आपण अनेकदा घडून गेलेल्या घडामोडी आणि घटना ह्यांच्यातच गुरफटलेले असतो. त्या लवकर विसरत नाहीत. त्यांतही नकारात्मक गोष्टी आपल्याला अधिकच सतावत राहतात, दु:खी करतात. आपल्या विचारांत सकारात्मकता आणल्याने येणारा अनुभव आणि त्याद्वारे मिळणारा आनंद निश्चितच आंतरिक समाधान आणि मानसिक शांती देणारा असतो.
प्रत्येक बाबीकडे खिलाडू वृत्तीनं बघितलं, आनंदानं प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला तर आपल्या जीवनशैलीत नक्कीच बदल घडून येऊ शकतात. हे अनुभवण्यासाठी चांगल्या माणसांची एक साखळी तयार करण्याचा आपला नेहेमी प्रयत्न असावा. अर्थात त्यामुळे आपण नेहमीच भेटू अगर न भेटू परंतू आपले चांगले विचार नक्कीच एकमेकांपर्यंत पोहोचत राहू शकतात.
आपल्या व्यक्त होण्याचा संबंध आपल्या मनाशी असतो तसंच एका व्यक्तीच्या अंतरंगाचा संबंध त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं असतं.
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात – मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. ह्या सकारात्मक विचारांचा उपयोग आपल्याला होत राहतो. जेवणातल्या मीठाप्रमाणे जीवनात चव आणणाऱ्यांपैकी आणि जीवनाची गोडी वाढवणाऱ्यापैकी आपण एक असावं आणि आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घ्यावी, असा सकारात्मक विचार प्रत्येकानं करायला सुरुवात केली तर एकूणच वातावरणात सकारात्मकता, जाज्वल्य, आश्वासकता निर्माण झाल्याची प्रचीती येऊ लागते.
दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply