एक गरीब बाई एका वाण्याच्या दुकानात शिरते. त्याला गयावया करु लागते की “मला थोडे वाणी सामान दे. माझ्या घरात खूप दिवसांपासून चूल पेटली नाही. माझे पती आजारी आहेत त्यामुळे ते कामावर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे घरात पैसे येत नाहीत. मला लहान मुले आहेत. कृपया उधारीवर थोडे सामान देतोस का?”
वाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.”
त्या दोघांचे संभाषण आणखीन एक ग्राहक ऐकत असतो. त्याला त्या बाईची दया येते. वाण्याचे बोलणे ऐकून ती बाई रडायला लागते. ग्राहक वाण्याला म्हणतो “या बाईचे जे बील होईल ते मी भरेन. तू तिला सामान दे.’ ”
वाणी त्या बाईला म्हणतो “तुझी सामानाची यादी दाखव. ती मी तराजूत टाकेन. त्याच्या वजनाइतकेच सामान मी तुला देईन.” वाण्याला वाटते कागदाचे वजन ते काय असणार! थोडक्यात काहीतरी देऊन आपल्याला वेळ निभावून नेता येईल.
बाई जवळ सामानाची यादी नसतेच मुळी. ती वाण्याकडून एक कागद मागून घेते. त्याचा एक चिटोरा फाडून त्यावर काही तरी लिहिते. तो कागद घडी घालून ती वाण्याच्या हातात देते. वाणी त्यावर काय लिहिले आहे हे न वाचता तो कागद तराजूत टाकतो आणि काय आश्चर्य ! तराजू खाली बसतो. वाणी त्याच्यात जुजबी सामान भरतो. तरीही तिचे पारडे जडच रहाते. ग्राहक आणि वाणी दोघेही अवाक होतात. वाणी आणखीन सामान त्यात भरत जातो. तराजूचे दुसरे पारडे वरच येत नाही. शेवटी वाणी त्या बाईची चिठ्ठी उचलतो आणि वाचतो.
“देवा, तुला माझी अन्नाची निकड माहित आहे. मी तुझ्याकडे वेगळे काय मागू?” एवढेच वाक्य त्या बाईने त्या चिटोऱ्यावर लिहिलेले असते. वाणी बुचकळ्यात पडतो. एवढ्या एका वाक्याने त्या बाईला एवढे सारे सामान द्यावे लागणार असते. पण वाण्याचा आता नाईलाज होतो. तो सगळे सामान भरुन बाईच्या हातात देतो. ती त्याला आशिर्वाद देऊन निघून जाते. ग्राहक अर्थात त्या बाईचे सगळे बील चुकवतो.
वाणी आणि ग्राहक दोघेही विचार करु लागतात. एका प्रार्थनेमध्ये केवढे सामर्थ्य असते याचा प्रत्यय दोघांनाही येतो. ईश्वर केवळ आपली प्रार्थना ऐकत नाही तर त्या प्रार्थनेला उत्तरही देतो याची प्रचिती घेऊन दोघेही आपापल्या कामाला निघून जातात.
आपल्यातल्या या शक्तीला आपण कधीही क्षीण होऊ देता कामा नये. मनापासून आणि निस्वार्थपणे केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते यात शंका नाही. आपल्यातल्या प्रत्येकाकडे ही शक्ती आहे. या शक्तीच्या बळावर आपण इतरांनाही मदत करु शकतो. त्यांच्या उपयोगी पडू शकतो. निस्वार्थपणे दुसऱ्याला केलेली मदत ही ईश्वराने आपली प्रार्थना ऐकल्याची पावती असते. आपल्या जीवनाचे हेच तर सौंदर्य आहे.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply