मी माझ्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन अलिबागला निघालो होतो. कल्याण हुन फास्ट लोकल ने सी एस टी, तिथून पुढे बेस्ट बस ने गेट वे ऑफ इंडिया आणि तिथून लाँच ने मांडवा.
संध्याकाळी मांडव्याला पोचल्यावर रात्री तिथेच मामाकडे राहून सकाळी मामाची बाईक घेऊन अलिबागला जाणार होतो.
लोकल ट्रेन मधून बाजूने जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस, मालगाड्या किंवा नुसती इंजिने बघून माझा मुलगा मला त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारत होता. मी सुद्धा त्याला समजतील अशी उत्तरं देत होतो.
पुढे लाँच मध्ये बसल्यावर त्याच्या मनात कुतूहल निर्माण व्हायला लागले. यापूर्वी सुद्धा त्याला लाँचने नेले होते पण दरवेळी त्याचे नवीन कुतूहल जागे होऊन नवीन नवीन प्रश्न सुचतात तसे त्याला त्या दिवशी पण सुचत होते.
काहीच दिवसांपुर्वी त्याला माझ्या ऑफिस मध्ये नेले होते. ऑफिसच्या रिसेप्शन मध्ये आमच्या कंपनीतील एका जहाजाची प्रतिकृती काचेच्या बॉक्स मध्ये ठेवली होती, ती बघून त्याने ड्याडा हे तुझे शिप आहे का ? शिपवर हे नाव काय आहे? त्याच्यावर ही क्रेन कशासाठी आहे? प्रतिकृतीच्या अकोमोडेशन कडे बोट करून तुम्ही शीपवर याच्यात राहता का? शिप प्रतिकृतीच्या पुढे लोंबकळणाऱ्या नांगराकडे सुद्धा बोट करून हे पुढे असे काय आहे असे विचारले? त्याला म्हटले त्याला शिप चा अँकर म्हणतात.
मग त्यावर त्याचा प्रश्न , शिपला अँकर कशासाठी असतो ? त्याला सांगितले अँकर म्हणजे नांगर आपल्या शेतात कसा आपण ट्रॅक्टर चालवतो त्याला नांगर असतात , ट्रॅक्टर चालु केल्यावर त्याचे नांगर कसे जमिनीत रुततात आणि माती बाहेर येते, ट्रॅक्टर बंद केला आणि नांगर जमिनीत रुतलेले असताना आपण धक्का मारून ट्रॅक्टर ला हलवू शकतो का? नाही ना? तसेच शिपचा अँकर समुद्राच्या तळाशी खाली रुतून बसतो मग त्यामुळे जहाजाचे इंजिन बंद असताना जहाज एका जागेवर थांबण्यासाठी त्याचा अँकर खाली पाण्यात टाकतात.
त्याच्या प्रश्नांना उत्तर देऊन झाल्यावर , निघताना तो माझ्या मागे लागला, ड्याडा हे शिप आपल्या घरी घेऊन चल ना.
मी त्याला समजावले, अरे असं ऑफिस मध्ये जेव्हा कधी तुझ्यासारखी दुसरी लहान मुले आली तर त्यांना शिप कसे बघायला मिळेल ? आणि आपण तर ट्रेन ने जाणार आहोत मग एव्हढा मोठा काचेचा बॉक्स आपल्याला कसा नेता येईल. हे ऐकल्यावर त्याला पटले होते.
लाँच गेट वे ऑफ इंडिया पासून निघाल्यावर समुद्रात जस जशी पुढे जाऊ लागली तसतसे मोठ मोठी जहाजे जवळून दिसू लागली.
मग माझा मुलगा विचारू लागला, ड्याडा ऑफिस मध्ये शिप बघितले त्याला एकच क्रेन होती, ह्या शिप मध्ये चार चार क्रेन कशा आहेत?
तिथं ब्लॅक कलर चे शिप होते पण ह्याचा कलर रेड का आहे?
हे शिप पाण्यात कसे काय तरंगते?
लोखंडी असून पण पाण्यात का बुडत नाही?
तुझे शिप पण एवढेच मोठे आहे का?
त्याला म्हटले माझे शिप याच्या पेक्षा टू टाइम्स मोठे असते.
मला शिप आतून कधी बघायला मिळेल?
शिप चे इंजिन कसे असते? किती मोठे असते?
मग तू शिप मध्ये काय काम करतो ? माझ्या मुलाला पडणारे हेच सगळे प्रश्न मला सुद्धा मी त्याच्या एव्हढा असताना पडायचे. कारण मामाकडे मांडव्याला जाताना असेच भाऊच्या धक्क्यावरुन रेवस मार्गे लाँच ने जावे लागायचे. त्याला पडणारे प्रश्न तो विचारत होता आणि मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. मी तर त्याच्या पेक्षा लहान होतो तेव्हापासून लाँच ने प्रवास केला आहे. त्याच्या एव्हढा असताना मला जहाजावर दिसणाऱ्या लोकांबद्दल नेहमी कुतूहल असायचे.
जहाजावरुन मुलाला व्हिडिओ कॉल केला तर त्याचे एकसारखे सुरू असते, ड्याडा तुझी रुम दाखव, तू कुठे झोपतो ती बेडरूम दाखव, तुझे बाथरूम दाखव, बाथ टब दाखव. तुझे किचन दाखव. तुमच्या सगळ्यांसाठी जेवण कोण बनवतो? तुझे ऑफिस दाखव. तूझ्या शिप वरील इंजिन दाखव. तुझी आता सुट्टी आहे का ?
सुट्टी असल्यावर तू काय करतो?
फिरायला कुठे जातो का?
त्याला असा पण प्रश्न पडला होता की शिप वर लाईट कुठून येते? समुद्रात त्याला लाईट चे खांब आणि तारा दिसल्या नाहीत. मग त्याला सांगितले आपल्या घरी कसा जनरटेर आहे लाईट गेल्यावर आपण त्याला चालु करतो तसा शिप वर पण मोठा जनरेटर आहे त्याच्यापासून लाईट येते. मग त्या जनरेटरला पेट्रोल लागते की डिझेल लागते? मग तुमचे शिप कुठल्या पेट्रोल पंपावर डिझेल भरायला जाते? समुद्रात पेट्रोल पंप असतात का? त्याला सांगितले रस्त्यावर जे टँकर दिसतात ना तसे एका वेळेला शंभर टँकर भरतील एवढं डिझेल आम्हाला एका महिन्याला लागते. मग त्याचा प्रश्न पण मग एव्हढे शंभर टँकर समुद्रात कसे काय शिप जवळ येतात ते बुडत नाहीत का? मग त्याला समजावले शिप ला डिझेल घेऊन खुप छोटी शिप येते ज्याच्या मध्ये शंभर दोनशे रस्त्यावर असणाऱ्या टँकर एवढं डिझेल असते आणि ती छोटी शिप समुद्रातच आमच्या शिपला डिझेल देऊन निघून जाते.
त्याला शिपच्या इंजिन रुम मधील व्हिडिओ पाठवल्यानंतर तो मला विचारत होता की ड्याडा एव्हढा आवाज का येतो, तुला आवाजाचा त्रास नाही का होत? तुम्ही एवढ्या आवाजात कसे काम करता? एकमेकांशी कसे बोलता? समुद्राच्या लाटा आणि जहाजाचे हेलकवणारे व्हिडिओ बघून तो विचारतो, ड्याडा शिप एव्हढी हलत असते पण मग तुला झोप कशी लागते? तू बेड वरुन खाली पडत नाही का? तुला उलटी सारखं वाटतं नाही का ? एका व्हिडिओ मध्ये इंजिन रुमच्या 38 °c तापमानात सलग दोन तास काम करत होतो काम यशस्वी झाले आणि ट्रायल घेत असताना व्हिडिओ शूट केला ज्यात आम्ही पाच सहा जण घामाने चिंब भिजलो होतो. आमचे बॉयलर सूट तर भिजलेच होते पण चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. माझ्या मुलाने तो व्हिडिओ बघितला आणि विचारले ड्याडा एव्हढा घाम येईपर्यंत का काम करत होता? तुझे हात किती काळे झाले होते? काम करताना एवढं गरम होते का? माझे जहाज आपल्या भारतीय प्रमाण वेळे पेक्षा दीड तासाने पुढे असलेल्या देशात असल्या कारणाने, इकडे आठ वाजलेले असताना आपल्या भारतात साडे सहा वाजलेले असतात.
त्याला आठ वाजता वगैरे व्हिडिओ कॉल केला की तो म्हणतो तुझ्याकडे अंधार का आहे? आपल्या घरी तर अजून उजेड आहे.
मग त्याला सांगितले की अलीबागच्या समुद्रात सूर्य बुडताना तू पाहिला होता ना? तो तिकडे बुडाला की सगळ्यात पहिले माझ्या शिपच्या समोर असलेल्या समुद्रात बाहेर येतो मग हळू हळू आपल्या घरी येऊन आणि पुन्हा अलीबागच्या समुद्रात जाई पर्यंत त्याला आमच्या शिप पासून निघाल्यावर तिकडे यायला वेळ लागतो आणि म्हणून इकडे अंधार लवकर पडतो.
त्यावर त्याने विचारले, पण ड्याडा अलिबागला संध्याकाळी समुद्रात बुडालेला सूर्य दुसऱ्या दिवशी सकाळी डोंगरातून बाहेर पडतो मग तूझ्या शिपच्या समोर असलेल्या समुद्रातून पण कसा काय बाहेर पडतो?
मग त्याला सांगितले की आपल्या गावातल्या घरी असल्यावर संध्याकाळी सूर्य कुठे जातो सांग, तो म्हणाला घराच्या पाठी असलेल्या बिल्डिंगच्या मागे. मग त्याला सांगितले की मी आल्यावर तुला यु ट्यूब वर व्हिडिओ दाखवेन की सूर्य कुठून येतो , कुठे जातो दिवस आणि रात्र कशी होते. ठीक आहे ना? चालेल ना? मग ठेऊ आता का आता फोन? त्याला यातले किती समजलेले असते माहिती नाही पण मी आल्यावर त्याला व्हिडिओ मध्ये दिवस रात्र आणि सूर्य कुठून येतो कुठे जातो हे दाखवणार असल्याने त्याचे त्यावेळे पुरते समाधान झालेले असते.
कधी कधी असे वाटते की लहान असताना मुलांना किती साधे साधे प्रश्न पडत असतात जे कधी कोणा मोठ्यांना फारसे पडत नाहीत.
जसं की जहाजावर काय खातो? रात्री कसा झोपतो ? जहाज हलायला लागल्यावर बेडवरून खाली पडतो की नाही? काम करताना आवाज किती असतो,गर्मी किती असते? सुट्टी असल्यावर काय करतो? वेळ कसा घालवतो?
कधी कामाच्या स्ट्रेस मध्ये असल्यावर त्याला लगेच लक्षात येते, मग तो विचारतो ड्याडा आज तू नीट बोलत का नाहीये असा का दिसतो आहे, तुला काही टेन्शन आहे का?
माझ्या मुलाशी बोलताना, त्याच्याशी खेळताना सतत जाणवत असते किती कमी गरजा आहेत त्याच्या. एखादा खेळ खेळताना मुद्दाम त्याच्यासोबत हरलो की त्याच्या जिंकण्यातला आनंद बघून पुन्हा एकदा त्याला जिंकू द्यावेसे वाटते.
त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याच्याशी खेळलो, त्याला जिथं जिथं सोबत नेता येईल तिथं नेले तरी त्याला किती समाधान मिळते. त्याने मागितलेले खेळणे दीले नाही किंवा त्याने सांगितलेली गोष्ट ऐकली नाही तर सुरवातीला नाराज होतो कधी कधी रडतो सुद्धा पण त्याची थोडीशी समजूत घातली तर तो विसरून जातो मजेत मग पुन्हा हट्ट नाही करत की तक्रार नाही करत.
खरं म्हणजे मोठ्यांना असे लहान मुलांसारखे प्रश्नच पडत नाहीत. त्यांना प्रत्येकाला वाटतं असते आपलेच प्रश्न सगळ्यात मोठे असतात तेच आपल्याला सोडवता येत नाहीत.
त्यांना त्यांच्या सोयीनुसार प्रश्न पडतात आणि जेव्हा गरज असेल अडलेले असेल तेव्हाच विचारतात. मोठे झाल्यावर निरागस पणा जाऊन इगो आलेला असतो.
एखाद्या गोष्टीची चीड आली राग आला तर लहान मुलांसारखे व्यक्त न होता, तो राग ,ती चीड मनात दाबून ठेवतात आणि पुन्हा कधीतरी सोयीनुसार काढून दाखवतात.
माणसांचे वय वाढत जाते तसतसे त्यांच्या गरजा वाढत जातात, वयक्तिक प्रश्न वाढत जातात टेन्शन वाढत जाते. आहे त्यात समाधान मानण्याऐवजी अजून अजून मिळवण्यासाठी धडपड वाढत जाते.
— प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन,भिवंडी,ठाणे.
200224
Leave a Reply