कधीतरी पत्नीशी बोलताना मी त्यातील एक ओळ गुणगुणलो होतो- ” वो पाप नहीं होता, जिसे आत्मा ना माने ” ही तशी अध्यात्मिक कल्पना – तिला साहजिकच खूप आवडली. खूप वर्षे, अनेकदा हे गाणे मिळेल तिथे तिने आणि मी ऐकले, पण इतकी सर्वांगसुंदर कल्पना एकाही कडव्यात पुन्हा ऐकू आली नाही- अगदी आशाच्या आवाजातील ओळींमध्येही. एवढे सुंदर काव्य माझ्या बसकी बात नाही तेव्हा सोडून दिला शोध.
काल उगाचच “रफ्तार ” लावला तू -नळीवर ! या ओळी दोन्हीवेळा नव्हत्याच. चित्रपटाच्या शेवटी (अगदी एक मिनिट राहिले असताना) मदनपुरीला गोळी लागते. मौसमीला तो विनवतो- ‘विनोद मेहराशी लग्न करायला.” डॅनी कडून उष्टावली गेलेली मौसमी याला नकार देते आणि मदनपुरी मुकेशच्या स्वरात तिला हे अध्यात्मिक सत्य सांगतो- ” वो पाप नहीं होता, जिसे आत्मा ना माने ! ” पटकन पत्नीला हाकारून हा खूप काळ चाललेला शोध एकदाचा संपविला.
दुसरे मुकेशचे माझे प्रचंड लाडके गाणे – ” जाने कहाँ गये वो दिन ! “. राज कपूरच्या “जोकर” मधील ही दर्दभरी व्यथा (समोर बसलेल्या एकतर्फी प्रेमाच्या तिघींना सांगताना) कोरडा ठक्क मुकेश अवघ्या दोन कडव्यांमध्ये संपवतो आणि आम्ही त्यावरच आजपर्यंत संतुष्ट होतो. एकदा तू -नळीवर कमलेश अवस्थीच्या आवाजातील हे गाणे ऐकले तेव्हा त्याने हातात लागलेली दौलत उधळत जाहीर केले – ” या गाण्याचे आजवर न ऐकलेले एक कडवे ऐका -”
” पत्थर को हमने पूजकर अपना खुदा बनाया था ! ”
स्वर्गवासी मुकेशचे पाय पुन्हा एकदा धरावेसे वाटले.
आणि नुकताच मुख्तार शाहचा एक लाईव्ह शो पाहायला मिळाला. निवेदिका खाडिलकर बाई म्हणाल्या – ” अहो, हे जाने कहाँ चक्क पाच कडव्यांचे हसरत जयपुरी साहेबांनी लिहिले होते, पण जोकर आधीच खूप लांबलचक झाला असल्याने राज कपूरने तीन कडवी उडवली. ” पूर्ण गाणे ऐकून आत्ता कुठे कान तृप्त झाले.
मदन मोहन नामक अवलियाला अशीच खूप गीते रचून ठेवायची सवय होती, यश चोप्रा नामक कानसेनाने संजीव कोहलीच्या हातून तो खजिना ‘वीर -जारा ” मध्ये नव्याने पडद्यावर आणून आपल्या श्रुती धन्य केल्या.
रोशन साहेबांच्या असंख्य चाली त्यांच्या सुपुत्राने (राजेश रोशन ने) त्यांच्या पश्चात खुल्या केल्या. बापाने इतकी सुरेल “विरासत ” मागे ठेवून जाणे, हे मुलासाठी किती धन्यत्वाचे – पोराची जिंदगी बनून गेली.
कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही. शास्त्रीय संगीतातील उस्तादांनी स्वतः निर्मिलेले सगळेच राग/बंदिशी आपल्या कानी पोहोचत नाहीत.
कालचा “इंडियन आयडॉल “मधील संतोष आनंद यांचा व्हिडीओ सगळीकडे फिरतोय. त्यांत नेहाचे सगळेजण कौतुक करताहेत – ” पाच लाख त्यांना दिल्याबद्दल.” पण मला विशाल दादलानी आवडला . त्याने संतोषजींना विनविले –
” मी तुमच्यासाठी एवढेच करू शकतो- तुमच्या काही अप्रसिद्ध रचना असतील तर मी तुमच्या परवानगीने त्यांना चाली लावेन आणि जगापुढे आणीन.”
संतोषजींच्या डोळ्यात दीपज्योती उमलल्या.
मला आस लागलीय – हे सर्ग तरी कधीतरी खरंच प्रकाशात यावेत !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply