सलोह काँक्रीटच्या बांधकामाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी लागते.
१) ज्या पोलादी सळ्या बांधकामात वापरल्या जाणार, त्या मान्यताप्राप्त कारखान्यातून योग्य त्या प्रमाणपत्रासह आल्या का ते पाहावे.
२) आलेल्या सळ्यांची डोळ्याने पाहणी करून त्या गंजलेल्या, पिचलेल्या किंवा अति वाकलेल्या नाहीत ना हे पाहावे.
३) सळ्यांचे व्यास मागणीप्रमाणे आहेतका ते पाहावे.
४) त्यातील काही सळ्यांचे ३० ते ६० सें.मी. लांबीचे तुकडे कापून त्यांची प्रयोगशाळेत ताण क्षमता, वाकण्याची क्षमता, स्थिती स्थापकत्वाचे गुणधर्म, प्रसरण-आकुंचन क्षमता व प्रमाण, रासायनिक घटक व गुणधर्म तपासून ते प्रमाण गुणधर्माप्रमाणे आहेत का ते पाहावे.
५) खांब, तुळया, स्लॅब इत्यादींसाठी अभियांत्रिकी आराखड्याप्रमाणे सळ्यांची लांबी, आकार, वक्रता मिळण्यासाठी फिटरकडून त्या बनवून घेणे व तशी लेबले लावून त्यांना क्रमांक देणे.
६) सळ्या आकाराप्रमाणे तारेने बांधून घेऊन त्या त्या भागाचे सांगाडे करून इमारतीचे काँक्रीट करण्यापूर्वी पायापासून टप्प्याटप्प्याप्रमाणे आराखड्याप्रमाणे त्याची बांधणी करावी.
७) काँक्रीट ओतण्यासाठी लाकडाचे किंवा लोखंडी पत्र्याचे साचे बनविलेले असतात. सळ्या व साच्याच्या आतील पृष्ठभाग यात १.५ ते २.५ सें.मी. एवढी फट ठेवल्याची खात्री करून घ्यावी.
८) काँक्रीट ओतताना व खाचताना सळ्यांचा सांगाडा योग्य जागेत न हालता राहील याची काळजी घ्यावी.
९) बांधकाम करताना वापरले जाणारे काँक्रीट योग्य क्षमतेचे आहे की नाही याच्या चाचण्या प्रयोगशाळेत घ्याव्यात.
१०) आराखड्याप्रमाणे व्यास, परिमाणांसह सलोह काँक्रीट होत आहे की नाही हे बघणे पर्यवेक्षकावर बंधनकारक असते. सलोह काँक्रीट हे नुसत्या काँक्रीटपेक्षा अनेकपटीने मजबूत असते. प्रचंड वादळे, भूकंप यांना तोंड देऊ शकते. त्याचा वापर +५० ते -४० अंश सेल्सियस या तापमानात करता येतो. मात्र खांब, तुळया, स्लॅब याला तडे जाऊन सळ्या उघड्या पडल्यावर त्या गंजतात. त्यामुळे अशा वेळी फटी मोठ्या करून त्यावर रसायनाचा लेप देऊन त्या परत काँक्रीटने बंद कराव्यात.
Leave a Reply