औषधाचे गुणधर्म जपून ती टिकावू व्हावीत, त्यांचा शरीरात योग्य ठिकाणी परिणाम व्हावा व ती सुलभतेने घेताही यावीत यासाठी औषधे वेगवेगळ्या रुपात बनविली जातात. व (पातळ) औषधे, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, त्वचेवर लावायची औषधे, हुंगायची औषधे, अशी बहुरुपी औषधे आज आपण वापरतो. यातील बहुतांशी औषधे ही शरीरांतर्गत जाऊन रक्तात शोषली जातात व ईप्सित स्थळी (टारगेट ऑर्गन) जाऊन परिणाम करतात. औषधे गुणकारी होण्यासाठी त्यांची रक्तातील पातळी योग्य तेवढी नियमितपणे राहणे आवश्यक असते व म्हणूनच औषधांची योग्य मात्रा (डोस) व ठरावीक वेळेला घेणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या चिठ्ठीत जर १-१-१ असे असल्यास ती औषधे दिवसातून तीन वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळी घ्यावयाचे असते. याच नियमाने १-०-० म्हणजे फक्त सकाळी, ०-०-१ म्हणजे फक्त संध्याकाळी/ रात्री असा अर्थ होतो. जर डोस कमी/ जास्त घेतला वा वेळा चुकल्या तर ही रक्तातील पातळी अनियमित होऊन औषध निष्प्रभ तरी ठरते किंवा त्याचे दुष्परिणाम तरी होतात. औषधे रिकाम्या पोटी वा भरल्यापोटी घ्यावीत याचेही शास्त्र आहे व दर वेळी औषधे घेताना ही बाब डॉक्टर/ फार्मासिस्टला विचारणे हितावह होईल.
औषध घेण्याची वेळ ठरावीक ठेवावी व शक्यतो ती चुकवू नये. अगदीच विस्मरण झाल्यास वा इतर काही कारणाने गोळी घ्यायची राहिल्यास जेव्हा आठवेल तेव्हा लगेच घ्यावे; पण पुढच्या डोसची वेळ जवळ आली असल्यास घेऊ नये व आधीचा डोस चुकला म्हणून नंतरच्या डोसला कधीही डबल डोस घेऊ नये. औषधाचा डोस व वेळ पाळणे जरुरीचे आहे, तसेच ते पूर्ण कालावधीसाठी घेणेही जरुरीचे आहे. पण बऱ्याचदा रुग्ण जरा बरे वाटू औषध घेणे लागल्यावर थांबवतात. तात्पुरते बरे वाटते खरे, मात्र अशा अर्धवट औषधोपचारांनी पुढे जाऊन आजार जास्त तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आजाराचे निदान झाल्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधांचा डोस, वेळा व कालावधी पाळला तरच त्याचा गुण येतो.
-डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply