(१) “धरम” या पंकज कपूर अभिनित सर्वांगसुंदर चित्रपटात एक प्रायश्चित्त आहे- आपल्या इच्छेविरुद्ध एका अनाथ बालकाला पत्नीने घरी आणणे हे पंकजला आवडलेले नसते. पंकज स्वतः काशीतील कर्मठ आणि समाजातील महिमामंडित ब्राह्मण आहे. कालौघात पंकज त्या लडिवाळ बाळावर जीव जडावून बसतो. पण अपघाताने त्या बालकाचा “धर्म ” कळल्यावर पंकज अत्यंत कर्तव्यकठोर प्रायश्चित्त घेतो. त्याची झळ कुटुंबीयांपर्यंत पोहोचते. पत्नी आणि मुलेबाळे नव्हे तर आपणही त्या कृत्याने थरारतो. शुचिर्भूत होऊन, शास्त्रातील विधी पार पाडून पंकज जीवनात परततो.
(२) “बंदीश बॅन्डीट” या वेबसीरीजमध्ये गुरु नसिरुद्दीन शाह आपल्या नातवाला गंडाबंधनाच्यावेळी उशीर झाल्यामुळे संतापून निघून जातात. नातू प्रायश्चित्ताला तयार होतो आणि त्याची खरी अग्निपरीक्षा सुरु होते. नातू परीक्षेला खरा उतरतो. नातवाबरोबर गुरु आणि कुटुंबीय संपूर्ण काळ त्यात भरडले जातात.अतिशय प्रदीर्घ वेळ टिपलेले हे हृदयंगम चित्र तितकेच थरारक आहे.
(३) “दी कश्मीर फाईल्स” च्या बांधवांप्रती आपण असेच कठोर प्रायश्चित्त घ्यायला नको कां? इतके दिवस हे “कांड ” आम्हांला माहीतच नव्हते,अशी साळसूद आणि सोयीस्कर भूमिका आपल्याला कशी घेता येईल? इतकी वर्षे त्यांचे जीवन “सत्य” आपल्या पर्यंत या ना त्या मार्गाने झिरपत होतंच. नंदनवनाचे स्मशान झालंय हे तर तिथे जाऊन येणारे पर्यटकही सांगत होते.त्यांचे “निवारे ” (कॅम्पस) जाता-येता नजरेस पडत होते. फार तर असे म्हणता येईल की त्या होरपळीची “धग” आता आपल्यापर्यंत पोहोचविण्यात हा चित्रपट यशस्वी झाला.
जोपर्यंत अपराध /गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो नसतोच असे वकिली भाषेत मानले जाते. आम्ही तो केलाच नाही, असंही अर्धकच्च विधान एखादा करेल. ज्यांनी प्रत्यक्ष तो गुन्हा /अपराध केलाय त्यांचे जे व्हायचे असेल ते होईल. त्यांना शिक्षा होईल. पण आपण “मूक साक्षीभावाने ” तो होऊ दिला, त्याला प्राणपणाने प्रतिकार केला नाही म्हणजे आपला त्यातील सहभाग कमी होत नाही. तेव्हा आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू.
जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !
मला खात्री आहे – ते मोठ्या मनाने नक्कीच माफ करतील आपल्याला !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply