सत्य मिथ्या ऐसें कोणें। निवडावें।
सत्य म्हणों तरी नासे। मिथ्या म्हणों तरी दिसे ।।
बाळाच्या जन्मवेळी आणि पुढे प्रत्येक वर्षी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या समयी…
तसं पाहिल तर या संपूर्ण विश्वात आपली ग्रहमाला मग पृथ्वी, नंतर सजीवप्राणी, तद्नंतर चौऱ्यांशी लक्षयोनी या सर्वातून सजीव मानव मग बुद्धीयुक्त व्यक्ती बरोबरीने सधनता, सक्षमता या मुख्य पात्रता फेऱ्या पार केल्यास आपसूकच नातेवाईक, स्नेही, जवळचे सहकारी, काही अनोळखी, मित्र-मैत्रिणी, संस्था समाज यांना जोडणारे, यांचा समुह आपले वाढदिवशी स्मरण, अभिष्ट चिंततो. त्यामुळं अवघ्या सृष्टीसापेक्ष अणुरेणूसमान आपल्या जन्माने, चैतन्यरुपी आत्म्याच्या साहाय्याने आणि मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत देहाच्या आणि प्रत्येक पेशीस्थित निर्मळ मनाच्या, आगमनाचे इष्ट चिंतनाने सकारात्मक स्पंदनं निर्माण होऊन, त्या व्यक्तीचे पर्यायाने समुचित विश्वाचे सत्य, आर्त मनी प्रकटावे, ही मनीषा असावी. भय, भूक, मैथुन आणि निद्रा या लक्षणाने युक्त देहाला सजीव प्राणी म्हणतात. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या येरझाऱ्या आहेतच.
चैतन्यरूपी आत्म्याच्या साहाय्याने मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत मृत्यूसमयी नेमका उलट प्रवाह वाहतो. मिथ्या जडत्वप्राप्त देहाच्या कुडीतून प्राण म्हणजे सत्य आत्मा निर्वाण करून समुचित विश्वात सामावून जातो. मनुष्य या देहाच्या आसक्तीने आक्रोश करतो, परंतु संत मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करतात. जीव-शिवाच्या संकल्पना स्पष्ट होत नाही तोवर हे दु:ख, विलाप होणारच. जन्म-मृत्यूच्या वेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होणे क्रमप्राप्त असते. जन्मवेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होतो आणि मृत्यूवेळी सत्य आत्म्याचा (शिव) आणि देहाची पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) विश्वात पुन्हा विलीन होतात. जन्म-मृत्यूच्या मधल्या आयुष्यात जीव-शिव फक्त देहधारी प्राणी म्हणून वावर करतो. मृत्यू हा विषय खरेतर आपण आनंदावर विरजण पडेल म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक दृष्टीने मृत्यूची कला शिकणे आवश्यक आहे.
मृत्यू-संकल्पना- इथं दोन गोष्टी असतात.
१) मृत्यूचा क्षण-कालरूपी घोडा
सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ।।
२) मृत्यूची जागा
नित्य काळाची संगती । नकळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ।।
एकदा इंद्रसभेत सर्व आमंत्रित देव येतात. विष्णु आपल्या गरुडाला महालाबाहेर सोडून सभेत जातात, तर इतरांबरोबर यमदेवसुद्धा आपल्या रेड्याला महालाबाहेर बांधतात. यमदेवाची नजर बाहेर झाडावर बसलेल्या कावळ्यावर पडते. ते चिंताक्रांत होतात आणि सभेस जातात. चाणाक्ष कावळ्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. यमदेवाच्या चिंताक्रांत नजरेने कावळा चांगलाच घाबरतो. त्याला मृत्यूभयाने घाम फुटतो. ते विष्णू वाहन गरुड पाहतो आणि तो कावळ्याला भीतीचे कारण विचारतो. कावळा इतिवृत्त कथन करतो. गरुड म्हणतो त्यात काय एवढं, आमचे विष्णुदेव जगाचे प्रतिपालक आहेत आणि मी त्यांचा आवडता गरुडवाहन आहे मी तुला मदत करतो. गरुड कावळ्याला पाठीवर बसवून काही क्षणातच गरुडभरारीने खूप दूरवर मेरुपवर्तावच्या गुहेत नेवून लपवतो आणि निश्चिंत रहा इथे यमदूतच काय प्रत्यक्ष यमदेवसुद्धा तुला नेऊ शकणार नाहीत. तुझा मृत्यू टळला असे आश्वस्त करून पुन्हा सभास्थानी येतो. सभा संपल्यावर यमदेव पुन्हा बाहेर येऊन झाडावर कावळा आहे का ते पाहतात. तो नाही म्हणून गरुडाकडे चौकशी करतात. गरुड छद्मीपणे हसून त्यांना कसे फसविले या आविर्भावात तो तर लांब मेरुपवर्तावर गेला असे सांगतो आणि यमदेव निश्वास सोडतात. आनंदलेल्या यमदेवांना पाहून गरुड आश्चर्याने विचारतो की काय झाले? तर यमदेव उत्तरात त्या कावळ्याची घटका भरली होती पण माझ्या अंदाजाने त्याचे मृत्यूस्थळ मेरुपवर्तावर होते आणि हा अजून इथे कसा? माझा अंदाज चुकतो की काय म्हणून चिंतेत होतो. मृत्यूचा क्षण किंवा स्थान आपल्याकडे येते किंवा आपण त्यास्थळी जातो.
रामचरित मानस मध्ये संत तुलसीदास म्हणतात.
तुलसी जसी भवतव्यता। तैसी मिलई सहाय।
आपनो आवई ताही पही। ताई तहा लै जाय।
कालरूपी घोडा देहाला मृत्यूकडे घेऊन जातो, मृत्यूचा क्षण उधारीने मिळू शकत नाही. एक चतुर मनुष्य मृत्यूसमयी दारी आलेल्या यमदूताला वाक्चातुर्याने गुंगवतो, यमदूताला बोलण्यात गुंतवून चहात गुंगीचे औषध घालतो, आणि त्याला गुंगी येते. हा चतुर मनुष्य यमदूताच्या यादीतील प्रथम असलेले आपले नाव फाडून सर्वात शेवटी खाली चिकटवतो. यमदूताला फसवण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने यमदूत शुद्धीवर आल्यावर कामाची घाई करतो आणि त्याला सोबत येण्याचे फर्मावतो. चहाच्या मैत्रीची आठवण देत तो मनुष्य त्याला यादीनुसार बाकीच्यांना अगोदर घेऊन जा, मग माझा नंबर आल्यावर मला ने असे सुचवतो. मैत्रीला जागून यमदूत त्याच्या विनंतीनुसार ठीक आहे, यमदूत ग्लानी उतरल्यावर त्याच्याशी मैत्रीखातर यादी उलटी वाचतो आणि तिथे त्याचा खालून प्रथम क्रमांक लागतो. मी शेवटाकडून सुरुवात करून मग तुला नेतो असे सांगतो तर या चतुर मनुष्याने केलेली चतुराई त्याच्याच अंगलट येते कारण फेरफार केलेल्या यादीत खालून पहिला नंबर याचाच असतो. अशा रीतीने काहीही केले तरी मृत्यूक्षण चुकत नाही, आयुष्यात उसनं, उधारी मिळत नाही.
मृत्यूची घटिका सांगू शकत नाही. ‘मापी लागले शरीर’ जन्माचा दिवस काळ वेळ आधुनिक शास्त्राने सांगता येते पण आज कुठलेही असे शास्त्र नाही की, जे मृत्यूची वेळ आणि दिवस सांगू शकते. आपण मृत्यूच्या क्षणाची असावधता बाळगतो. मृत्यूचा क्षणाचं दैन्य जीवाला एकट्याला सहन कराव लागत.
कर्म, धर्म आणि काम याद्वारे मनुष्याने कितीही उत्तुंग यश प्राप्त केले, तरीही मृत्यू अटळ आहे. सत्कर्म करून अशी उंची प्राप्त करून घ्यावी की मृत्युरूपी घटनेचा आनंदसोहळा गोड मानून घेण्याचा सल्ला संत देतात. आपल्या देहातील आत्मा गेल्यावर देहातील चैतन्य नष्ट होते पण आत्मा चैतन्यरुपी असेल तर जन्म-मरणाच्या फेऱ्या चुकवू शकतो.
असो ऐसे सकळही गेले। परंतु येकचि राहिले।
जे स्वरुपाकार जाले। आत्मज्ञानी।।
अखिल विश्वात सदेह चिरंजीवित्व प्राप्त झालेले फक्त अश्वत्थामा आहेत, परंतु आपण चैतन्याने चिरंजीव होण्याचे कष्ट घेतल्यास मृत्यू अटळ आणि आनंददायी मानायला शिकू.
सदर पुस्तक परमार्थस्वरूप अध्यात्माचे दाखले देत मृत्यूपूर्व तसेच मृत्यूपश्चात सुनियोजित व्यवहारिक कर्मकांडे त्यांचा मूळ शब्दसंग्रह आणि कृतीसहित प्रस्तुत करताना लेखकाने कोणताही अभिनिवेश न बाळगता मृत्यू या दुर्लक्षित विषयावर अनुषंगिक विवेचन प्रसिद्ध करताना पुस्तक परिपूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे, त्याचे सुजाण वाचकांनी स्वागतच करावयास हवे.
इदं न मम
लेखक – श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply