प्रीत जडली आहो तुम्हावर,कधी येणार घरी।।
सांज झाली सख्या साजना,धडधड वाढली उरी।।धृ।।
शृंगार केला तुमासाठी,
माळला मोगरा सुगंधी ।।
नाकात चमके नथनी, विडा रंगला मुखामंदी।।
पैठणी नेसे येवल्याची,
पदरी मोर जरतारी।।
सांज झाली सख्या साजना,
धडधड वाढली उरी
।।१।।
ठसक्यावरी हा ठसका,
याद केली का राया तुमी।।
उशीर काव करतासा, धनी वाट पाहतो आमी।।
अधीर झाली भेटण्यासी,
जशी राधा यमुने तीरी।।
सांज झाली सख्या सजना,
धडधड वाढली उरी
।।२।।
शयन मंदिरी बसले,
मनात आपण ठसले।।
कोमेजून जाईल काया,
प्रीतीत संकोच कसले।।
कवेत घेऊनी टाका हो, मदनबाण मजवरी।।
सांज झाली सख्या सजना,धडधड वाढली उरी।।३।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply