचा तुकाराम द्वेष ‘ सत्यचिंतन आणि शाश्वत मूल्याधिष्ठित विचारांच्या पुढे टिकला नाही हाच निष्कर्ष सार्वकालिक ठरतो . ब्राह्मण वैष्णवांना , शूद्र वैष्णवांना तुकाराम हे आपले गुरू करण्यात जो कमीपणा वाटत होता तो केवळ सनातनी उच्चभ्रू अशा खोट्या दांभिकतेचा अहंकार होता . म्हणून जेव्हा आपण रामेश्वर भट्टांच्या वैचारिक परिवर्तनाचा आलेख लक्षात घेतो , तेव्हा रामेश्वर भट्टांनी ज्ञानोबा – तुकाराम या वारकरी परंपरेचा स्वीकार केला . त्यांनी तुकारामांना गुरूस्थानी मानले . संत बहिणाबाई ही शिष्या अशीच विचारांतून घडत गेली . ‘ गुरूत्व ही ब्राह्मणांची मिरासदारी आहे असा दृढ समज असल्याने ( मंबाजी ) तुकारामांचा द्वेष करू लागला . खरे तर तुकारामांना गुरूत्व नको होते . ते गुरूबाजीच्या विरुद्ध होते . पण लोकच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध गुरु मानत होते . हे सदानंद मोरे यांचे विधान महत्त्वाचे वाटते . ( तुकाराम दर्शन , पृष्ठ १५ ) संत ज्ञानेश्वरांनी ‘ इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु वारी ‘ असे प्रतिज्ञामय वचन प्रबोधन परंपरेत मांडले . याच विद्येचे पाईक बहुजनांच्या प्रबोधनासाठी म्हणतात , ‘ शब्द हेच धन | शब्द म्हणजे जीवन , शब्द म्हणजे शस्त्र , शब्द हेच धन ! ‘ कारण शब्दांनीच मानवजागृती होते , शब्दांनीच चिंतनगर्भ विचार प्रकटीकरण होते . शब्दांनीच माणसं बांधली जातात ; शब्दांतूनच ज्ञानात्मक भक्तीचा कर्ममय मार्ग सापडतो . त्यातून जे फळ मिळते ते कर्ममय ईश्वराचा लौकिक साक्षात्कार असे त्यांना सुचवायचे आहे .

आम्हां घरी धन शब्दाचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोकां ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करू || ( गाथा ३३९६ )

शब्दांनी माणूस जागवण्याचा , प्रबोधनाचा मार्ग संत तुकारामांनी जोपासला . त्यांची ‘ अभंगगाथा ‘ म्हणजे मराठीतल्या बहुजनांचा वेद , बहुजनांचे ज्ञानमय संचित असं म्हणता येईल . उपनिषद आणि पुराणकारांनी जे जे चुकीच्या पद्धतीने रूजवण्याचा प्रयत्न केला त्याची वास्तव जीवनवादी चिकित्सा तुकोबांनी केली . म्हणून मराठीतली ही ‘ अभंगगाथा ’ , ही महाराष्ट्र वेद म्हणता येईल . हे विचार , चिंतन आणि जीवनदृष्टी म्हणजे त्यांची अभंगवाणी आहे कारण त्यांनीच म्हटले आहे . नव्हे माझी वाणी पदरीची , मज विश्वंभर बोलावितो , नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणे , जोडिली अक्षरे , नव्हती बुद्धीची उत्तरे , तुका म्हणे झरा अंतरीचा आहे खरा ’ अशी ही त्यांची काव्यनिर्मितीची भूमिकाच त्यांनी सांगितली . म्हणूनच तुकोबांनी वचनामृत अशी जीवननिष्ठ विचारांची शिदोरी अडाणी सामान्यजनांना उपलब्ध करून दिली .

जोडूनिया धन उत्तम व्यवहारे , साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा , तुका म्हणे सुवर्ण आम्हा मृत्तिकेसमान , जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती , नाही निर्मळ जीवन काय करील साबण , परकिया नारी माऊली समान , मुलाम्याचे नाणे – नव्हे सोने , सर्वांभूति द्यावे अन्न – द्रव्य पात्र विचारोन , यातायाती धर्म नाही विष्णुसी , बरा कुणबी केलो । नाही तर दंभे असतो मेलो । अशा कितीतरी अभंगांतून त्यांनी ही इहवादी – लौकिक जीवनव्यवहारदृष्टी प्रकट होते . त्यामुळेच दांभिक बढाचारी प्रवृत्तीच्या उच्चपदस्थ धार्मिकांनी त्यांना खूप त्रास दिला . विचारांनीच अविचारांचा पर्दाफाश करणारी तुकोबांची वैचारिक धर्मचिकित्सा तथाकथित पोटभरू वृत्तीच्या धर्म पंडितांना पचली नाही. जेव्हा विचारांची उफराटी दिशा आणि उलटे चक्र फिरते , तेव्हा साम , दाम , दंड भेद नीतीही अपुऱ्या पडतात. अशा वेळी धर्माचे आणि वेदांचे अभ्यासक म्हणवणारे अहंगडाच्या अंधारात , आत्मज्ञानाच्या खोट्या दंभात आणि वर्चस्ववादी धर्माच्या अहंकारात हिंसा – अहिंसा विसरतात . ‘ शत्रू’पदाच्या गर्तेत विचार कुंठतात. अविचारांचे दानवी साम्राज्य तथाकथित विद्वान पंडितांच्या आचारात प्रवेश करते . त्याची प्रचिती ही देहदंडाच्या, मृत्युच्या गर्तेत विचारांची गळचेपी करण्यात होते . देह जाते … विचार अमर असतात . म्हणून तुकोबांचे ‘ अभंग ‘ बुडत नाहीत, त्यांची ‘ गाथा ‘ ही तरंगते . अक्षर होते . शेकडो वर्षे ही वैचारिक शिदोरी पुरून उरते . कधीच सरत नाही . त्यांना संतश्रेष्ठत्वाची उच्च पदवी बहाल करीत जनमानसात अक्षयस्थान प्रदान करते . आज तुकोबांना लोक ओळखतात , मंबाजीलाही ओळखतात . परंतु प्रत्येकाची ओळख किती वेगळी असते हे चाणाक्ष विचार करणाऱ्यांना सांगण्याची गरज भासत नाही .

संत तुकारामांनी अध्यात्मिक , धार्मिक आणि सामाजिक अशा स्तरांवर समाजाला प्रबोधनाचे विचार सांगितले . आध्यात्मिक प्रबोधनात त्यांनी चार वेद , सहा शास्त्रे , उपनिषदे , अठरा पुराणे यांच्या संदर्भातील सुस्पष्ट विचार मांडले आहेत . काही पाठ केली संतांची उत्तरे । अत्यंत आदरे करूनिया | माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि होय गुरूदेव । देही असोनिया देव , वृथा फिरतो निर्देव । देव आहे अंतर्यामी , व्यर्थ हिंडे तीर्थग्मी ।। तुका म्हणे मूढजना , देही देव का पहाना ।।

सेंद्रीय संवेदनांनी देव जाणावा , बोलण्याच्या नादाचा शक्तीत देव बघावा , मन – बुद्धीसह तेजशक्ती देणारा तोच आहे . तो सर्वांभूती असतो असा विठ्ठल स्वतःच्या आत शोधावा असे साधे सरळ आध्यात्मिक प्रबोधन करून त्यांनी ‘ बुडती हे जन देखवे ना डोळा ‘ या दृष्टीने लाभावीण प्रीतीसाठी कळवळ्याच्या जातीसाठी प्रार्थना हेच प्रबोधन मानले होते . अणू रेणूपेक्षा सूक्ष्म असे अस्तित्वाचा विचार मांडून त्यांनी ‘ तुका आकाशा एवढा ‘ असा अनुभव मांडलेला दिसतो . पंचमहाभूते , सेंद्रीय संवेदना आणि जळीस्थळीकाष्ठी पाषाणी असे देवाचे स्वरूप तुकोबांनी प्रबोधनात्मक दृष्टीने मांडले . ‘ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । एरांनी वहावा भार सारा । ’ असे म्हणताना तुकोबांनी समानता , जीवशिवाचे ऐक्य , असा आत्मौपम्य आध्यात्मिक विचार सांगितला आहे . विश्वात्मक परमेश्वराची आपण सारी लेकरं , जनीजनार्दन असल्याची भावना , स्वतःच विठ्ठल होऊन एकरूप होण्याची त्यांची दृष्टी ही ‘ स्वयंभू ‘ आहे असा संदेश देणारी आहे .

द्वैताद्वैत भावे । अवघे व्यापियले देवे ।
तुका म्हणे हरि । आम्हामाजि क्रीडा करी ।
विठ्ठल हाच माय , बाप , चुलता – बंधु ।

सर्व भेदांना बाजूस करून आध्यात्माचा शोध घेत तुकोबांनी ‘ हरि आणि हर ‘ यांचे एकात्म दर्शन घडवले .

हरिहरा भेद । नाही करूं नये वाद ।।
एकएकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ।।
भेदकासी वांड । एक वेलांटीच आड ।।
उगवे वामांग । तुका म्हणे एकची अंग ।।

विठ्ठलभक्तीत ‘ हरि + हर ‘ यांचा मिलाफ वारकरी मानतात . तो भक्तीचा मळा हेच आध्यात्म प्रबोधन तुकोबांनी मांडले आहे . ‘ पंढरी ‘ हे भूवैकुंठ असून विठोबा ‘ हे दैवत आणि सारे ‘ विश्व सोयरे ‘ असा विश्वंभर विश्वव्यापक स्वरूपाचे आध्यात्म त्यांनी रोखठोक सुस्पष्टपणे मांडले . त्यामुळे जनसामान्यांना सहज सोपे आध्यात्म सांगणे हेच त्यांचे अध्यात्मिक प्रबोधनाचे कार्य म्हटले पाहिजे . नामभक्ती , ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती पुढे कर्मकांड कसे कष्टप्रद आहे याचा सोपा सिद्धान्त त्यांनी दिला . त्यांचे अभंग या इहवादी लौकिकातच अलौकिकाचा आध्यात्मिक अर्थ सुस्पष्ट करतात .

आध्यात्म जाणून घेतले की धर्म जाणणे सोपे होते . धर्माची चिकित्सा करणे म्हणजे जीवाशिवाच्या परिप्रेक्ष्यात वैष्णवांचा धर्म म्हणजेच ‘ माणुसकीचा ( मानवता ) धर्म असा प्रबोधनात्मक विचार ते मांडतात . धार्मिक प्रबोधन करताना त्यांनी आत्मज्ञान , स्व जाणीव , परमात्व तापाची जाणीव या माध्यमातून देहापासून देवाचा शोध घेण्याची जाणीव या माध्यमातून ‘ वैष्णव धर्म ‘ सांगितला . जो ‘ मानवता धर्म ‘ म्हणून जाणवतो .

विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ ।

अशी व्यापक , सर्वसमावेशक धर्माची व्याख्या त्यांनी प्रतिपादन केली . अशा माणुसकी धर्माचे क्षेत्र ( विश्व ) म्हणजे पंढरी , ज्याला ते भूवैकुंठ म्हणतात . तीर्थक्षेत्रापेक्षा ‘ भूवैकुंठ ‘ ही व्यापक संकल्पना आहे . म्हणूनच म्हणतात की , तीर्थी धोंडा पाणी । विठ्ठल रोकडा सज्जनी । जपजाप्य विधी , कर्मकांडापेक्षा शोषण विरहित मानवता धर्म त्यांनी प्रतिपादन केला .

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ।
दयाक्षमाशांती तेथे देवाची वसती ।
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती ।
नाही निर्मळ जीवन काय करील साबण |
तुका म्हणे तोचि संत , सोसी जगाचे आघात ।
न लगे मुक्ति आणि संपदा , संत संग देई सदा ।
जे कां रंजले गांजले , त्यांसि म्हणे जो आपुले ।

अशा विविध अभंगातून त्यांनी माणुसकी धर्माची , लौकिक आचारधर्माची , सात्विक विचार धर्माची पाठराखण केलेली आहे . या धर्माचे रक्षण करण्यासाठीच हा मानवी जन्म आहे . सर्वांभूती परमेश्वर मानणारा ‘ मानवता धर्म ‘ श्रेष्ठ असल्याची प्रचिती त्यांनी प्रतिपादन केली . ‘ पाखंडी ‘ लोकांनी देव – धर्माच्या नावाखाली जो उच्छाद मांडला त्याचा निकित्सक परामर्श तुकोबांनी घेतला . ‘ विठ्ठल ( पांडुरंग ) मध्यवर्ती ठेवून त्यांनी एकेश्वरवादी विचारांतून धर्म प्रबोधनाचे ऐहिक विचार मांडले . शेंदरी दैवते , अनेक देव – दैवतांची विखुरलेली पूजा – विधी कसे कर्मकांडात्मक ठरतात याचा वैचारिक चिकित्सा करताना त्यांनी अनिष्ट प्रथा प्रवृत्तींवर टीका केली . तीर्थक्षेत्र , तीर्थयात्रा , पर्वणी , दानधर्म दक्षिणा , उद्यापने , उपवास , पूजाअर्चा इत्यादि भक्तीमार्गात कर्मकांडाचा अतिरेक होऊन पाप – पुण्याच्या चुकीच्या भ्रमात भक्त कसा अडकतो याचे वर्णन आणि वास्तव दर्शन तुकोबांनी घडवले आहे . त्यामुळेच मंबाजी प्रवृत्तीचा विरोध सहन करीत त्यांना भोगावे – सोसावे लागले . हे प्रबोधनाचे विचार तत्कालीन कालबाह्य परंपरावादी भोंदू प्रवृत्तींना पचणे शक्य नव्हते . त्यासाठी तुकोबा म्हणतात

मान दंभ पोटासाठी । केली अक्षरांची आटी ।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।।

सर्वांभूती प्रेम हाच विश्वधर्म , माणसाने माणसाशी भेदभाव निरहित असे माणुसकीने वागावे हाच माणुसकी धर्म आहे . आत्मशोध घेऊन सत्यासत्य विवेकाने चारित्र्य घडवावे . देह – आत्मा आणि आचारधर्माचे पालन करावे . सेवामय कर्मातून मोक्षाचा , स्वमुक्तीचा मार्ग शोधावा . भ्रांत कल्पना , कर्मकांडापेक्षा ‘ एकांतात आपुलाची वाद आपणासी ‘ अशा भक्तीने देव जपावा . ‘ तुज आहे तुजपासी परि जागा विसरलाशी । ‘ या भूमिकेतून आत्मधर्म पालन करून मानवता धर्माचे रक्षण करावे असे धार्मिक प्रबोधन त्यांनी केले आहे . शरीर सुदृढ ठेवावे , मन शांत व सुचितापूर्ण राखावे . आत्म स्वरूपात देव जाणावा , प्रत्येक कर्मात विठ्ठलाची जाणीव ठेवावी . विश्वव्यापक होऊन जगाकडे पहावे . म्हणजे द्वेष – मत्सर गळून पडावा . असा आध्यात्मिक धर्माचा साक्षात इहलोकीचा अनुभव प्रकृतीपासून शिकावा . विकृती झडून गेली , प्रकृती निकोप झाली की संस्कृती संवर्धन होते . तोच माणुसाने जोपासलेला ‘ मानवता धर्म ‘ असे सावधानात्मक विचार म्हणजेच तुकोबांचे धार्मिक प्रबोधन आहे .

आध्यात्म कळले की खरा धर्म आकलन होतो . तदनंतर आत्मनिष्ठता गळाली की समष्ठिनिष्ठा जोपासली जाते . या दृष्टीने संत तुकारामांच्या सामाजिक प्रबोधनावर बघावे लागते . जात – पंथ – वंश – धर्म हे मानवनिर्मित आहेत . त्यातूनच समाज निर्माण होतो . तो समष्टीच्या अनुभव , भावना , कल्पनांचा सारांश असतो . लोक परंपरा , रीतीरिवाज , चालीरीती , लोकाचार , विधी – कायदे , लोकविधी निषेध , अशा अनेक सामाजिक जडणघडणी होऊन ‘ समाज ‘ तयार होतो . त्यातील श्रद्धा – अंधश्रद्धा इत्यादिंमुळे समाजात जुन्या नव्या मीलनाची जडणघडण होत असते . संतांनी यातील जातीभेदाभेद – पंथभेद , स्त्रीपुरुष भेदाभेदांच्या कालबाह्य घटनांची चिकित्सा केली . नीतीनियम , आचार धर्माच्या दृष्टीने समाजाचे कल्याण म्हणजे हितचिंतन तुकोबांनी डोळसपणाने केले . हेच त्यांचे विचार सामाजिक प्रबोधनाला दिशा देणारे ठरतात . अंगात येणे , भूतप्रेत पिशाच्च मानणे , देव्हारा अंधपणाने पूजणे, नवसायास करणे , जटा वाढवून , शकून अपशकुनाच्या गोष्टी करणे , शेंदूर फासून दगड पूजणे, विवेक सोडून अंधश्रद्धा वृत्ती जोपासणे यासारख्या कर्मकांडावर त्यांनी डोळस भक्तीच्या माध्यमातून प्रहार केला . अडाणी जनांना बुडताना पाहून त्यांना कळवळा येत होता . त्यासाठी त्यांनी नैतिक वर्तन , डोळस विवेकी ज्ञान , चारित्र्यसंपन्नता कशी वाढवावी असा उपदश अभंगवाणीतून समाजाला केला . हे त्यांचे दिशादर्शक विचार म्हणजेच समाजप्रबोधनाचा मार्ग ठरतात . उत्तम व्यवहार करून कोणलाही न फसवता , कष्टाने धन कसे मिळवावे, स्वकष्टाचे मोल जाणावे , दुसऱ्याचे शोषण करू नये असेच त्यांनी सुचविले आहे .

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।
उदास विचारे वेच करी ।।
आमचि गती तो एक पावेल ।
उत्तम भोगील जीवखाणी ।।

असे सुजाण विचाराचे , नैतिक कर्माचे चिंतन करीत त्यांनी समाजातील अनिष्टतेला नाकारले . सुष्टांची पाठराखण आणि दुष्टांचा निषेध करणारी त्यांची लेखणी म्हटली पाहिजे .

नवसे कन्या पुत्र होती ।
तरी का करणे लागे पती ।
तुका म्हणे मैंद । नाही त्यापाशी गोविंद ।
आणिकांच्या कोपतो मना ।
निष्ठुरपणा पार नाही ।
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा ।
थोरली ती पीडा रिद्धीसिद्धी ।।
लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ।

समाजाचा नैतिकतेचा सज्जनतेच्या आणि उत्तम व्यवहाराचा आदर्श देऊन , तुकोबांनी समाजाला जागृत केले . भक्तिमार्गातही काही संधीसाधू गुरू आणि स्वार्थापुरत्या असतात .

असा आचारधर्म सांगून त्यांनी निःस्वार्थ भक्ती सेवा म्हणजेच ईश्वराचे कार्य जाणावे , जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली . सत्याची कास धरावी , दांभिकपणा टाकून द्यावा , स्वार्थत्याग करावा , आर्थिक व्यवहार उत्तम करावे , समाजात दक्षता जपावी , सतत सावध स्वस्थचित्त रहावे , प्रेम – करुणा भक्तीमार्गाची जोपासना करावी असा उपदेश / सूचना त्यांनी केल्या आहेत .

संत तुकाराम हे डोळस , ज्ञानी – विवेकी वृत्तीचे संत होते . त्यांचे प्रबोधन हे बहुआयामी वैशिष्ट्यपूर्ण असे होते . त्यांची ईश्वरनिष्ठा ही जननिष्ठापूर्ण होती संत सज्जनांना पारखून घेऊन त्यांचे योग्य अनुसरण करण्याची दिशादर्शक सूचना त्यांनी जनतेला केली. जनहित दक्षता , ज्ञानासह सत्यनिष्ठ विवेकाची भूमिका त्यांनी मांडली . समाजाच्या वर्तनात सकारात्मक असा कर्मशील कृतीशील बदल घडावा आणि प्रबोधनातून समर्पक परिवर्तन घडावे , हा त्यांचा ध्यास होता . निर्भीडपणा , सुस्पष्ट विचार , आक्रमक भाषाशैली , सुत्रबद्ध विषय प्रतिपादन , अल्पाक्षरात व्यापक विचार मांडण्याची पद्धती , नैतिक मूल्यनिष्ठ कालातीत विचार शाश्वताच्या पार्श्वभूमीवर मांडण्याची त्यांची चिरंतनता लक्षात येते विद्रोही , द्रष्टे , स्पष्टवक्ते , रोखठोक बाणा , इहवादी दृष्टी अशा अनेक गुणांचा संचय त्यांच्या ज्ञान – भक्ती आणि कर्ममय जीवनात आढळतो . त्यांचे विचार अज्ञानी कर्मकांडी जनातील दांभिकांनी, स्वयंघोषित उच्चवर्णीय ज्ञानी जनांना आवडले नाहीत . ते टीकात्मक विचार आपले शत्रू मानून त्यांनी संत तुकारामांचा अनन्वित छळ केला . त्यांचा स्वार्थ दुखावला त्यांनी शत्रूत्व निर्माण केले. परंतु तुकारामांच्या मनात वेगळेच शत्रू होते ; त्यांनी ‘ षड्रिपूंना ‘ शत्रू मानले होते . आध्यात्म, धर्म आणि समाजाची परखड – रोखठोक निकित्सा करणारे संत तुकाराम देहाने गेले परंतु विचारांनी – वाङ्मयाने ‘ अभंग ‘ राहिले . त्यांच्या विचारांचे अमरत्व ! अक्षरत्व ! कालातीत राहिले. ते मंबाजी प्रवृत्तीला मिटवता येणार नाही ; हेच खरे ! आजही त्यांची गरज समाजाला आहे.

— प्राचार्य किसन पाटील,
जळगाव

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..