नवीन लेखन...

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

प्रतिभा- व्हिन्सेंट व्हॅन गॉगची  (३० मार्च १८५३ – २९ जुलै १८९०)

फ्रान्स मध्ये १८८० पासून फोफावलेल्या ‘पोस्ट इम्प्रेशनिस्ट’ चित्रकला चळवळीतील एक अग्रणी कलावंत म्हणून व्हॅन  गॉगची इतिहासात नोंद झाली आहे. या चळवळीने मानवाच्या मानसिक, भावनिक, प्रतीकात्मक,  बौद्धिक आणि आध्यात्मिक घटकांना चित्रकलेमध्ये प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला.

ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम हे व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो .


युरोप टूर मधील मध्ये ४ ऑगस्ट 2009 चा मंगळवारचा तो दिवस होता. त्याआधी मला फक्त, मोनेट, ,लिओनार्दो दा विंची’ व्हिन्सेंट व्हॅन गॉग, रिमब्रँड्ट, पाब्लो पिकासो, अशा, अभिजात कलाकारांची थोडी माहिती होती, पण मी आज खूप खुश होते कारण   ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम बघायला आम्ही निघालो होतो.  आम्ही सकाळी तिथे पोचलो.  नेहमीप्रमाणेच जगभरातील पर्यटकांची लगबग आणि गर्दी होती. व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे हे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो . फ्रान्स मध्ये १८८० पासून फोफावलेल्या ‘पोस्ट इम्प्रेशनिस्ट’ चित्रकला चळवळीतील एक अग्रणी कलावंत म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली आहे. या चळवळीने मानवाच्या मानसिक, भावनिक, प्रतीकात्मक,  बौद्धिक आणि आध्यात्मिक घटकांना चित्रकलेमध्ये प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला.

या म्युझियम मध्ये व्हॅन गॉगच्या चित्रांबरोबरच,  समकालीन फ्रेन्च कलाकार , मोनेट, पॉल  गौगीन, ओदिलोन रेडॉन , जॉर्जेस सेऊर्ट  यांच्या सुद्धा सुंदर कलाकृती आहेत.  १८४०- १९२०  या काळातील फ्रेंच कलेवर भर  दिला गेला आहे. या म्युझियम मधील शंभर उत्कृष्ट चित्रे ‘मास्टर पिसेस’ म्हणून ओळखली जातात. . त्यातील ७५ कलाकृती   व्हॅन गॉगच्या, उर्वरित, २५ कलाकृती या इतर चित्रकारांच्या आहेत.  व्हॅन गॉग सारख्या महान चित्रकाराचा फक्त १० वर्षांतील  प्रवास थक्क करणारा आहे.

व्हॅन गॉग म्युझियमची स्थापना आणि उभारणी

जोहाना

व्हॅन गॉग म्युझियम ची स्थापना आणि उभारणी कशी झाली याचा थोडक्यात इतिहास पाहणे मनोरंजक ठरेल.  व्हॅन गॉगला, ‘थिओ’ नावाचा लहान भाऊ होता.  व्हॅन गॉगच्या खडतर जीवनाचा ‘थिओ’ म्हणजे ‘विसावा’ आणि आधारस्तंभच ठरला.  व्हॅन गॉग आपली सर्व चित्रे पॅरिसला थिओकडे   पाठवत असे.  थिओ’ला  भावाची फार कदर होती. आयुष्यभर त्याने नैतिक, तसेच आर्थिक पाठिंबा व्हॅन गॉगला दिला. आपल्या  उत्पन्नातील ठराविक रक्कम तो व्हिन्सेन्टला पाठवत असे. १८९० मध्ये वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी व्हॅन गॉगचा मृत्यू झाला. आणि पाठो पाठ १८९१ साली  ‘थिओ’चा सुद्धा मृत्यू झाला.  थिओच्या मृत्यूनंतर,  सर्व चित्रांचा संग्रह कायद्यानुसार थिओच्या मुलाच्या,  विल्यम व्हॅन गॉगकडे गेला.  थिओची पत्नी ‘जोहाना’, ’ व्यवस्थापक म्हणून काम पहात होती . तिने व्हिन्सेन्टच्या कामाचे ‘प्रमोशन’ सुरू केले .वेगवेगळी प्रदर्शने भरवून,  चित्रांची विक्री केली. पण या कलेची संपत्ती केवळ कुटुंबा पुरती न राहता,  सर्वांसाठी खुली असावी ,  या सदिच्छेने तिने “विन्सेंट व्हॅन गॉग”  ही संस्था स्थापन केली.  2 जून १९७३ रोजी म्युझियम सुरू झाले.  पण सदैव पर्यटकांची गर्दी  वाढतच गेल्यामुळे सुप्रसिद्ध स्थापत्यकार,  ‘किशॊ-कुरोकावा’  यांच्या कल्पनेतून १९९९ साली,  ‘लंब- वर्तुळाकार’ आकाराचे, नवीन दालन साकार करण्यात आले.

या नवीन इमारतीस चार मजले असून पहिल्या मजल्यावर फक्त  व्हॅन गॉगच्या प्रसिद्ध कलाकृती आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर, अभ्यासिका, संगणक, पुस्तके, शैक्षणिक प्रदर्शने,  प्रिंटिंग रूम  अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.  तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर व्हॅन गॉग व इतर समकालीन कलाकारांची चित्रे आणि त्याच प्रमाणे व्हॅन गॉगची जतन  करून ठेवलेली पत्रे आहेत.  जोहानाने, दूरदृष्टीने हे सर्व जतन करून ठेवले आहे. त्याकरता तिच्या  दूरदृष्टीचे आभार संपूर्ण कला विश्वाने,  तसेच कलाप्रेमींनी मानलेच पाहिजेत, नाहीतर व्हॅन गॉग सारख्या एका महान कलाकाराची ओळख आपल्याला कधीच  झाली नसती

अशा ह्या सुप्रसिद्ध  चित्रकाराचा जन्म 30 मार्च १८५३ रोजी नेदरलँड मधील झुंडर्ट (Zundert) या लहानश्या गावात झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात,  पण त्याच्या बाबतीत मात्र चित्र जरा वेगळेच आहे. त्याच्या जन्माच्या आधी, एक वर्षांपूर्वी त्याच दिवशी,  त्याच्या आईने एका जन्मतः  ‘मृत’ मुलाला जन्म दिला होता. त्याची सावली म्हणून आईने याचे नाव सुद्धा विन्सेंट असे ठेवले. ही सावली त्याचा जन्मभर पाठलाग करीत राहिली आणि आई जिवंत असताना सुद्धा त्याला आईचे खरे प्रेम कधी मिळू शकले नाही.  लहानपणी एकाकी, दुर्लक्षित असे आयुष्य जगत,  शेतातून तो  एकटाच फिरत असे. आपल्या अंगी असलेल्या चित्रकलेच्या कौशल्याचा त्याला जराही  गंध नव्हता. इतक्या बालपणीच आई पासून झालेल्या वियोगाचा त्याच्या मानसिक संतुलनावर  गंभीर परिणाम झाला आणि तो वय वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर अतिशय गहन अश्या  मानसिक विकारानमध्ये होत गेले. आईच्या प्रेमाची जागा भरून काढण्याचा त्याने अविरत ध्यास घेतला.

शेव्हनिंजेनचा समुद्र

एका प्रतिष्ठित अश्या ‘डुच’ घराण्यात जन्म घेऊन सुद्धा, वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याने आपल्या काकांच्या पार्टनरशिप मध्ये असलेल्या कलाविषयक फर्ममध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनकाम करण्यास सुरुवात केली.  तेंव्हापासून २७  व्या वर्षापर्यंत त्याने,  आर्ट डीलर, , शाळा मास्तर,  तसेच मिशनरी वर्कर म्हणून काम केले,  तो कुठेच फार काळ टिकू- रमू शकला नाही. १८७९ मध्ये दक्षिण  बेल्जियम मध्ये ‘बोरीनाझ’ परिसरात कोळश्याच्या खाणीत काम करताना ही नोकरी सुटल्यामुळे तो परत आपल्या गावी घरी आला. पण या अनुभवाचा त्याचा पुढील आयुष्यावर दूरगामी परिणाम झाला. शेतकरी आणि कामकरी यांच्या जीवनाबद्दल त्याला अतीव कणव आणि प्रेम वाटत राहिले. हीच त्याच्या पुढच्या आयुष्यात केलेल्या संघर्षाची ‘शिदोरी’ बनली. हे प्रेम अंतःप्रेरणांचे चित्रकलेत परिवर्तन करू शकणारी, उदात्तीकरण करणारी ‘ऊर्जा’ झाली. कोळसा खाण कामगार त्याला ‘द क्राईस्ट ऑफ द कोल माईनर्स” म्हणून ओळखत असत.

न्यूएनएनचे चर्च

धाकटा भाऊ, थिओ याच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रातच पाय रोवायचा असे ठरविले. चुलत बहिणीशी विवाहबद्ध झालेला (मेव्हणा) ‘वास्तववादी’ चित्रकार  ‘अँटोन  मोव्हे’,  याच्या देखरेखीखाली डिसेंबर १८८१ मध्ये त्याने पहिली वाहिली चित्रे काढण्यास सुरवात केली. व्हॅन गॉग च्या पत्र लेखनामध्ये त्यांचा अनेक वेळा उल्लेख आढळतो.

१८८४ मध्ये, अशीच एक घटना घडली. व्हॅन  गॉगच्या आईच्या मांडीचे हाड मोडले. त्याची बहीण ‘विल’, तिच्याबरोबर त्याने आईची अगदी मनापासून सेवा केली. त्यावेळी गावात नवीन सुधारित बांधलेल्या न्यूएनएन चर्चचे  चित्र त्याने आईला भेट म्हणून दिले.

बालवयापासूनच त्याच्यावर आजूबाजूला वावरणाऱ्या शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा, तसेच विणकारांचा प्रभाव पडला होता. त्याच्या चित्रांचे निरीक्षण केले असता हे आपल्याला सहजपणे जाणवते. त्यांचे भावविश्व आणि त्यांचे संघर्षमय जीवन यांची अभिव्यक्ती त्याच्या चित्रांमध्ये पुरेपूर दिसून येते. आणि म्हणूनच त्याची चित्रे ज्वलंत रंग- संगती आणि संवेदनांनी परिपूर्ण झाली आहेत. त्याने खाणकामगारांची अनेक चित्रे  चारकोल ने रंगविली आहेत .

गरीब कामकरी जीवनाशी त्याचे विणले गेलेले घनिष्ट ‘भाव- संबंध’ त्याच्या प्रत्येक चित्रात जाणवतात. खाण कामगारांसाठी तो जीव तोडून झिजला, थंडीत आपल्या अंगावरील शर्टसुद्धा काढून दिला. औद्योगिकरण, त्याचा कामगार आणि ग्रामीण जीवनावर खोलवर झालेला परिणाम हे त्याच्या अंतस्थ मनात घोळणारे विषय होते.

एप्रिल १८८५ मध्ये  ‘ बटाटे खाणारे’  (‘The Potato Eaters’) चित्र त्यांनी चितारले. त्यापूर्वी त्याने प्राथमिक स्केचेस, पोर्ट्रेट स्टडीज आणि लिथोग्राफ्स केले होते.

‘पोटॅटो इटर्स’  हा त्याच्या कलेचा अत्यंत उत्कृष्ट असा नमुना म्हणून समजला जातो, ‘मास्टरपीस’ म्हणून तो  नावाजला गेलेला आहे.  शेतकऱ्याला  त्याच्या जमिनीपासून दूर करणं केवळ अशक्य!  शेतात कष्ट करून, घाम गाळून दमलेल्या अवस्थेतील ‘’ग्रुप कुटुंब’,  मॉडेल म्हणून  व्हॅन गॉगकडे प्रत्यक्ष येत असत.

Potato Eaters – पोटॅटो इटर्स

या शेतकऱ्यांना त्याचा विषयी अतिशय आदर वाटत असे. ज्या हातानी ते शेतात राबले, त्याच हातांनी आपण उत्पादित केलेले बटाटे ते ताटात ठेवलेले बटाटे सोलून खात होते. अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचा हा त्यांचा उदरनिर्वाह ! त्यामुळे या “न सोललेल्या “ बटाट्यांच्या रंग त्याने या चित्रासाठी  वापरला आहे. प्रथम तो जवळ जाऊन चित्र काढीत असे,  परंतु सहकलाकारांनी दिलेला सल्ला लक्षात घेऊन मनोमनी रुजलेले कल्पना-चित्र  त्याने काढण्यास सुरुवात केली. यावेळी टेबलावर पसरलेले मळकट कापड, धुरकटलेल्या भिंती,  ओबडधोबड तुळ्यांवर ‘टांगलेला दिवा’, बटाटे खाणाऱ्या स्त्रियांचे आणि पुरुषांचे हात आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव या सर्व गोष्टींचा विचार करून त्याने ते चित्र रंगवले. अति शारीरिक  श्रमामुळे त्यांचे खडबडीत चेहरे चित्रित करण्यासाठी गडद मातकट रंगाचा मुद्दाम वापर केला आहे. ते जसे होते तसेच ‘त्यांना’ चित्रित  करावयाचे होते. कामकरी माणसाच्या आयुष्यातला आनंद,  दुःख, चित्रात उमटले पाहिजे म्हणून विश्वाच्या लयीचे चित्रण त्याला करावयाचे होते. चित्र मनासारखे होईपर्यंत काम करीत राहायचे हेच त्याचे ध्येय . तेवढी चिकाटी त्याच्याजवळ निश्चितच होती आणि म्हणूनच एखाद्या पिसाटासारखा तो काम करत होता

व्हॅन  गॉगची खरी ओळख आपल्याला त्याच्या चित्रांतूनच अधिक होते. त्याचं काम आहे ते केवळ त्याच्या आयुष्याच्या २७  वयापासून ३७  वयापर्यंत म्हणजेच दहा वर्षाच्या कालावधी पर्यंतच सीमित होते. या दहा वर्षाच्या काळात झपाटल्याप्रमाणे त्यांनी तब्बल ९०० चित्रे काढली.  नऊशे चित्रे  दहा वर्षाच्या कालावधीत  बसवायची झाली तर, दर छत्तीस तासात  त्याने एक नवीन चित्र काढले आहे

पहिल्या मुलाच्या वियोगाने अस्वस्थ झालेल्या आईला या ‘व्हिन्सेंट  बद्दल कधी प्रेम वाटले नाही . आई आणि मुलामधले भावनिक अंतर, पराकाष्ठेला पोहोचले. याचा त्याचा मनावर खोल आणि कायमस्वरूपी दूरगामी परिणाम झाला.  त्याचा स्वभाव  विक्षिप्त बनला होता. आई-वडिलांशी ‘न जुळणार’  नातं , पैशाची सदैव चणचण अस्थिर आणि खडतर आयुष्य,  आणि अनिश्चितता त्यामुळे तो काही प्रसंगी अतिशय उद्दीपित होत असे तर काही वेळा अतिशय उदासीन होत असे. या चक्रव्युवाहात तो सापडला.   अशाच एक प्रसंगी, पॉल  गौगीन, या सह चित्रकाराशी  त्याचे जबरदस्त भांडण झाले.  त्या प्रसंगी त्याने पॉल गोगीनवर हात उगारला नाही किंवा कोणताही वार केला नाही.  त्याने रागाच्या भरात आपल्या डाव्या कानाची पाळीच कापून टाकली ! या मानसिक झटक्याच्या ओघात त्याने कानाची कापलेली पाळी  एका वेश्येला  भेट म्हणून दिली.

— वासंती गोखले
vasantigokhale@gmail.com

भाग २ – रविवारी १७ ऑटोबर २०२१ रोजी येत आहे. 

1 Comment on प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

  1. I enjoyed reading this article. Most tourists, when they visit sights, pay scant attention to real life view before them. Instead, they are focused on taking pictures which they will later proudly forward to their WA of FB groups. Mrs. Gokhale is not a typical tourist. She has taken time to admire and appreciate the beauty around her, study the subject, research the background and present her findings and impressions in a well organized manner along with appropriate pictures and illustrations with the view of educating, inspiring and entertaining the reader. Very well done !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..