नवीन लेखन...

खलनायक नही नायक हूं मै : प्राण

आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त व्हायला आणखी २७ वर्षांचा कालावधी होता. दिल्लीतल्या बल्लीमारन या वस्तीत नेहमी प्रमाणेच धावपळ असायची. माणसांची गर्दी, कामाच्या ओढीने बाहेर पडणारे जथ्थे, हातगाडी वाले, मध्येच वाजणाऱ्या सायकलरिक्षांच्या घंटा वगैरे..काहीशा अंधारलेल्या या गल्लीच्या शेवटी काही जुन्या उदासिन हवेल्या पण होत्या. आताही आहेत. अशा प्रकारची एकतरी गल्ली भारतातील सर्वच शहरात आजही आढळते. “सौदागरन” अशी पाटी असलेला एक मार्ग आजही जुन्या दिल्लीतल्या या भागात आहे. तर याच मार्गाच्या गल्लीत लाला केवल किशन सिंकद यांनी एक घर भाड्याने घेतले होते. लाला व्यवसायाने इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर त्यामूळे बऱ्यापैकी श्रीमंत. याच घरात १३ जुलै रोजी आजच्या आपल्या या कथेचा नायक जन्मला. चार भाऊ आणि तिन बहिणीपैकी एक. १९२० मध्ये लाला केवल किशन आणि आई रामेश्वरी यांच्या स्वप्नातही आले नसेल की आपण ज्या मुलांचे नाव प्राण किशन ठेवणार आहोत त्याची अशी ख्याती होणार आहे की किमान तीन ते चार दशके माता पिता आपल्या मुलाचे “प्राण” हे नाव कधीच ठेवणार नाहीत.

आपल्या जबरदस्त अभिनयाने नायकांचाही थरकाप उडवणाऱ्या खलनायकाचा जन्म झाला होता आणि भारतीय चित्रपटसृष्टीला त्याचा पत्ताच नव्हता. वडीलांचा व्यवसाय ठेकेदारीचा असल्यामुळे त्यांना वारंवार शहरं बदलावी लागत. लाला उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आले. मग तेथील एका शाळेत लहानग्या प्राणकिशनचे प्रायमरी शिक्षण झाले. पुन्हा वडीलांना रामपूरला घर बदलावे लागले. तेथील हमिद इंटर कॉलेजमध्ये हायस्कूल मधून हायस्कूल पर्यंत शिक्षण प्राणकिशनने पूर्ण केले. नंतर मात्र प्राणकिशन शिक्षणाच्या नादी लागलाच नाही. पतंगबाजी आणि फोटोग्राफी हा त्याचा आवडता छंद.

पतंगबाजीमुळे कदाचित आकाशाचे वेध घेण्याचा गूण त्यात जन्मत:च आला असावा. आणि फोटोग्राफी तर चित्रपटाची आद्य माता. रामपूर वरून जेव्हा लालाचे कुटूंब दिल्लीत आले तेव्हा प्राण किशनने एका स्टुडिओत नोकरी पत्करली आणि ती ही फक्त ४०० रूपये महिन्याची. ए. दास अण्ड कंपनी या स्टुडिओत फोटोग्राफीचे पहिले धडे घेतानाच आणखी ही कला आत्मसात केली पाहिजे हा किडा त्याच्या डोक्यात शिरला आणि यासाठी तो थेट शिमल्याला पोहचला. गमंत म्हणजे येथे मदन पूरी या एके काळच्या खलनायकाने याला आपल्या राम लिला मध्ये चक्क सितेची भूमिका करायला लावली. मदन पूरी रामाच्या भूमिकेत होते. फोटोग्राफीचे वेड मग त्याला लाहोरला घेऊन गेले.त्याकाळी लाहोर भारतातील चित्रपट निर्मितीचे मोठे केंद्र होते. श्रीमंत लोकांचे आणि कलावंताची कदर करणारे शहर असा लौकिक त्यावेळी लाहोरचा होता. याच ठिकाणी प्राण किशनला चित्रपटातील पहिली संधी मिळणार होती.

१९४० चे ते साल होते. प्राणकिशनला पान खायचं भारी वेड. लाहोरच्या स्टुडिओत काम करत असताना मधल्या सुट्टीच्या वेळात जवळच्या पानपट्टीवर तो हमखास जाई. एके दिवशी असाच पानाची ऑर्डर देऊन तो तिथे वाट पहात उभा राहिला असतानां एक गृहस्थ् तेथे आले. नुकतीच विशी पार केलेला डोक्यावर हॅट असलेल्या या रूबाबदार व देखण्या तरूणाकडे त्या इसमाचे लक्ष गेले. चुन्याचे बोट खास स्टाईलने जिभेवर फिरविणाऱ्या प्राणकिशनला ते म्हणाले- “बर्खुरदार…यूँ ही पान खानेका शौक है या कुछ करना भी चाहते हो…” उत्तर द्यावे म्हणून प्राणकिशनने तोंड उघडण्याच्या आत ते म्हणाले- “फिल्मो मे काम करोगे?” क्षणाचाही विलंब न करता प्राणकिशनने हो म्हणत मान हलवली. ते गृहस्थ लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक दलसूख पंचोली होते. चित्रपटाचे नाव होते “जट यमला”. पंजाबी भाषेतल्या या चित्रपटातील ही भूमिका निगेटीव्ह अर्थात व्हीलनची होती. आणि वयाच्या विसाव्या वर्षी प्राणकिशनचा “प्राण” झाला. आणि मग अगदी शेवटा पर्यंत तो चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही प्राणच राहिला. अभिनयाचे कुठेही प्रशिक्षण नाही, चित्रपटाचे कोणतेच तंत्र अवगत नाही, पूढे आपल्या आयुष्यात नेमके काय वाढून ठेवलयं याचा पत्ता नाही तरीही या माणसाने चित्रपटसृष्टीत ६० वर्षे राज्य केले. अभिनयाचे मानदंड तयार केले. हे कसे शक्य झाले असेल? २००४ मध्ये एका वाहिनीवर मुलाखतीत जेव्हा प्राणला प्रश्न विचारला की- ‘’तुम्हाला खलनायकच का व्हावेसे वाटले? नायक व्हावेसे का नाही वाटले?’’ यावर प्राणनी उत्तर दिले- “मला झाडा भोवती नायिके मागे गाणे म्हणत गोल गोल फिरायची अजिबात इच्छा नव्हती, मला ते कधीच जमले नसते.” पूढचा प्रश्न होता- “तुमच्या आत खलनायक आहे किंवा होता का? म्हणून हे काम स्विकारले?”त्यावर प्राणने उत्तर दिले- “नाही…आतुन मी अत्यंत प्रामाणिक आणि चांगलाच माणूस आहे. पण चित्रपटात जर खलनायकच नसेल तर नायकाला काहीच अर्थ नाही. रावण होता म्हणूनच रामाचे मोठेपण अधोरेखीत होऊ शकले.” आणि प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीतही असेच घडले. प्राण हा एकमेव असा खलनायक आहे ज्याचे चित्र नामावलीत सर्वात शेवटी…..and PRAN असे नाव झळकत असे.

लाहोरच्या वास्तव्यातील ५ वर्षात प्राणने ४० चित्रपट केले. १९४५ मध्ये शुक्ला अहलुवालिया या तरूणीशी लग्न केले. अरविंद,सुनील आणि मुलगी पिंकी ही तिन अपत्ये. आपल्या मुलांनी काय करावे याची कोणतीच बळजबरी मुलांवर प्राणने केली नाही. पैकी सुनील सिंकदने १९८४ मध्ये “फरिश्ता” नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर धरमवीर, अमर अकबर अंथनी, परवरीश, सुहाग, लक्ष्मणरेखा या चित्रपटात सह दिग्दर्शन केले. १९४७ मध्ये मात्र लाहोरचे वातावरण तापू लागले. कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून त्याना इंदोरला हलविण्यात आले. फळणीच्या दोनच दिवस आगोदर प्राणने लाहोर सोडले आणि मुंबईत पोहचले. श्रीमंती थाटात राहिलेल्या प्राणचे मुंबईतील पहिले निवासस्थान होते हॉटेल ताजमहल. हातात काम नाही त्यात हळूहळू जसजसे पैसे संपू लागले हॉटेलचा स्तर पण खाली खाली येत राहिला. शेवटी शेवटी तर गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम हलवावा लागला. या काळात प्रसिद्ध लेखक सदाअत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांनी मात्र प्राणला खूप मदत केली. आठ महिन्याच्या धडपडी नंतर बॉलीबुडचा पहिला चित्रपट प्राणला मिळाला. बॉम्बे टॉकीज या मात्तब्बर संस्थेच्या या चित्रपटात देवआनंदला प्रथमच नायकाची मूख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटाचे नाव होते जिद्दी. लाहोर मध्ये हजारो रूपये मानधन घेणाऱ्या प्राणला या चित्रपटाचा मेहनताना मिळाला होता फक्त ५०० रूपये. जिद्दी चांगला चालला. या नंतर लगेच तिन चित्रपटाची ऑफर पण मिळाली. यातील “गृहस्थी” या चित्रपटाने तर डायमंड ज्युबली साजरी केली. मग हळूहळू १९५० पर्यंत प्राण स्थिरावत गेला. नंतर १९६८ पर्यंत प्राणने पडद्यावर आणि बाहेरही अशी जरब निर्माण केली की भलेभल्यांची घाबरगुंडी वळत असे. नंतरच्या ८० पर्यंत तर मुलाचं प्राण हे नाव ठेवण्यास पालक मागेपूढे बघत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या प्राणला ५०० रूपये मेहनताना मिळाला होता त्याच प्राणला नंतरच्या काळात नायका पेक्षाही अधिक मानधन मिळत असे. डॉन या चित्रपटासाठी अमिताभला अडीच लाखात साईन केले होते त्यावेळी प्राणचे मानधन पाच लाख होते. ही किमत प्राणने केलेल्या अफाट कष्टांची होती. चित्रपटातल्या पात्रांचा ते सखोल अभ्यास करत असत. त्याचा मेकअप, त्याची भाषा, त्याची देहबोली, त्याचे उच्चार याचा ते स्वत: अभ्यास करून ते पात्र कसे असेल हे ठरवत असत. या कामी त्यांना फोटोग्राफीची खूप मदत होत असे. आपल्या चेहऱ्याचे अनेक छायाचित्रे काढून त्यावर ते हाताने वेगवेगळे स्केच करून आपण कसे दिसू याचा अभ्यास करत. त्यांचा प्रत्येक खलनायक काहीतरी ढब घेऊन अवतरत असे. “राम और श्याम” मधले त्यांचे ते हिरवे डोळे अक्षरश्: आग ओकत. “मधूमती” मधल्या उग्र नारायणाच्या आवाजातील जबरदस्त जरब, “जिस देश मे गंगा बहती” मधला कधी ना कधी आपली मान फासात अडकणार आहे म्हणून सारखा सारखा गळ्याच्या कॉलर वरून हात फिरवणारा राका डाकू, “खानदान” मधला हिटलर छाप मिशा आणि अजब गजब कपडे घालणारा नवरंगी लाल, “कश्मीर की कली” मधला ‘शता ले शता ले’ म्हणणारा मोहनप्यारे, “दो बदन” मधला नायकेशी लग्न करूनही तिला हात न लावणारा अश्विनी नाथ, “गुमनाम” मधला कायम व्हीस्कीचे घोट घशाखाली रिचवत ‘अब किसकी बारी’ म्हणणारा बॅरिस्टर राकेश……………ही यादी प्रचंड आहे. प्रत्येक चित्रपटातील प्राणवर स्वतंत्र लेख होईल इतका मोठा आवाका या अभिनेत्याचा आहे. त्यांना स्वत:ला १९५६ मध्ये प्रदर्शीत झालेला “हलाकू” नावाच्या चित्रपटातील भूमिका खूप आवडत असे. त्यात ते नायक होते. नायिका होती मीनाकुमारी. तिने आगोदर प्राण नायक आहे म्हणून नकार दिला होता. पण प्राण जेव्हा हलाकूच्या मेकअप मध्ये आले तेव्हा मीनाकुमारीने लगेच होकार दिला. तुम्ही जर या चित्रपटातील त्यांचा गेटअप बघितला तर ओळखू येणार नाहीत इतपत हटके गेटअप होता. सुलतान हलाकू खान हा मंगोलियन सम्राट चंगेजखान यांचा नातू. यातील हलाकूची मूख्य भूमिका प्राणनी साकारली होती. यातील रफी-लता यांचे आजा के इंतजार मे…..हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

आपल्या खलनायीकेने चित्रपटसृष्टी ढवळून काढत असताना मग अचानक हा खलनायक एकदम वेगळ्याच रूपात अवतरला. १९६७ मध्ये मनोज कुमारचा “उपकार” प्रदर्शीत झाला आणि यातल्या मलंग चाचाने सर्वांनाच चकित केले. बैसाखीचा आधार घेत ‘कस्मे वादे प्यार वफा’…म्हणणारा हा मलंग प्राणच्या आगोदरच्या खलनायकी भूमिकेहून सर्वस्वी वेगळा होता. काही केल्या विश्वास बसत नव्हता की प्राणणे ही भूमिका साकार केलीय. अर्थात नंतरही प्राण खलनायक साकार करत होताच. पण हळूहळू मग तो चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत शिरला. १९७२ मधल्या “व्हिक्टोरिया न.२०३” मध्ये अशोक कुमार सोबत आपण कॉमेडी ही तितक्याच ताकदीने साकारू शकतो हे ही त्याने दाखवून दिले. पडद्यावरचा प्राण जितका दहशत गाजवणारा होता त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तो व्यक्तीगत आयुष्यात चांगला माणूस होता. जंजीर च्या भूमिकेसाठी अमिताभची शिफारस करणारा प्राण अमिताभच्या वाईट काळात त्याच्या सोबतीला धावून गेला. तब्यत चांगली नसतानां अमिताभच्या ७० व्या वाढदिवसाला आवर्जुन हजर झाला. अमिताभ सोबत प्राण यांनी १४ चित्रपट केले आणि प्रत्येक चित्रपटातील त्यांची भूमिका वेगळी ठरली. “बॉबी” मध्ये राजकपूरला प्राण हवा होता पण त्याचा मेहनताना देण्या सारखी आर्थिक् स्थिती नाही हे जेव्हा प्राणला समजले तेव्हा या दिलदार माणसाने शगून म्हणून फक्त १ रूपया घेतला आणि काम केले. मला तर प्राण हा मुळी खलनायक नाही तर नायकच वाटतो. कारण चित्रपटातील त्याच्या वाईट भूमिकेमुळेच नायक अजरामर झाले. त्यांच्या पडद्यावरील कृष्णकृत्यामुळे समाजातील चांगूलपणा विजयी होतो हे ठसठशीतपणे दिग्दर्शक दाखवू शकले. वाहिनीवरील मुलाखतीत बोलताना प्राणसाब म्हणाले की- “रामायणात रावण नसता तर रामाचे सर्व सद्गुण इतक्या उंचीवर दिसलेच नसते. रावण जरी रामायणातील खल पुरूष असला तरी तो विद्ववान होता. सीतेचे हरण केल्यावर तीला महालात नाही ठेवले. कारण रावणाला माहिती होते ती रामा सोबत वनवासात आली आहे. तिच्या इच्छे विरूद्ध त्याने बळजबरी केली नाही.” खलनायकाचे चित्रपटातील महत्व खऱ्या अर्थाने प्राणने पटवून दिले. आपल्या संबंध आयुष्यात मी तरी कुठेही कुणा बरोबर प्राण बद्दचे गॉसिप वाचल्याचे आठवत नाही.

प्राण यानां कुत्र्यांचा खूप शौक होता.बुलेट, व्हिस्की,सोडा अशी त्यांची नावे. एक माकडही त्यांनी घरी आणले होते मात्र शेजारच्यांनी तक्रार केल्यामुळे परत नेऊन् सोडावे लागले. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या अनेक छड्यांचा संग्रह होता. त्यातील अनेक छड्यांचा वापर त्यांनी चित्रपटात केला आहे. गंमत म्हणजे पत्ते खेळण्यात ते महावस्ताद होते. सहसा हारत नसत. फिल्म फेअर ते पद्मभूषण अशा पुरस्कारांच्या किती तरी माळा त्यांच्या गळ्यात पडल्या पण या महान अभिनेत्याचे जमिनीवरील घट्ट पाय कधीच सैल झाले नाहीत. १९९० नंतर ते हळूहळू चित्रपटसृष्टी पासून लांब जात राहिले. सर्व वेळ आपल्या कुटूंबीयात घालवू लागले. २०१३ मध्ये त्यानां दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला पण ते त्याला उपस्थित राहू शकले नाही. प्राण इतर कलावंतानाही भरभरून दाद देत असत.खूच उमद्या मनाचे होता हा माणूस. १९७३ मध्ये मनोजकुमार नायक असलेल्या चित्रपटात त्यांनी पोलिस हवालदार रामसिंगची अतिशय सुंदर भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरचा पुरस्कार जाहिर झाला. पण त्यानी तो नाकारला कारण होते- त्या वर्षी बेइमान चित्रपटासाठी शंकर जयकिशन ऐवजी पाकिजाच्या गुलाम मोहमंद याना उत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळायला हवा होता तो त्यांना मिळाला नाही म्हणून…..मला सगळ्यात जास्त हा माणूस भावला तो एका पुरस्कार सोहळ्यात. १९९७ मध्ये त्यांना फिल्म फेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला. हा पूरसकार स्विकारण्यासाठी ७७ वर्षांचे प्राण दोघां मदतनिसांच्या साहय्याने स्टेजवर आले. सर्व रसिकांवर एक कटाक्ष टाकून एखाद्या देवाला करावा तसा त्यांनी प्रेक्षकानां साष्टांग दंडवंत केला. सर्व सभागृह अवाक् होऊन बघत राहिले. तेव्हा कित्येक मिनीटे टाळ्या शिवाय कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. प्रेक्षकानां आपला देव आणि कलेला आपला धर्म मानणारा हा माणूस फक्त नायकच असू शकतो खलनायक नव्हे !!!! अभिनयाचे शेकडो मापदंड सर्वांसाठी मागे ठेवून १२ जुलै २०१३ रोजी प्राणच्या शरीरातील प्राण खूप दूरवरच्या प्रवासाला निघून गेले.

दासू भगत( १२ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..