गावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर मोठा भाऊ होताच. त्याची मुलं पण होती. पण ती कुणाचंच ऐकेना. शेवटी आता ही काही फार दिवसांची सोबती नाही असा विचार करून मी होकार दिला. तिच्या पसंतीची मुलगी पाहून लग्नही केलं.
विद्यापीठाकडून वरचे वर बोलावणं येतच होतं. त्यांच्याकडून दोन वर्षांची मुदत मागून घेतली. त्याला आईने पण संमती दिली.
मग माझ्या मनात एक धाडसी विचार आला. बहुतेक संशोधन संगणकाच्या मदतीने होत होतं. काही विशिष्ट उपकरणं लागत होती ती जर विद्यापीठाकडून मिळवली तर मी इथून सुद्धा त्यांच्या संशोधनासाठी काम करू शकणार होतो. पण हे संशोधन अत्यंत गुप्त असल्यामुळे विद्यापीठाने ही कल्पना साफ नाकारली. अर्थात माझी ही कल्पना पूर्ण अव्यवहार्य आहे हे मलाही समजत होतं, पण एकीकडे हातातोंडाशी आलेलं अत्यंत महत्त्वाचं संशोधन आणि दुसरीकडे आईची माया या कात्रीत सापडल्यामुळे मी काय करतो आहे ते माझं मलाच कळेना. अगदी अडल्यासारखं झालं. घोडं अडलं तर काय करायचं? ते फिरवलं पाहिजे.
बस्स! मग मी माझ्या संशोधनाची दिशाच फिरवायची असं ठरवलं. रक्ताच्या थेंबातून तात्काळ राक्षसच तयार होऊन लढाईला तयार व्हायचा ही कविकल्पना का असेना, पण हीच कल्पना घेऊन आधी जीव निर्माण करून तो वाढवायचा आणि पूर्ण वाढीसाठी तितकी वर्ष थांबायचं ही मूळ कल्पना थोडी बदलून रक्तपेशीतून त्या रक्तपेशी ज्या वयाच्या व्यक्तीच्या असतील त्याच वयाची व्यक्ती का निर्माण करू नये असा विचार मी करू लागलो.
आमच्या वाड्याचा मागचा भाग पूर्ण रिकामाच होता. मी त्याचा कायापालट करून त्याचं रूपांतर माझ्या संशोधन केंद्रात केलं. माझं काम आणि मी कसलं संशोधन करत आहे याचा कुणालाच काही गंध नसल्यामुळे माझं काम अगदी निर्वेध सुरू झालं.
सूक्ष्म प्रतिकृती प्रथम तयार करायची या संकल्पनेमुळे प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची मोजमापंही लहान होती. मी स्वत: मोठ्या कष्टाने ती मोठ्या मापात तयार केली. दिवाळीच्या फटाक्यात एक सापाचा फटाका असतो. एका छोट्या तुकड्याला काडी लावताच तो पेटून त्यातून एक मोठा साप निर्माण होतो, तसं रक्ताच्या एका थेंबातून प्रतिकृती निर्माण करून अतिउच्च दाबाने तिचं प्रसरण करून पेशींची निर्मिती पूर्णाकृतीमध्ये रूपांतरित व्हावी असा माझा प्रयत्न सुरू झाला. जेवणाखाण्याची पर्वा न करता मी अगदी झापटल्यासारखा या प्रयोगाच्या मागे लागलो आणि एक दिवस एका पूर्ण वाढलेल्या उंदराची प्रतिकृती निर्माण करण्यात मी यशस्वी झालो! उंदीर निर्माण झाला. तुरूतुरू इकडेतिकडे पळाला आणि क्षणातच त्याचं रूपांतर पुन्हा एका रक्ताच्या थेंबात होऊन गेलं. जणू एखादं बॅटरीवर चालणारं खेळणं बॅटरी संपताच बंद पडावं तसं झालं. फरक इतकाच की इथे खेळणं गायबही होत होतं.
बऱ्याच अभ्यासानंतर मी असा निष्कर्ष काढला की, ही प्रतिकृती तयार करताना मूळ प्राण्याचं जे शरीर असतं ते त्या त्या वयानुसार तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो आणि त्या वयानुसार शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी जी शक्ती लगाते, ती प्रतिकृतीमध्ये त्वरित उत्पन्न होण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.
मानवी आयुष्य संपूर्ण निरोगी करण्याकडे विज्ञानाचं संशोधन चालू आहे. माणूस अमरत्व मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. हे तर सर्वश्रूत आहे. त्याच आधारावर काही विशिष्ट हार्मोन्स किंवा पोषक द्रव्यं त्या त्या ठराविक वयाच्या शरीरास आवश्यक अशा प्रमाणात देऊन रक्तपेशीपासून हव्या त्या वयाची जिवंत प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रयोग मी सुरू केला आणि हळूहळू माझ्या प्रयोगाची दृष्य फळं दिसू लागली. माझे उंदीर एक तास, दोन तास, एक दिवस, दोन दिवस, एक आठवडा असे जिवंत राहू लागले! पूर्ण वाढीचे उंदीर! माझा आनंद तर गगनात मावेना!
मग मी हे प्रयोग मोठ्या प्राण्यावर म्हणजे सशांवर केले तेही यशस्वी झाले. प्रत्येक प्रतिकृती अगदी हुबेहूब आणि त्याच वयाची! सूक्ष्म प्रतिकृतीतून पूर्णाकृती निर्माण करण्यासाठी मी दोन कुप्या विकसित केल्या होत्या. छोट्या कुपीत प्रतिकृती निर्माण करून ती पूर्णाकृती मोठ्या प्रतिकृतीच्या कुपीतील रसायनात रोपण करताच तिचं सुमारे दोन तासात पूर्णाकृतीमध्ये रूपांतर होत होतं आणि तेही मी माझ्या समोर पाहू शकत होतो! मानवी प्रतिकृतीसाठी हा कालावधी पाच ते सहा तासांचा लागेल असा माझा अंदाज होता. अत्यंत क्रांतिकारक असा हा शोध होता पण त्याला जागतिक मान्यता मिळवण्यासाठी मला पुन्हा मेरीलँडला जाणं आवश्यक होतं, पण तूर्तास ते शक्य नव्हतं.
-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)
Leave a Reply