नवीन लेखन...

प्रसन्न

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच  होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली.


आपणहून दुर्गाताई अपमान करणार्यातल्या नव्हत्या. पण सून यशोदा त्यातली नव्हती. ‘मला गरम पोळ्या लागतात’ लग्न झाल्या झाल्या त्यानंतर यशोदाला सांगितले, ‘मी? पोळ्या लाटू?’  ‘नो वे’ तेव्हा ती अगदी निकराने म्हणाली.

‘माझ्या आईने मला चहा सुद्धा सांगितला नाही हो कधी.’

‘बारावीला 99 टक्के पीसीबीत मिळाले नि सरळ मेडिकलला गेले. तरी तिसरा नंबर! शंभर टक्केवाले दोन होतेच डोक्यावरती. टफ काँपिटिशन यू नो?’ सुभाष, दुर्गाताईंचा मुलगा कौतुकाने बघत होता बायकोकडे. जणू 99 टक्के गुण मिळविणारी ती एकटीच होती जगात! आता सासरी आल्यावर ती चहा करायला लागली. आपणहून! दुर्गाताईंना त्यातला एक कप मिळे. असे त्रांगडे होऊन बसले होते. स्वयंपाकास बाई होती. तेवढीच ‘ईश्वरी’ सूनबाईची कृपा! चला! हेही नसे थोडके…

बाईसाहेब ड्यूटीवर गेल्या की सासू मोकळा श्वास सोडी. मग दुर्गाताईंचेच राज्य! बघता बघता मुलगी झाली ‘सोनिया’. नि सहावीत गेली. खट्याळ, खोडकर नि मिश्किल. वर्गातून असंख्य तक्रारी येत. स्पष्टवक्ती होती. एकदा खिडकीतून बाहेर बघत होती.

‘काय गं? काय बघतेस?’

‘रस्त्यावरची गंमत बघते.’

‘काय? मुकाट्याने पुस्तकात डोकं घाल.’

‘अनइंटरेस्टिंग शिकवता तुम्ही.’ वर्ग खूश. टाळ्या!

बाई चिडल्या एच्एम्ना बोलावले. सगळा पाढा वाचून झाला.

‘गैरवर्तनासाठी कोणती सजा देऊ मोठ्या मॅडम?’

‘त्यापेक्षा शिकवणे इंटरेस्टिंग करा तुम्ही मॅडम,’ एच्एम् म्हणाल्या.

बाई निरुत्तर. क्लास प्रमुदित. टाळ्या नि गालात हशा!

‘सोनिया, असं वागू नये बेटा.’ किती समजुतदारीचा सूर!

‘बरं, मोठ्या मॅडम.’

‘मी लक्ष देईन. कितीही न द्यावं, तरीसुद्धा लक्ष देईन. पण माझा पहिला नंबर असतो. अगदी त्यांच्या विषयातही.’ मोठ्या मॅडम सोनियाचा गालगुच्चा घेऊन वर्गातून बाहेर पडल्या.

बाईंना वाटलं होतं. रट्टा पडेल निदान रागे भरतील. पण तसे काहीच झालं नाही. अशानेच मुले डोक्यावर बसतात. बाईंनी उलटे 10,9,8,7,6,5,4,3,2,1 असे मनी मोजले, नि पुढे शिकवू लागल्या. पोर्शन पुरा करीत राहिल्या.

सोनियाचे जास्तच चढेल वागणे झाले. प्रत्यक्ष एचएम बाईंचा पाठिंबा. मग काय? वर्गही तिला डोक्यावर घेऊन नाचला होता. बाई मनोमन समजल्या होत्या. मान सांगावा जनात, नि अपमान ठेवावा मनात! सोनियाचे अस्तित्व त्यांच्या लेखी संपले होते. जणू सोनिया वर्गात नव्हतीच. साफ दुर्लक्ष. शून्य रिस्पॉन्स! पण सोनिया त्यामुळे  जास्तीच शेफारली. औधत्य वाढले.

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तीचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई  एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे  म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच  होतं. ना?

तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली.

एचएम बाई वर्गावर आल्या, वर्ग फार हुशार आहे. तल्लख आहे. सेल्फ स्टडी करतात. ‘माझे काम सोप्पे होते.’ रेकॉर्ड लागली एचएम बाई काय हो? संतुष्ट! संतुष्ट होत्सात्या वर्गाबाहेर पडल्या. तंबाखू बाई एनि वे जिंकल्याच होत्या ना! वर्ग वार्यावर!

सोनिया समजली. इधर दाल नही गलनेवाली! चूप बैठना  पडेगा. शिकवलंच नाही, तर आख्खा वर्ग उघड्यावर! एक ना एक दिन बाहरका रस्ता देखनाच पडेगा. चूप झाली. एकटी पडली.

घरी दुर्गाताईंना बरोबर समजलं. कुछ तो गडबड है! सोनिया सध्या मूडमध्ये नाही. पण सूनबाईचा धाक!

‘तुम्ही नका मधे पडू. शी इज माय डॉटर.’ नकोच ते दीडशहाणे बोल ऐकायला. ‘नको रे मना क्रोध हा अंगिकारू.’ त्या मनाला समजावीत. रामदासांना आठवीत. मनाचे श्लोक कामाला येत.

दुर्गाबाईंचा पॅटर्न ठरीव पद्धतीने जगत. ठरवून वागत. नो इंटर फिअरन्स अॅट ऑल.

पण आज नाइलाज झाला. नातीने बंड केले.  मारामारी केली. उरावर बसली एकीच्या. शाळेतून कॉल आला. सूनबाई दवाखान्यात! ऑडिटचा महत्त्वाचा दिवस! नो ताण फ्रॉम होम! असा अवघड दिवस! नो डिस्टर्बन्स अॅट ऑल.

आजीला शाळेत जावे लागले.

अजिबात इच्छा नसताना जावे लागले. प्रकरण हातघाईवर आले होते. भांडाभांडी तोंडोतोंडीवरून हातापायीवर गेली होती. सोनियाने छाताडावर बसून गुद्दे मारले होते. तंबाखूबाईंनी घरी  बोलावणे पाठवले.

दुर्गाबाईंना  काय करावे कळेना! मधे पडावे? सूनबाईच्या हॉस्पिटलमध्ये ऑडिट आहे. मुलगा दूूरच्या ठिकाणी कामाला जातो. दुर्गाबाई मनाशीच तयार झाल्या. साडी नेसल्या नीट बाहेर जायची. गेल्या रिक्षा करून शाळेत.

सोनियाने तोंड उघडायच्या आत जिला मार लागला त्या मुलीसमोर उभ्या राहिल्या. दोन्ही हात जोडून माफी मागितली. ती पोरगी हवा काढलेला फुगाच झाली. फुस्सस्स्! भांडण मिटले.

मग मैत्रीची गोष्ट त्यांनी वर्गाला सांगितली. कृष्ण कन्हैय्या, गोपिका आणि गोपांची. मग वर्गाला गाणे शिकविले.

‘एकमेका मनास जपणे, ऐशी सुंदर मैत्री

करू प्रती अन्, गाऊ गीत हो, ऐशी झकास गोत्री!

एकमेका जपू आणखी, प्रेमासाठी देऊ प्राण

देव बाप्पा इतुके ऐका, ऐशी छोटुकल्यांची आण!’

छोटुकली आजीच्या प्रेमात पडली. सोनियाने वर्गाची माफी मागितली. इटुकले भांडण मिटून गेले. वर्ग सुशांत झाला.

तंबाखू बाई म्हणाल्या, ‘इतकी काय जादू केलीत?’

‘अगो मी एक निवृत्त शिक्षिका आहे. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. अतिशय प्रेमळ एचएम.’ वर्गाने टाळ्या वाजवल्या.

ऑडिट झाल्यावर सुनबाई घरी आल्या. दमल्या होत्या. पण समजले शेजार घरून, आजी मुलीच्या शाळेत गेल्या. तशीच चपला फटकारीत, फणफणत शाळेत गेली. काय ताट वाढून ठेवलेय पुढ्यात? म्हणून आत वर्गात शिरली.

‘ऐशी मैत्री, सुंदर मैत्री, मनात जपुया भारी

हृदयी जपुनी, मंत्र प्रीतचा, जगात जपुया फारी”

आजी टाळ्या वाजवून गात होत्या नि वर्ग ठेक्यावर गात होता. सूनबाई चकित झाल्या.

‘भांडण झाले होते ना?’  तिने विचारले.

‘ते मैत्रीच्या तोरणांनी सुंदर नटले,’ बाई म्हणाल्या.

‘सारी हिच्या आजीची कमाल. तुमच्या सासुबाई धमाल आहेत. भाग्यवान आहेत,’ बाईंनी रेकॉर्डच लावली कौतुकाची.

डॉक्टर सूनबाई नरमल्या.

‘त्या एक शिक्षिका होत्या.’

‘प्रेमळ शिक्षिका,’ वर्ग गरजला.

घरी येईपर्यंत सूनबाई नॉर्मल झाल्या.

‘चला, चहा टाकते सगळ्यांना,’ सूनबाईंनी म्हटलं.

‘मी करते, पटकन्,’ सासूबाई म्हणाल्या.

‘नको. आय अॅम थँकफूल टू यू आई,’ सून गरम स्वरात म्हणाली. प्रथमच दोघींचा प्रेमाचा सूर लागला होता. कधी नव्हे ते हवामान प्रसन्न होते. अगदी प्रसन्न!

–डॉ. विजया वाड

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..