शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’
शरद पवार यांचे आई शारदाबाई पवार व वडील गोविंदराव पवार हे मुळात सत्यशोधक चळवळीतले सक्रीय कार्यकर्ते. शरद पवार यांच्या लग्नाच्या वेळी या दोघांना हवं होतं ते ते आपल्या मुलाला अनुरूप अशी जोडीदार… बास!
बड्या बड्या घराण्यातले प्रस्ताव झुगारुन टाकत पवार दांपत्यानी पुण्यातील एका साधारण घराण्यातल्या स्थळाला पसंदी दिली. सदाशिव उर्फ सदू शिंदे नावाचे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू यांची थोरली कन्या प्रतिभा शिंदे यांचं स्थळ कुणीतरी सुचवलं. पवार कुटूंब शिंदेच्या मुलीला पहायला आले अन त्याना हे स्थळ पसंद पडलं.
सदू शिंदे पुरोगामी विचाराचे होते व त्यानी आपल्या मुलिंवर तसे संस्कार केले होते. पण १९५५ साली अल्पशा आजाराने सदू शिंदेचे निधन झाले अन सदू शिंदेच्या पत्नी निर्मलाताई शिंदे यांच्यावर चारही मुलींची जबाबदारी येऊन पडली. पण निर्मलाताईही भक्कम होत्या. त्यांचा जन्म बडोद्याचा. निर्मलाताईचे वडील ब्रिगेडीयर अरविंद राणे हे कडक शिस्तीचे भोक्ते तर होतेच पण सयाजीराव गायकवाड सारख्या पुरोगामी संस्थानिकाच्या राज्यात आयुष्य गेल्यामुले ते ही प्रखर परिवर्तनवादी नि पुरोगामी वृत्तीचे होते. निवृत्तीनंतर ब्रिगेडियर राणे हे पुण्यातच राहायला आहे व त्यांच्या देखरेखीत शिंदे कुटूंबातल्या मुलींची जडणघड्ण झाली.
प्रतिभाताईनी मात्र आजोळी बडोद्याला, नंतर पुण्यातील भावे हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. कॉलेजातून केले. दोन्ही कुटूंब पुरोगामी विचाराचे असल्यामुळे लग्न जुळवताना अजिबात रुसवे फुगवे झाले नाही. पण तरी सुद्धा मुलीची आई म्हणून निर्मलाताईना धाकधूक होतीच. तेंव्हा त्यानी हळूच शारदाबाईकडे विचारण केली“देण्या घेण्याचं काही बोललात नाही?” अन शारदाबाईनी हसून म्हटलं “नुसतं नेसल्या साडीवर मुलगी पाठवा. बाकीचं आम्ही बघून घेऊ” अन निर्मलाताईंच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. जसं हवं होतं तसं स्थळ मिळाल्यामुळे शिंदे-राणे कुटूंब सुखावून गेले. लग्न पक्के झाले.
पण थोड्याच दिवसात शरद पवार एकटेच थेट पुण्यात आले व राणेना भेटून म्हणाले “मला मुलीशी काही महत्वाचं बोलायचं आहे… एकांतात भेट हवी” राणे दोन मिनटं गोंधळले खरे पण स्वत:ला सावरत होकार दिला. काय बोलले असतील पवार या एकांत भेटीत? पुढचं आयुष्य राष्ट्रासाठी व समाजासाठी वाहून देणार आहे. संसारासाठी फार वेळ देणार नाही हे सगळं तर आहेच पण त्याही पेक्षा एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी एक राष्ट्रव्रत घेतला आहे ते सांगण्यासाठीच ईथे आलो आहे. “आता काय परत राहिलं यांचं राष्ट्रव्रत??? आयुष्यतर म्हणे समाजासाठी वाहणार तेंव्हा आजून काय उरलं” म्हणत त्या पवारांकडे पाहात होत्या.
अन पवार बोलू लागले ते काहीसं असं. “आपल्या देशाची परिस्थीत फार हालाखीची आहे हे समजावून सांगताना त्याचं मुख्य कारण ईथली लोकसंख्या आहे. लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी लोकानी स्वत:हून पुढाकार घेत एक किंवा दोन अपत्यावरच थांबावे मी या विचारसरणीचा आहे. ईतराना हा विचार सांगण्याचा व भावी पिढ्यात तो रुजविण्याचा माझा विचार आहे. पण मी जेंव्हा लोकांपुढे तो प्रस्ताव ठेवेण वा विचार मांडॆन तेंव्हा लोकं मला विचारतील. त्यावेळी मला तो विचार मी आधीच कृतीतून उतरविला आहे हे सांगायचे आहे. माझा आदर्श घेत ईथला समाजही अपत्य जन्मावर नियंत्रण घालेल. यातून राष्ट्राची लोकसंख्या आटोक्यात येईल व देशाची भरभराटी होण्यास मोठी मदत होईल. पुढच्या पिढ्यामधे ही जागृती निर्माण करण्यासाठी मी एक अपत्य ठेवण्याचं राष्ट्रव्रत घेतलं आहे. मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी असो मला ते पहायचं नाहीये. पहिल्याच बाळावर आपल्याला थांबायचे आहे नि मला यात तुझी साथ हवी आहे…” प्रतिभाताईची अवस्था काय झाली असेल विचार करा. पण शेवटी पुरोगामी रक्त ते… पुरोगामित्वाच्याच वाटेवर जाणार. “चालेल…” मनोधैर्य एकवटून प्रतिभाताईही बोलल्या अन पवारांच्या एक अपत्याच्याराष्ट्रव्रतातील चळवळीच्या त्या पहिल्या अनुयायी ठरल्या.
१ ऑगष्ट १९६७ रोजी बारामतीच्या शाहू हायस्कूलच्या पटांगणात प्रतिभाताई व शरद पवारांचा विवाह संपन्न झाला. देणे घेणे नाही, हुंडा नाही, रुसवे फुगवे नाही… वा मानपान नाही. असा तो साधासुधा लग्नसोहळा होता. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. – एम. डी. रामटेके; इंटरनेट
Leave a Reply