करुणा, अनुकंपा, आर्जव, विनवणी,धार्मिक प्रथा, अध्यात्मिक प्रेरणा, आणि शास्त्रसंमती असे सगळे घटक प्रार्थनेत असतात. बालवयापासून शाळेत न कळती प्रार्थना आपण म्हणत असतो- बरीचशी यंत्रवत ! “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा जशी आपण वरवर म्हणत असतो (त्यामागील अर्थाचा गाभा नाकारीत, सहसा आचरणात न आणता), तसंच शालेय प्रार्थनेचं होतं. एका शाळेत चक्क मुलांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली – “दुपारी उन्हात प्रार्थनेला खूप वेळ उभे राहावे लागते. जरा एखादी प्रार्थना कमी करता आली तर —— ! ”
मुख्याध्यापक खमके होते. त्यांनी वर्गाला शाळेच्या मैदानात नेलं आणि घड्याळ लावून शास्त्रशुद्ध पद्धतीने राष्ट्रगीत, वंदे मातरम, प्रतिज्ञा आणि शाळेची प्रार्थना म्हणण्यासाठी चार मिनिट आणि १२ सेकंद फक्त लागतात हे सिद्ध करून दाखविले आणि त्यासाठी उन्हात उभे राहण्याची तक्रार करू नये असे बजावले.
शालेय कालखंडानंतर प्रार्थना आपल्या आयुष्यातून हद्दपार होते. क्वचित घरात संध्याकाळी ” शुभं करोति ” असे बोबडे बोल उमटतात, एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण प्रार्थना करतो, अध्यात्मिक सत्संगात प्रार्थना भैरवीसारखी असते- ” लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ” वगैरे! कार्यक्रम संपल्याची ती नांदी असते, पटकन डोळे उघडून दैनंदिनीत शिरायला मोकळे!
जेव्हा आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक, मानसिक अडचणी येतात (बरे न होऊ शकणारे आजारपण, अत्यवस्थ कुटुंबीय, किमती वस्तूंची चोरी, नात्यांमधील अडथळे, कर्ज वगैरे) त्यावेळी आपले हात प्रार्थनेसाठी जोडले जातात. आपले प्रयत्न थकले की त्यांच्या पलीकडील क्षेत्रात आपले काहीही चालत नाही. अशा प्रार्थना ऐहिक असतात, स्वतःच्या मदतीसाठी परमतत्वाने धावून यावे म्हणून केल्या जातात. मात्र साधक स्व-उन्नती साठी प्रार्थना करतात. अशी प्रार्थना दैनंदिन साधनेचा भाग असते आणि ती फळाला नाही आली तरी साधकांचा समतोल ढासळत नाही. प्रार्थना दोन प्रकारात विभागली जाते – जगाच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या अध्यात्मिक विकासासाठी! प्रार्थनांना उत्तरे मिळतात कां – तर हो! फक्त ते ज्याच्या-त्याच्या अध्यात्मिक प्रगतीवर, साधनेवर अवलंबून असते.
सहसा आयुष्यातील समस्येचे मूळ- शारीरिक,मानसिक अथवा अध्यात्मिक स्वरूपाचे असते. नियती (पूर्वकृत्ये)आणि पूर्वज अध्यात्मिक समस्येचे घटक असतात. अध्यात्मशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका प्रतिष्ठानाला असे आढळून आलेले आहे की बऱ्याच समस्यांची मुळे अध्यात्मिक कारणांशी निगडित असतात.
देहासाठी प्राणतत्त्व जितके आवश्यक असते, तेवढीच आत्म्यासाठी प्रार्थना गरजेची असते. जीवात्मा आणि परमात्म्याला जोडणारी एक साखळी म्हणजे प्रार्थना! प्रार्थना अहंभावाला पराजित करते आणि लीनता सुचवते.
प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असते. आपण जर प्रामाणिक असू तर आपल्या प्रार्थनेत नक्कीच काहीही घडवून आणण्याचे बळ असते. दैनंदिन झगड्यात आपण मन लावून प्रार्थना केली तर तिचे सामर्थ्य आपोआप प्रचितीला येईल. प्रार्थना कोठल्याही एका आकृतिबंधात सामावलेली नसते. मात्र एखाद्या बालकाच्या निरागसपणे कोठलाही कावेबाजपणा, कुटील भाव न आणता विनवणी करता आली पाहिजे. मग हवं ते मिळेल.
गंमत म्हणजे नकारार्थी ऊर्जाही प्रार्थनांना फळ देतात.विशेषतः एखाद्याला इजा पोहोचवायची असेल, किंवा एखाद्याचे भले होऊ द्यायचे नसेल तर नकारार्थी ऊर्जाही प्रतिसाद देतात. उदा. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत जर कोणी प्रार्थना करीत असेल, तर कदाचित नरकातील एखादी सूक्ष्म ऊर्जा त्यासाठी मदत करू शकेल. उदा. मला एखादे संकेतस्थळ हॅक करून काही ऑनलाईन घोटाळे करायचे असतील किंवा नजीकच्या भविष्यकाळात होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील (आठवा – थ्री इडियट्स मधील प्रसंग) तर साहजिकच मी प्रार्थनेचा गैरवापर करतोय आणि त्यालाही मदत करण्यासाठी काही नकारार्थी ऊर्जांचे स्रोत असू शकतात आणि माझे गैरकृत्य यशस्वी होऊ शकते.
परीक्षेतील यशासाठी, नोकरी मिळावी, मनाजोगते पद मिळावे, आजारातून लवकर बरे व्हावे इत्यादी कारणांसाठी सर्वसामान्यपणे प्रार्थना केल्या जातात. ज्याक्षणी आपण प्रार्थनेसाठी हात जोडतो,त्याक्षणी आपण स्वतःचे अपयश मान्य करतो, एखादी समस्या सोडविण्यात आलेल्या अडचणी स्वीकारतो आणि त्यातून आपला अहं निखळून पडतो. त्याक्षणी आपली अध्यात्मिक पातळी उंचावते. मग “सत्व ” गुणांमध्ये तात्पुरती वाढ होते. कृतज्ञता व्यक्त केली की आपल्या नम्र भावना उजागर होतात. हा सकारात्मकता वाढविणारा प्रतिसाद प्रार्थनेला अधिक अध्यात्मिक बनवितो.
विश्वातील दैवी, सकारात्मक लहरींना आवाहन करण्याचे काम प्रार्थना करते. प्रार्थना आपल्या मनोकामना, अपेक्षांची पूर्ती करते. शरीर म्यानासारखे आतील सत्त्व गुणांचे रक्षण करीत असते. कृतज्ञ भाव व्यक्त केला की सत्त्वगुणांची वाढ होते. शरीर आणि मनाचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रार्थना उपयोगी पडते. शरीर आणि मनाच्या ढालींमधील साचलेला कचरा यानिमित्ताने नष्ट होतो. निर्विषीकरण सुरु होते. याचाच अर्थ असा की व्यक्तिगत स्वार्थी विचारांना ओहोटी लागते, “माया” (ऐहिक गोष्टींमधील व्यवधाने) उतरणीला लागते आणि ब्रह्मतत्वात विलीन होण्याची ओढ लागते. “नराचा नारायण “या प्रक्रियेतील प्रार्थना हा एक महत्वाचा थांबा मानला जातो.
एकदा शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण झाले की नकारात्मकतेला आत शिरायला वाट मिळत नाही. जर धावपळ कमी हवी असेल, तणाव सुसह्य असावेत असे वाटत असेल, आसपास गोंगाट नको असेल, पाठीवरील ओझ्याचे गाठोडे उतरवून ठेवावे असे वाटत असेल तर आराध्य /इष्ट देवतेसमोर गुडघे टेकून हात जोडून आणि डोळे मिटून क्षणभरही प्रार्थना केली तरी हायसे वाटते.
प्रार्थनेमागील यंत्रणा –
आयुष्यातील साधारण ६५ टक्के घटना नियतीने आखल्याप्रमाणे, विधिलिखितानुसार होत असतात. त्यावर आपले नियंत्रण नसते. हे घटित चांगले किंवा वाईट असते. प्रदीर्घ आजारपण, बेकारी, अपघात, फसलेले विवाह या घटना साधारणपणे आपली परीक्षा घेत असतात. सामान्य माणसांचे हात फक्त अशावेळीच जोडले जातात. यामधून सुटका व्हावी यासाठी आळवणी करणारी प्रार्थना अशावेळी साहजिकच ओठी येते. प्रार्थनांना प्रतिसाद मिळतोच असे नाही. पूर्वकृत्यांमुळे आपल्या मागे अडचणींचे शुक्लकाष्ठ लागते. प्रार्थना अशा वाईट घटनांना टाळू शकतात का, किंवा किमान त्यांची तीव्रता कमी करून आपले रक्षण करतात का? (अगदी सहज आपण म्हणून जातो- “नशीब बलवत्तर म्हणून वाचलो”.)
यामागे काही कार्यकारणभाव असतो का, एखादी शुभंकर यंत्रणा कार्यरत असते का, या प्रक्रियेचे काही कायदे / नियम असतात कां, हे प्रश्न संशोधकांना पूर्वापार सतावत आलेले आहेत. आणि मग एक सर्वमान्य तथ्य स्वीकारण्यात आले आहे-
भावी/ होऊ घातलेल्या घटनेच्या तीव्रतेपेक्षा प्रार्थना अधिक शक्तिमान असेल तर ती फळास येते. मात्र घटना अधिक तीव्र स्वरूपाची असेल तर प्रार्थनेला अंशतः किंवा अजिबात उत्तर दिले जात नाही.
प्रार्थनेची परिणामकारकता खालील घटक ठरवितात–
१) प्रार्थनाकर्त्याची अध्यात्मिक साधना – ही जेवढी जास्त असेल तेवढी प्रार्थना ऐकली जाण्याची शक्यता अधिक. ज्यांची अध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असेल त्यांना प्रार्थनेची आवश्यकता नसते.त्यांची स्थितप्रज्ञ प्रवृत्ती कायम असे मानते – जे काही होणार असेल ते ईश्वरेच्छेनुसार होईल. तेथे काही भावना अथवा वासना नसतात. सगळीकडे त्यांना परमेश्वराची कृपा जाणवत असते आणि त्यांना स्वतःसाठी वेगळे असे काही मागण्याची गरज भासत नसते. त्यांची वृत्ती ईश्वरचरणी समर्पित असते. अशा भावावस्थेला पोहोचलेल्या व्यक्तीला मग प्रार्थनेची गरज वाटत नाही. ३० टक्क्यांहून कमी ज्यांचे अध्यात्मिक बळ असते, त्यांची कुवत मर्यादित असते त्यामुळे अशा प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला फारतर मानसिक समाधान (आणि तेही तात्कालिक) मिळू शकते. अशा व्यक्तींमधील अहं साधारणपणे मोठा असतो म्हणून त्यांच्या प्रार्थना फारशा फलद्रुप होताना दिसत नाहीत. थोडक्यात ३० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान अध्यात्मिक पातळी असलेल्यांना प्रार्थनेचा अधिक लाभ होतो.
बरेचदा एखादी व्यक्ती / संस्था आवाहन करून विश्वशांती साठी किंवा अशाच एखाद्या कारणासाठी (जागतिक तापमानवाढ कमी व्हावी वगैरे) यज्ञ याग करण्याचे ठरवितो तेव्हा ते कारण नक्कीच उदात्त असते. बऱ्याचदा अशा जागतिक उपक्रमांना अध्यात्मिक अधिष्ठान असते असे आढळून येते. तेथे संतांची उपस्थिती अनिवार्य असते. लाखो माणसे (भलेही त्यांची अध्यात्मिक पातळी सर्वसामान्य असेल) एकत्र आल्यास आणि त्यांनी मानवतेसाठी (उदा. कोविड निर्मूलन) प्रार्थना केली तर ती अतिशय प्रभावी होऊ शकते. एखादी व्यक्ती भलेही ती व्यक्ती संत असेल तरीही असा प्रश्न येऊ शकतो- मग ती एकटीच व्यक्ती हे सारं कां नाही करत? इथे एक महत्वाचे आहे की संत “साक्षीभावाचे “धनी असतात. ते ईश्वराच्या नियोजनात कधीही ढवळाढवळ अथवा हस्तक्षेप करीत नाही. त्यांना ईश्वराचे अनुसंधान असते आणि त्यांना ईश्वरी कृत्ये मान्य असतात.
२) प्रार्थनेची गुणवत्ता– प्रार्थना यांत्रिक (करायची म्हणून केलेली आणि त्यावर अविश्वास आहे तरीही केली जाते) आहे, मनापासून आहे की भावोत्कट आहे यावरून गुणवत्ता ठरते.
३) प्रार्थना कशासाठी आणि कोणासाठी केली जात आहे? – इतरांसाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनेला अधिक ऊर्जा लागते.घटनेचा बरा-वाईट परिणाम जर एखाद्या मोठ्या समुदायावर होणार असेल तरीही प्रार्थनेला अधिक शक्ती आवश्यक असते. तरच अपेक्षित परिणाम साधता येतो. उच्च कोटीला पोहोचलेले साधुसंत संपूर्ण समाजासाठी जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा ती सुफळ होते.
४) गर्व (अहं) – जितका अहं कमी तितकी प्रार्थना ऐकली जाण्याची शक्यता वाढते.
५) मुद्रा – प्रार्थना करताना धारण केलेली मुद्रा तिचा प्रभाव वाढविण्यास उपयुक्त असते. बऱ्याच लोकांना मुद्रेचे महत्व माहित नसते. प्रार्थनेतून दिव्य ऊर्जा मिळण्यासाठी योग्य मुद्रा निवडावी लागते. दोन भुवयांच्या मध्ये अध्यात्मिक ऊर्जाकेंद्र (भ्रुकुटी चक्र) असते आणि हे मानवी चेतना व परमात्मा यांच्या मधील विभाजन रेषा असते. या मुद्रेमुळे आपल्याला हलके वाटते, सकारात्मक ऊर्जेत वाढ होते आणि शारीरिक /मानसिक तणाव कमी व्हायला मदत होते. दुसऱ्या चक्रातून (अनाहत) सात्विक लहरी प्रवाहित होतात. यामुळे आसपास असणाऱ्यांनाही ती कंपने जाणवतात. सत्संगातील प्रार्थनांमध्ये हे बळ असते. मुद्रेच्या निवडीवर दिव्य अनुभव आणि फायदे अवलंबून असतात. मात्र योग्य मुद्रा असेल तर प्रार्थनेतून मिळणाऱ्या लाभांमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ होते असे संशोधन सांगते. प्रार्थनेच्या वेळी शरीर झुकलेले, हाताची बोटे कपाळाला समांतर, जोडलेली, अंगठे हळुवारपणे भ्रुकुटी चक्राला स्पर्श करणारे, डोळे मिटलेले आणि दोन्ही हात एकमेकांवर अलगद दाबलेले असावेत.
प्रार्थना कोठेही करता येते- मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारा मध्ये आणि मनात ! एकट्याने अथवा समूहाने !! त्यात आर्त आळवणी,सदभावना आणि झोकून देणे असावे. प्रार्थनेचे पावित्र्य सकारात्मक असते आणि तिचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात.
स्वामी कृष्णानंद सरस्वती म्हणत – “चेतनेची परिमिती उच्च पातळीवर पोहोचल्याची खूण म्हणजे प्रार्थना ! ”
वसंत बापटांच्या भाषेत ती अशी असते –
“गगनसदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय !”
राज कपूरला ” जागो मोहन प्यारे ” असे आळवावे असे वाटते, व्ही शांताराम तिला ” ऐ मालिक तेरे बंदे हम ” च्या सुरांमध्ये अमर करतात, कधी ती ” इतनी शक्ती हमे देना दाता ” रूपात प्रकटते, खेबुडकर आणि गदिमांच्या रचनांमध्ये आणि शाळा गीतांमध्ये ती अधिक खुलते, कधी ती अभिषेकीबुवांच्या स्वरप्रपातून “सर्वात्मका सर्वेश्वरा ” बनून कोसळते आणि माउलींच्या विश्वात्मक पसायदानातून शतकानुशतके शांतरस प्रदान करीत असते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply