रिमझिम पाऊस आला
सृष्टी रोमांचित झाली
प्रेमाच्या वर्षावात
दोघं होती नहाली
थोडावेळ एकाच छत्रीत
दोघं होती चालली
स्पर्शाला टाळत नंतर
आडोशाला स्थिरावली
मी हलकेच नजर
तिच्याकडे वळवली
ओल्या गालावरून
लाज होती घसरली
सोसाट्याचा वारा तरी
ती नाही घाबरली
नकळत थोडीशी
माझ्या बाजूला सरकली
थंड वाऱ्याच्या स्पर्शाने
जरी ती शहारली
संयमाला टेकून
हलकेच कुडकुडली
मध्येच विज कडाडली
ती नाही बिचकली
थोडीशी हलली अन्
कोवळ्या लाजेला बिलगली
मी हलकेच मनाने
तिला माझ्याजवळ ओढली
माझी चलबिचल बघून
ती नाजुक होती हसली
कळल नव्हतं दोघांना
ओढ ही कसली
पण प्रितीला प्रितीची
नव्याने ओळख पटली
- डॉ.सुभाष कटकदौंड