मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी.
१) सिंटेक्ससारख्या प्लॅस्टिकच्या टाक्या वजनाने हलक्या असतात. त्या १००० ते ५००० लिटर क्षमतेच्या असतात. इमारतीच्या रोजच्या गरजेप्रमाणे दोन किंवा अधिक टाक्या बसवून त्या एकमेकाला जोडता येतात. या टाक्यांच्या खाली संपूर्ण सपाट आधार असावा लागतो. नाहीतर त्या फुटू शकतात किंवा तळाला भोके पडण्याची शक्यता असते. त्यासाठी लोखंडी बीमच्या सांगाड्यावर पोलादी प्लेट घालून त्यावर टाक्या ठेवाव्यात.
२) पूर्वी लोखंडी टाक्या वापरत. आता त्या कालबाह्य झाल्या आहेत. लोखंडी टाक्या गंज पकडतात म्हणून त्यांना आतून-बाहेरून दर दोन तीन वर्षांनी रंग द्यावा लागतो. रेड ऑक्साइड आणि एनॅमल रंग वापरल्यास पाच वर्षांनी एकदा रंग दिला तरी चालतो.
३) एक ते दोन हजार लिटरसाठी एकेकाळी अॅसबेस्टॉस सिमेंटच्या टाक्या वापरत. पण एकूणच ॲसबेस्टॉसचे सुरक्षेच्या कारणाने उत्पादन बंद झाल्याने या टाक्या आता कालबाह्य झाल्या.
४) लोखंड, अॅसबेस्टॉसच्या टाक्या गेल्यावर सलोह सिमेंट काँक्रीटच्या टाक्यांचा जमाना आला. त्या १० ते ५० हजार लिटर क्षमतेसाठीही बांधता येतात. त्याचे आरसीसी डिझाईन योग्य व काळजीपूर्वक करावे लागते. त्याचे काँक्रीट उच्च ताकदीचे, छिद्र व भेगारहित असावे. लोखंडी सळ्या पुरेशा प्रमाणात वापराव्यात. आतून वॉटरप्रूफ प्लॅस्टर करावे. टाकीवर आरसीसी स्लॅब व आत जाण्यासाठी गोल तोंड ठेवून त्यावर झाकण करावे. टाकी बांधून झाल्यावर पाणी भरून ती गळत तर नाहीना याचे ४८ तास निरीक्षण करावे. कोठेही गळती दिसली तर इंजेक्शन ग्राऊटिंग पद्धतीने ती थांबवावी. दर चार- पाच वर्षांनी असा गळतीसाठी तपासणी करणे आवश्यक असते. खास गंजप्रतिबंधक सळ्या वापरल्यास टाकीला दीर्घायुष्य लाभू शकते. कोणत्याही टाकीच्या बाबतीत दर ५-६ महिन्यांनी ती एकदा आतून साफ करून घेतली पाहिजे. त्यावेळी पडझडीसाठीही तपासणी करावी.
Leave a Reply