नवीन लेखन...

प्रामाणिकपणा

काही कामानिमित्त मी दिल्लीला गेलो होतो. गेल्या आठवडयातलीच ही गोष्ट आहे. माझे काम होते चांदणी चौकात. हा जुन्या दिल्ली चा परिसर. अतिशय गजबजलेला. सतत वर्दळ असलेला. अगदी आपल्या दादर सारखा. अनेक प्रकारची खाण्या पासून कपड्यांपर्यंत, इलेक्ट्रोनिक – इलेक्ट्रिक – प्लास्टिक – चष्मे सारे काही इथे उपलब्ध आहे. कोणत्याही वेळी इथे ट्राफिक खचाखच भरलेला असतो. चालणारे, ऑटोवाले, कार घेवून जाणारे, छोटे टेम्पो वाहतूक करणारे आणि सायकल रिक्षावाले ह्या सर्वानी हा रस्ता भरून वहात असतो – त्यात जास्त संख्या असते ती चालणार्यांची आणि सायकल रिक्षा चालवणार्यांची!

मला जायचे होते ह्या चौकातील गुरुद्वारा पासून फतेपूरी मशीदिपर्यंत. अंतर तसे ऑटो ने ५ मिनिटाचे. ज्या   ठिकाणी जायचे होते तेथे काम होते एक दीड तासाचे आणि परत मला मशीदीपासून गुरुद्वारा कडे यायचे होते. टक्सी – कार – ऑटो  संध्याकाळच्या वेळी घेवून जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे एक सायकल रिक्षा पकडली. एक वृद्ध गृहस्थ ती चालवत होता. खर तर सायकल रिक्षा मध्ये बसायची माझी ती पहिलीच वेळ होती. माणसाला माणसाने ओढत घेवून जायचे हे मनाला पटत न्हवते. मला सायकल रिक्षा पाहिल्यावर का कोण जाणे  बलराज सहानी चा “दो बिघा जमीन” मधला उर फुटेस्तो धावणारा  सायकल रिक्षावाला आठवत असे – आणि  आताही तो आठवला कारण हा गृहस्थ पण तसाच वृध्द, ६५-७० वयाचा, मळलेले धोतर आणि बंडी घातलेला आणि कृश शरीरयष्टीचा होता.  गुरुद्वारा कडून मशिदीकडे जाण्याचे उत्तम साधन म्हणजे सायकल रिक्षा असे माझ्या मित्राने पण सांगितले होते त्यामुळे नाइलाजाने मी त्या वृद्ध सायकल रिक्षावाल्याला थांबवले. त्याला माझा हेतू सांगितला – मला इथून मशिदीकडे कायचे आहे आणि परत गुरूद्वाराकडे  दीड तासाने यायचे आहे – जिथून मग मी माझ्या कार ने पुढे नवी दिल्ली ला जाणार आहे – किती घेणार? त्याने जायचे २० आणि यायचे २० असे ४० रुपये सांगितले आणि मधल्या एक तासात तो दुसरे भाडे मारून मला पुन्हा घ्यायला दीड तासाने हजार होईल असे म्हणाला – मी मान्य केले आणि त्याच्या रिक्षात बसलो – तो म्हणाला गुरुद्वारा ते मशीद हा जेमतेम १० मिनिटाचा प्रवास आहे.
त्या अफाट गर्दीतून तो आपली सायकल रिक्षा हाणू लागला – कधी पायडल वर उभे रहात तर कधी सीट वर बसत आणि मध्ये – मागून येणार्या माणसांवर आणि वाहानांवर ओरडत. मशिदीकडे पोचल्यावर मी त्याला मला दीड तासाने कुठून पिक अप करायचे ते ठिकाण दाखवले आणि त्याने यायचे मान्य करून निघून गेला. पैसे नंतर एकदम  द्या म्हणाला. बरोबर दीड तासाने तो झाला हजार झाला – माझेही काम झाली होते त्यामुळे मी परत निघालो. पुन्हा परतीचा पण तसाच प्रवास – गर्दीतून हाय ह्याक करत त्याने मला गुरूद्वारापाशी सोडले.
त्या दोन खेपांच्या छोट्या सायकल सवारीमध्ये मी त्याच्याशी संवाद साधून त्याची माहिती काढली.  त्याचे नाव रामशरण होते. यु पी च्या आसपास गाव होते जिथे त्याची काही जमीन आहे. त्याला दोन मुले – एक मुलगी आणि एक मुलगा – कर्ज काढून मुलीचे लग्न लावून दिलेले आणि मुलगा एका टूरिस्ट कंपनीत ड्रायवर. घरवाली देवाघरी गेल्याने एकटा पडलेला – आणि मुलाकडे दिल्ली मध्ये रहात होता. गावाकडे ४-५ एकर जमीन होती – मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी त्या जमिनीचा तुकडा विकलेला. उरलेली जमीन वर्षाला १५००० देण्याच्या करारावर कसायला दिलेली – त्याचे पैसे घ्यायला म्हणून दर वर्षी गावाकडे जायचा. आता ह्या वयात सुद्धा मुलावर भार नको म्हणून स्वत: सायकल रिक्षा दोन शिफ्ट मध्ये सकाळी ८-१२ आणि संध्याकाळी ५ ते ८ चालवत होता – मुलगा नको म्हणत असला तरी.  जोपर्यंत हात पाय चालतील तोपर्यंत काम करत रहाणार असे मत त्याने व्यक्त करताना म्हटले होते   “अपने कमाई का खाने का संतोष कुछ अलग ही हैं।” आताशा पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत – पोलिस खूप त्रास देतात – पूर्वी अतिरेकी – स्फोट – ह्यासारख्या काळज्या न्हवत्या. पूर्वी  शेजारचा माणूस किंवा  प्यासेंजर कसा आहे आणि काय घेवून जात आहे ह्या सारख्या गोष्टींवर संशय घेण्याचे कारण न्हवते आज तशी परिस्थिती नाही. अब तो मैं बुढा हो गया  हू – कब दुनिया से उठ जाऊ – पता नही। मेरे बाद गांव की जमीन रहेगी इसका  कोई भरोसा नही। हमारे गांव मी तो जिते जी जमीन हडप लेते है तो मेरे बाद हम बिना जमीन के हो जायेंगे।

त्याने जेव्हा मला गुरूद्वारापाशी सोडले त्यावेळी मी त्याला ५० रुपये दिले. त्याच्याकडे सुट्टे न्हवते. मी त्याला १० रुपये ठेवून घे असे म्हटले.  ” दस रुपये से मैं गरीब नही हो जावूंगा।” मी म्हटले. ” साब इस दास रुपये से मैं भी तो अमीर नही बनूंगा ।” तो म्हणाला. मी म्हटले ” वेटिंग चार्ज समाज के रख  लो ।” त्यावर “नाही साब उस दरम्यान तो मैने दो चक्कर लगाके पैसे कमाये हैं, और वैसे भी किसी का कर्जा नही सर पे लेने  का ।” मी त्याला म्हटले आता तू दोन चकरा मारल्यास त्याचे पैसे तुझ्याकडे असतील त्यातले मला देवून टाक – नसतील तरी ओ के – मी निघालो म्हणून मी माझ्या कार ड्रायवर ला शोधू लागलो. त्यावर त्याने त्याच्या कडे ५०-५० च्या दोन नोटा असल्याचे दाखवले. मग तो जवळच रगडा विकणार्या कडे जावून सुट्टे घेवून आला आणि त्या गर्दीतून ट्राफिक मुळे हळू हळू चालणार्या आमच्या कार कडे आला – काचेवर टिक टिक  करून मला काच  उघडायला  लावली आणि “ये लो साब दस रुपये” म्हणून नोट आत सोडली आणि सलाम करून आपल्या रिक्षाकडे लगबगीने निघून गेला. मी त्याच्याकडे पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिलो आणि माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू  झाले. मला एकदम प्रभादेवी च्या जत्रेतील ३०-४० वर्षापूर्वीची अशीच घटना आठवली. त्यावेळी मला आठवते  मी जत्रेत रस्त्यावर विक्री  बसलेल्या एका वृद्ध बाई कडून काही खरेदी केली होती आणि तिला मला १ रुपया परत द्यायचा होता. तो तिच्याकडे त्यावेळी नसल्याने मी ” असू  द्या – ठेवा तुम्हाला तुम्हाला आजी”  म्हटले आणि पुढे  गेलो. साधारण एक तासानंतर जत्रेतून घरी परतताना त्या आजीने मला लक्षात लक्षात ठेवून – हाक मारून बोलावले, आणि म्हणाली ” ए बाबा – ये इकड – हे तुझे पैसें द्यायचे राहीले होते – घेवून जा बाबा”. खर तर मी ते  विसरून गेलो होतो. मी तिला म्हटले ” आजी काय गरज होती परत करायची? ठेवून द्यायचे होते – नातवाला बिस्कीट घेवून जायची होतीत”. त्यावर ती म्हणाली ” बाबा पैसा  हाय ह्यो – कष्टाचा पैसा कमवायला मेहनत पडते, राबावे लागते; तू  सदबुद्धीने मला दिला पण मी श्रमजीवी बाई – मला कुणाचे ऋण नको आता, माझं काय .. अर्धी अर्धी लाकड  म्हसणात – कोणाचे कर्ज न्हाई ठेवायचे मला. पैसा जपून वापर र बाबा, ह्यो घे तुझा एक रुपाया” असे म्हणत तिने रुपया परत  केला. मी तो घेतला. मला त्या आजीचं कौतुक वाटलं. तिने पैसे परत करण्यासाठी मला लक्षात ठेवले होते ; तिला माहीत होते कि हा बाबा  परत जाणार आहे आणि त्याचा परतीचा रस्ता इथूनच असणार आहे  कारण दुसरा रस्ताच न्हवता. मी तर त्या पैशाची  अपेक्षा ठेवली न्हवती पण तिने हे परत करायला हवेत ह्याची जाणीव मात्र ठेवली होती.

ह्या दोन्ही घटनांमध्ये काय दिसून आले? दोन्ही व्यक्ती सर्वसाधारण होत्या. पैशाने श्रीमंत न्हवत्या. शिकलेल्या न्हवत्या. पण सच्छील वृत्ती होती, प्रामाणीकपणा होता, सामाजिक भान होते, निर्लेपता होती , दुसर्याची कदर होती,दुसर्याची वस्तू हडप करायचा मोह न्हवता. त्यांच्या कडे चांगला ” अटिट्युड ” होता.  रामशरण तर आपली गावची जमीन आपल्यानंतर हडप केली जाणार ह्या शंकेने व्याकूळ आणि हताश होता आणि त्याचा बदला म्हणून दुसर्याना पण लुटूया अशी सूडभावना न्हवती. दोघे शिकलेले न्हवते, म्हणजे शिक्षणाचा हा परिणाम नक्कीच न्हवता – मग काय? संस्कार? की त्यांच्या पिढीने जे नेते आणि त्यावेळची जी माणसे पाहिली त्यांचे आदर्श त्यांच्या समोर होते ? चांगल्या अथवा आदर्श नागरिकाचे गुण त्यांच्यात कुठून आले? आज शाळेत पण नागरिक शास्त्र विषय फक्त नावाला असतो; खास शिकवले जात नाही – फक्त २० मार्कांचा नागरिक शास्त्राचा पेपर! तो ऑप्शन ला टाकला तरी काही फरक पडत नाही अशा परिस्थितीत नागरिकशास्त्र शिकणार कोण आणि कशाला? नागरीकशास्त्रावर साधे साधे प्रश्न विचारले तरी भल्या भल्यांची “विकेट” जाईल. शाळेत अशी परिस्थिती असल्यावर चांगले नागरिक होणार कसे? साधे साधे एटिकेट्स आपण सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी सोयीस्कर पणे विसरून जातो.

आज एखाद्या रिक्षावाल्याने हरवलेली वस्तू परत केली की पेपर मध्ये  येते. प्रामाणिक वृती प्रोत्साहित करण्यासाठी अशा गोष्टी आवश्यक आहेत. आजची पिढी शिक्षित आहे – थोडे संस्कार, थोडी शिस्त, थोडे सामाजिक ऋण ह्या सर्वांची जाणीव ह्या पिढी ला  दिली तर ते चांगले नागरिक बनतील. चांगले नागरिक समाज बनवतात आणि प्रगत देश  घडवतात. मला शाळेत लहानपणी शिक्षकांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते – त्यावळी युरोप मध्ये म्हणे सकाळी नाक्या नाक्या वर वर्मानपत्राचे गठ्ठे आणि एक पेटी ठेवली जाई.  ज्याला जो पाहिजे त्या पेपराचे पैसे त्या पेटीत ठेवायचे आणि पेपर घेऊन जायचा! आम्हाला तर ही परिकथा वाटायची? खरंच असे घडत असेल का  तिकडे? मग सर विचारायचे “समजा  आपल्या दादर च्या नाक्यावर असा प्रयोग केला तर काय  होईल? आंम्ही सर्व मुले  एका सुरात सुरात ओरडायचो ” सर – पेपर पण जातील आणि पेटीही – एक पैसा कोणी ठेवणार नाही”. सर  हसायचे – म्हणायचे खरे आहे पण नंतर गंभीर होवून सांगू लागायचे – “तुमच्यातला निदान एक जण  म्हणायला हवा होता की सर मी पैसे ठेवीन आणि पेपर घेवून जाईन – एकही जण तसे म्हणाला नाही. ही चांगल्या नागरिकाची लक्षणे नाहीत – असे तुम्ही वागलात तर आपला देश पुढे येणार कधी आणि युरोपीय देशांच्या मांडीला मांडी लावून बसणार कधी?” आम्ही खजील होवून जायचो. आमचे उत्तर कशाचा परिपाक होता? शिक्षणाचा?  संस्काराचा? आजूबाजूच्या  परिस्थितीचा आणि त्यात वावरणार्या नातेवाईक, भाई – भाऊ आणि  मित्र परिवारांचा? सर म्हणायचे – “विचार करा – तुम्ही असे उत्तर का दिले? भले आजुबाजूचे कसेही वागेनात – तुम्ही चांगले  वागा; स्वत: मध्ये बदल घडवून आणा, सुजाण  नागरिक व्हा आणि देश पुढे न्या. सुजाण नागरिक होण्यासाठी सुशिक्षित होणे जरुरी नाही पण सामाजिक जाण असणे आवश्यक आहे “. नागरिक शास्त्राचे हे असे धडे आम्हाला शाळेत शिक्षक  देत राहिले. आज सर्वत्र भ्रष्टाचार आहे, लोभ आहे, दुसर्याचे गिळंकृत करण्याची वृती आहे, आदर्श ठेवावा असे नेते नाहीत तरीही  वरच्या घटनेतले अशिक्षित रामशरण आणि आजी  इतरांपेक्षा वेगळे  आहेत. का? त्यांनी स्वत: मध्ये बदल  घडवून आणला आहे म्हणून?

लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली  जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या  कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते?

— प्रकाश दिगंबर सावंत

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..