महाराष्ट्र राज्याच्या अन् पर्यायाने देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून, सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा विचार गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.
१९०४ मध्ये सर्वप्रथम भारतात सहकार कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर अनेकवेळा कायद्यात बदल झाले. १९०४ नंतर १९१२ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट अस्तित्वात आला.
या पार्श्वभूमीवर नुकतेच संसदेने सहकारविषयक १११ वी घटना दुरुस्ती मंजूर केल्याने, त्यानुसार प्रत्येक राज्याला आपल्या कायद्यात योग्य ते बदल करावे लागणार आहेत. संबंधित घटना दुरुस्ती विधेयक हे जरी डिसेंबर २०११ मध्ये मंजूर झालेले असले, तरी त्याची सुरुवात डिसेंबर १९९०-९१ मध्येच झालेली होती. प्रस्तुत पुस्तकात श्री. विद्याधर अनास्कर यांनी हा प्रवास अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडला आहे. सहकार क्षेत्रातील प्रत्येकाने आणि इतरांनीही हा प्रवास जाणून घेणे आवश्यक आहे. एखादे विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण त्या अंतिम विधेयकामधील वाक्यरचनेचाच विचार करतो. परंतु त्यामागील शासनाचा उद्देश आणि त्यासंबंधात झालेल्या चर्चेचा अभ्यास केल्यास कायदा करणार्यांच्या मनामध्ये नेमके काय आहे ते समजाऊन घेणे सोपे जाते. तसेच एखादे विधेयक मंजूर होते म्हणजे नेमके काय होते, त्याची प्रक्रिया कशी चालते. त्यामागे कितीजणांचे हातभार लागतात, याची कोणतीच माहिती सामान्यांना नसते.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या घटना दुरुस्ती विधेयकामधील तरतुदींनुसार ज्यावेळी राज्याचा कायदा दुरुस्त करण्याची वेळ येईल, त्यावेळी या सहकार क्षेत्रातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांने त्यामध्ये आपल्या विचारांचे योगदान देणे आवश्यक आहे. परंतु हे कधी शक्य होईल? ज्यावेळी या कार्यकर्त्यांना या घटना दुरुस्ती मागील संपूर्ण पार्श्वभूमी समजेल त्याचवेळी हे शक्य होईल आणि हे महत्त्वाचे काम प्रस्तुत पुस्तकाने केले आहे.
लेखक श्री. विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मनोगतामध्येच १९०४ पासूनच्या सहकार कायद्यांचा आढावा घेतला आहे. सध्याच्या कायद्याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले आहे. विधेयकाच्या २२ वर्षांच्या प्रवासाचे चित्र रेखाटताना थोडक्यात परंतु अत्यंत प्रभावीपणे हा प्रवासपट आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. स्थायी समितीचे कामकाज, विधेयकातील मुद्यांवर होणारी चर्चा, उच्चस्तरीय समितीसह इतरांचे अहवाल, निष्कर्ष, केंद्रशासनाची भूमिका व शेवटी संसदेच्या सभागृहांचा कौल इत्यादी वर्णने त्यांनी प्रभावीपणे रेखाटली आहेत.
तसेच या पुस्तकात संदर्भासाठी लेखकाने उच्चस्तरावरील समितीच्या अहवालापासून स्थायी समितीचा अहवाल, सदस्यांमध्ये व शासकीय अधिकार्यांमध्ये प्रत्यक्ष झालेली चर्चा सारांश रूपाने दिली आहे. तसेच या घटना दुरुस्तीसंबंधात लेखकाने केलेली अभ्यासपूर्ण चिकित्सा हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा प्रकारे एका विधेयकायचे प्रवास वर्णन रेखाटणारा हा पहिलाच प्रयत्न असावा.
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुस्तकावर अभिप्राय दिलेला आहे.
हे पुस्तक सहकार क्षेत्रातील सर्व अभ्यासकांना, तसेच सहकार विभागातील अधिकार्यांना, जागृत सभासदांना आणि विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनाही अत्यंत उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.
मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील तमाम कार्यकर्त्यांसाठी श्री विद्याधर अनास्कर यांनी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध केले आहे. हे इ-पुस्तक जरुर डाउनलोड करा.
प्रकाशक
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई
भारतीय क्रिडा मंदिर, चौथा मजला, वडाळा
मुंबई – ४०००३१.
आवृत्ती पहिली : जून २०१२
आवृत्ती दुसरी : जून २०१२
किंमत : रु. १५०/-
— मराठीसृष्टी व्यवस्थापन