प्रवासाचं सुंदर देणं …..
बामणोली … वासोटा … नागेश्वर … चोरवणे… अविस्मरणीय ट्रेक)
(हा फोटो वरंध घाट परिसरातला आहे … मागे जो मोठा डोंगर दिसतोय तो … वरंध घाटातला कावळा किल्ला
… महाराजांनी याला फार सुंदर नाव दिलं … चंद्रगड … इथेच खाली स्वामी समर्थांची शिवथर घळ … सुंदर मठ आहे … सह्याद्रीचा हा परिसर पंचमहाभूतांचा मोठा वावर असलेला … महा मातब्बर आहे … सगळ्या प्रदेशात सह्याद्रीचे बेलाग कडे कपाऱ्या आणि घनदाट अरण्य आहे …. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या डोंगरात त्यांचा वाडा होता … जंगल एवढं निबिड की शिवथर घळ जिथे आहे … त्याला वाघजईचं खोरं म्हणत असतं … साहजिकच रामदास स्वामी या प्रदेशाच्या … तिथल्या शांततेच्या प्रेमात पडले असावेत … इथे ते दहा अकरा वर्ष राहिले … याच ‘सुंदरमठात’ दासबोध त्यांना स्फुरला …
गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. असेल सहज ३८ एक वर्षांपूर्वीची …म्हणजे साधारण १९८१-८२ची. त्यावेळी कॉलेजचा एक ट्रेकिंग ग्रुप होता ..कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. त्यातले सहा जण निघालो वासोटयाच्या ट्रेकला. साताऱ्याहून बामणोलीला बसने जाऊन पुढे ‘कोयना’ होडीने ओलांडली. तिन्हीसांजा झाल्याने डोंगराच्या पायथ्याला जंगलात मुक्काम केला. त्यावेळी नदीजवळच्या भागात एकच झोपडी होती. बाकी सगळा परिसर …जंगल निर्जन. आताचं माहित नाही पण त्यावेळी वासोटा म्हणजे व्याघ्रगडाच्या सगळ्या जंगलात अस्वलं मोठया प्रमाणात असल्याने रात्री आम्ही जिथे राहिलो होतो तिथे तीन बाजूंना मोठया शेकोटया पेटवल्या. त्या परिसराला मेट इंदवली म्हणत असत. रात्री तात्पुरती चूल बनवून जेवण करून मंडळी गप्पा मारत बसली. किमान एकाने दोन तास जागं राहून शेकोटी पेटती ठेवायची, असं ठरलं. कोयनेच्या काठावरचं हे जंगल घनदाट आणि निबिड असल्याने तिथे वन्यप्राण्यांचा मोठा वावर होता. रात्री अनेक प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. पाचोळा विपूल असल्याने रानउंदीर जरी गेला तरी पाचोळ्याच्या आवाजावरून ते सहज जाणवत असे. पाचोळ्याचा खूप मोठा आवाज रात्री तीन चार वेळा जवळून आल्याने तेव्हा सुतळी बॉम्ब देखील फोडले. पहाटे उठून वासोटयाचा डोंगर चढलो … किल्ला बघितला … दोघांकडे सोबत मोठया काठीला कापडं गुंडाळून त्यावर काळं तेल चोपडून केलेल्या मशाली होत्या. वासोटयावरून आम्ही डोंगराच्या पलीकडच्या बाजूच्या कोकणातल्या ‘चोरवणे’ इथे जाणार होतो. सगळा रस्ता घनदाट अरण्यातून जाणारा. त्यामुळे त्या दोन मशाली आणि खिशात काडेपेटी असा बंदोबस्त केलेला होता. वाटेत सह्याद्रीच्या एका थोरल्या कडयात नागेश्वराचं जागृत स्थान आहे. तिथे गेल्यावर जंगल थोडं विरळ होत जातं … तिथे आम्हाला चार स्थानिक लोक भेटले …त्यातल्या दोघांकडे मोठया बंदुका होत्या. नमस्कार झाले …. मग त्यातला जो वयाने थोडा मोठा होता … तो म्हणाला … आम्ही तुम्हाला वासोटयापासून सोबत करत आहोत. पण तुम्हाला जाणवू न देता … कारण तुमचा जंगल भटकंतीचा आनंद आम्हाला हिरावून घ्यायचा नव्हता. पण हे जंगल अतिशय मातब्बर आहे … इथे वन्यप्राण्यांपासून खूप धोका असल्याने आम्ही तुम्हाला सोबत करत होतो. पुढच्या वेळी इतकी डेरिंग करू नका. मग आम्ही डोंगर उतरून काही तासांनी चोरवणे गावाच्या हद्दीत पोचलो. तिथे गावाबाहेरच एक शाळा होती. अर्थात रविवार असल्याने बंद होती. मग आम्ही आमचा मुक्काम शाळेच्या ओसरीत केला. दिवसभर भरपूर चालल्याने आणि तिन्हीसांजा देखील जवळ आल्याने कॅरीमॅट अंथरून त्यावर आरामात गप्पा मारत बसलो होतो. पोर्टेबल गॅस पेटवून चहाचा एक राउंड देखील झाला. तेवढयात आखूड धोतर घातलेला … अतिशय साधा दिसणारा एक वयस्कर गृहस्थ आला … आणि आमची चौकशी करू लागला. तो गृहस्थ चोरवणे गावातल्या एका वाडीत राहणारा असल्याचं त्यानं सांगितलं … चोरवणे गावाला बहुतेक पाच सहा वाडया असाव्यात. छान बोलत होते ते. म्हणजे ग्रामीण वेषाच्या मानाने नक्कीच बोलणं वेगळं होतं. आमच्यातला एक जण रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी सॅक उघडून तयारी करायला लागला होता. ते बघून ते गृहस्थ म्हणाले …. अरे तुम्ही जेवण करू नका …. आमच्या घरी जेवायला या …. माझं नाव उतेकर …. रात्री साडेसात वाजता मी तुम्हाला न्यायला येईन … आम्हाला हो नाही हे विचारलंच नाही …. आणि मग निघून गेले. आम्ही विचार केला की बरंच झालं … आपल्याला करायला नको … आपण त्यांना पैसे देऊ … त्यांनाही मदत होईल.
बरोबर साडेसात वाजता मोठी बॅटरी घेऊन आले. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. घर बघून आम्ही आश्चर्यचकित झालो. चांगलं मोठं … चौसोपी होतं. अंगणात गरम पाणी ठेवलं होतं. हातपाय धुवायला. टॉवेल घेऊन एक मुलगा बाजूला उभा होता. ओसरीवर सुंदर बैठक होती. खुर्च्या सेन्टर टेबल याची देखील अद्ययावत व्यवस्था होती. भिंतीवर सैन्याचा पेहेराव घातलेला … मोठया रुबाबदार सैन्याधिकाऱ्याचा मोठा फोटो होता. उतेकर आणि त्यांच्या अर्धांगीने आमचं स्वागत मोठया प्रेमाने केलं. आम्ही सगळे त्या फोटोकडे बघत होतो…. उतेकर म्हणाले माझा फोटो आहे तो … मी सैन्यातून सुभेदार मेजर म्हणून रिटायर्ड झालो …. दोन्ही महायुद्ध मी खेळलो आणि बरीच नोकरी परदेशात झाली. माझ्या बायकोने मी नोकरीत असताना कधी चहाचा कप देखील विसळला नाही … घरी कायम ऑर्डर्ली असायचे … आम्ही अनेकांचा खूप पाहुणचार घेतलाय … आणि आता इथे निवांतपणे राहातोय .. शहरातून तुमच्यासारखे असे कोणी पाहुणे आले की आम्ही संधी घेतो … थोडासा पाहुणचार करण्यासाठी …. आम्ही अवाक झालो होतो … खूप सुंदर जेवण होतं … कसले पैसे देतोय … उतेकरांनी सकाळी सुटणाऱ्या मुंबई एसटीमध्ये आमच्या जागांची देखील व्यवस्था करून ठेवली होती. जेवण झाल्यावर आम्ही परत जायच्या हालचाली करायला लागल्यावर ते म्हणाले .. अरे … बिलकुल तिथे जाण्याची गरज नाही … आज एवढं चालला आहात … उदया परत मोठा प्रवास आहे …. इथेच झोपण्याची देखील व्यवस्था केल्येय … अतिशय आरामशीर असे बिछाने कोणीतरी येऊन घातले … सकाळी सुंदर न्याहारी करून आम्ही बसने मुंबईला निघालो. आज एवढी वर्ष झाली … पण सुभेदार मेजर उतेकर डोळ्यांसमोर आहेत … कोकणातल्या खेड जवळचं ‘चोरवणे’ आणि त्यातली उतेकर वाडी मनात एक सुंदर स्थान ठेवून आहे …. प्रवासाचं देणं किती विलक्षण असतं …. आपल्या कल्पनेपलीकडे … खूप समृद्ध करत असतो प्रवास आपल्याला … !
(त्यावेळी मी फोटोग्राफी करत नसल्याने त्या या अविस्मरणीय ट्रेकचा एकही फोटो माझ्याकडे नाही …)
– प्रकाश पिटकर
— प्रकाश पिटकर
Image © Prakash Pitkar….
Leave a Reply