नवीन लेखन...

प्रेम पुरेसं की तडजोड आणि विश्वास हवा ????

काय वाटतं तुम्हाला ? आधी विश्वास हवा, की प्रेम पुरेसं होतं ? की तडजोडीशिवाय पर्याय नसतो ? प्रश्न कळला नाही ना ? अहो म्हणजे संसार सुखाचा होण्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम पुरेसं असतं, की तडजोडीची साथ आणि विश्वासाचा हात लागतोच ? असं विचारायचं होतं मला.

म्हणजे लग्न होण्यापूर्वी, मग तो प्रेमविवाह असो किंवा कांदेपोहे सहित पहाण्याचा कार्यक्रम करून( हल्ली हा शक्यतो होतच नाही म्हणा) केलेला विवाह असो, सगळंच गोड गोड असतं. तो टीपिकल नवऱ्यासारखा वागत नसतो आणि ती बायकोसारखी. कोणत्याही जबाबदाऱ्या, अपेक्षा, माझं तुझं असं काही काहीच नसतं. फक्त एकमेकांच्या प्रेमात दोघं आकंठ बुडालेली असतात. तिने काही सांगितल्यावर तो म्हणतो,

“तू म्हणशील तसं”…
त्याने काही मागितलं तर ती म्हणते,
“मी सर्वस्वी तुझीच…”
थोडक्यात काय? तर इगो या भावनेचा उदय दोघांमध्येही झालेला नसतो.
“तू माझ्या आयुष्यात आलीस, मी किती भाग्यवान आहे.”
किंवा,
“तू मला लाभलास हे खरंच माझं भाग्य…”
अशा प्रकारच्या वाक्यांची उधळण दोघंही एकमेकांवर करत असतात. आता ही वाक्य प्रत्येकवेळी असमंजसपणे म्हटली जातात असं मी मुळीच म्हणणार नाही. आपल्याला समजून घेणारा जोडीदार किंवा जोडीदारीण मिळालीय या घट्ट समजुतीचा शब्दातून व्यक्त होणारा तो परिपाक असतो. घरची मंडळीही खुश असतात, चांगला जावई मिळाला आणि गुणाची सून मिळाली म्हणून.

लग्न होतं, हनिमून आटोपतं आणि सामान्य आयुष्य सुरु होतं. त्याचं ऑफिस, नोकरी करणारी असेल तर तिचंही ऑफिस सुरू होतं, आपापल्या करिअरमध्ये दोघं बुडून जातात.

ही सुरवात खरंच खूप छान, आनंददायी, अगदी दृष्ट लागण्यासारखी असते. आता हे प्रेम लग्नानंतर, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक निर्णयात तुमच्यासोबत असतं, असं आपण थोडा वेळ गृहीत धरलं, तर मग प्रत्येक संसार सुखाचा का होत नाहीं ??? संसार यशस्वी व्हायला प्रेम पुरेसं होत नाही का ???? याचं उत्तर मी तरी नाही असच देईन. कारण या प्रेमासोबत तडजोड या कृतीचा प्रवेश झालेला नसेल किंवा होत नसेल तर तो संसार यशस्वी होत नाही. दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कितीही उतू जात असलं तरीही प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार सुरू झाला की प्रियकराचं रुपांतर पती मध्ये होतं तर प्रेयसीचं पत्नीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतं ?? तर लग्नापूर्वी, आपण आधी म्हटल्याप्रमाणे अपेक्षा, जबाबदाऱ्या, वादविवाद, माझं तुझं हे काहीच अस्तित्वात नसतं. या सगळ्यांचा प्रवेश लग्नानंतर होतो.
सुरवातीला,

“ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं करू”. किंवा
“ते मी बघते सगळं, तुला उशीर होईल.” किंवा
“तुला उशीर झाला म्हणून मी लावला कुकर.”
“Ok ! एव्हढं काय त्यामध्ये !”
कालांतराने,
“अगं , पण माझंही जरा ऐकून घे ना.”
“मला अजिबात वेळ नाहीय सांगते.”
“चहा नाही घेतलाय अजून, कुकर काय लावणार ?”
“म्हणजे ??माझ्या बोलण्याला अर्थच नाही का?”
असा बदल होऊ लागतो. म्हणजे,
“मी कधी असं म्हटलं होतं ?”
यावर कधी, कुठे याचे पुरावे देत राहायचं, मग त्यासाठी एकमेकांचं बोलणं लक्षात ठेवायचं. वेळेला एकमेकांवर त्याचा प्रहार करायचा. अगदी सगळंच बिघडून जातं मग. संसाराचं रुपांतर कोर्टरूम मध्ये होऊ लागतं.

आता तडजोड या शब्दाचा विचार केला तर अनेक घरात दोघांपैकी कुणी एक अगदी शेवटपर्यंत करत असतं.एक दिवस संयम संपतो आणि संसार उध्वस्त होतो किंवा तडजोड करत रहाणाऱ्या व्यक्तीचा शेवट होतो. कारण मन, शरीर, भावना मारून किती काळ तडजोड करणार? इथेही प्रेम अस्तित्वात नसतं असं मी म्हणणार नाही. पण त्यासोबत एकमेकांना समजून घेण्याची, तडजोड करण्याची वृत्ती गैरहजर असते. मला तडजोड म्हणायचंय ती दोघांनीही करायला हवी असणारी. उभयतांनी एकमेकांना जाणून घेऊन, एकमेकांचे स्वभाव, दोघांमधल्या सकारात्मक, नकारात्मक गोष्टी, एकमेकांची कामाची , व्यक्त होण्याची पद्धत, आवडी निवडी, दोघांच्या आनंदाच्या व्याख्या, घरातले इतर कुटुंबीय, एका संपूर्ण वेगळ्या वातावरणामधून आपल्या घरात आलेल्या आपल्या पत्नीची वैचारिक पद्धत या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्या संसाराची दिशा आखायला हवी. आणि घरातल्या सगळ्यांनी त्याला साथ द्यायला हवी.

“हे मला पटत नाही, मी अजिबात करणार नाही…” किंवा
“ते माझ्या विचारात बसत नाही, मला नाही जमणार…”

असं घरातली प्रत्येक व्यक्ती म्हणू लागली तर संसार चालायचा कसा ? आपल्या तत्वांवर ठाम राहून प्रत्येक गोष्टीतून, मग ती आपल्याला तितकीशी पटत नसली तरीही थोडी तडजोड करून पुढे जाणं महत्त्वाचं असतं.

“माझंचं बरोबर आहे, मी म्हणतो/म्हणते तस्संच” ही तत्व नाही तर हा इगो झाला. तत्व अबाधित राखून त्यातून मार्ग काढता येतो, इगो मात्र मार्ग रोखून धरतो. त्याच्यापुढे सगळे मार्ग खुंटतात. आता वादविवाद हे होणारच, आणि कुटुंब healthy असल्याचं ते एक प्रतीक असतं. पण वादविवादातून तडजोडीसह एका निष्कर्षाला येणं हे महत्वाचं असतं. वाद घालताना आपण फक्त आपल्याच तोंडाला महत्त्व दिलं आणि कान झाकून घेतले, तर मात्र त्यामधून काहीही साध्य होत नाही. प्रश्न तसाच रहातो. समोरचा/समोरची व्यक्ती काय म्हणतेय हे स्वच्छ मनाने ऐकणं आणि जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

ते न करता, आपल्याला घाई असते ती आपला मुद्दा मांडण्याची. त्याने होतं काय ? प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने आपले मुद्दे फक्त मांडतो बस्स. आपण चांगला श्रोता होणं (good listner) खरंच गरजेचं असतं. तडजोड करताना कुणीतरी थोडं मागे येण्याची गरज असते , आणि इगो बाजूला ठेवून, आपण मागे आल्यामुळे काही फार मोठं नुकसान होणार आहे का ? की प्रश्न मार्गी लागणार आहे याचा विचार मनापासून केला, तर मागे जाणं खूप सोप्प होतं. प्रत्येक व्यक्ती जेव्हा सर्वसमावेशक विचार करते तेव्हाच त्यातून सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं समोर येतं. तडजोड म्हणजे काय ? तर आपल्या जोडीदाराला, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला, त्याच्या भूमिकेत शिरून समजून घेणं, इतकंच नाही तर त्यानुसार आपल्या वागण्यात शक्य होईल तेव्हढा बदल करणं किंवा त्याच्या/तिच्या भूमिकेशी जुळवून घेणं. याउलट होतं काय? की तो किंवा ती अशी वागतेय ना, मग मी सुद्धा तसाच/तशीच वागणार, मग भले ते चुकीचं असलं तरी चालेल. हा विचारच चुकीचा आहे. चुकणाऱ्या व्यक्तीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यापेक्षा, जास्तीत जास्त संयम ठेवून ती व्यक्ती अचानक अशी का वागतेय यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणं, न दुखावता त्या व्यक्तीला तिचं वागणं चुकतंय हे लक्षात आणून देणं आणि पाणी पुन्हा वहातं करणं ही आपल्या व्यक्तीसाठी केलेली तडजोडच आहे. ‘तड’ काफडकी न तोडता नाती कायम ‘जोड’त रहाणं म्हणजे तडजोड.

अगदी इतिहासकाळात आपण डोकावलो तर लक्षात येतं,. त्या काळी रजपूत राजे युद्धात प्राणपणाने शत्रूवर तुटून पडत असत. ते लढवैय्ये होतेच पण त्यासोबत, आज आपण जी तडजोड म्हणतोय , अर्थात थोडी माघार घेणं हे त्यांना कधीच पटणारं नव्हतं, ते त्यांच्या तत्वातच बसत नव्हतं. याउलट शिवाजीमहाराजांनी अनेक लढायांमध्ये विचारपूर्वक यशस्वी माघार घेऊन, नाहक होणारी जीवितहानी टाळली, आणि काही काळानंतर जोमाने चाल करून शत्रूला नामोहरम केलं. माघार घेणं यामध्ये कमीपणा काहीच नाही.

एखाद्या मुद्द्याविषयी , प्रश्नाविषयी घरातल्या प्रत्येकाला काय वाटतं हे सुद्धा जाणून घ्यायला हवं. आपल्या आवडी निवडी, आपला आनंद, आपली कर्तव्य, आपले अधिकार यांना एका ठराविक कक्षेत ठेवून, त्यांचा गुंता होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. तडजोडीसाठी मुळात मनाची कवाडं उघडी आणि स्वच्छ असायला हवी. एकदुसऱ्याला समजून घेण्याची तयारी हवी. हे घर, हे कुटुंब, हा संसार माझा आहे, आपला आहे आणि तो सुखात ठेवणं हे माझं कर्तव्य आहे, ही जाणीव प्रत्येकामध्ये जागी व्हायला हवी.

आता प्रेम आणि तडजोड याच्या आगेमागे आणखी एक गोष्ट येते, ती विश्वास. प्रेम काही कारणाने कमी होऊ लागलं की त्याची जागा अविश्वास घेऊ लागतो. कुटुंबात एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं असतं. मी तर म्हणेन, एक वेळ प्रेम अंमळ कमी असलं तरी चालेल पण विश्वासाने कुटुंब बांधलेलं असायला हवं. दोघांच्या नात्यात विश्वास असणं अत्यंत गरजेचं असतं. विश्वास विश्वास म्हणजे तरी काय ?आपल्या जोडीदाराने किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवर डोळे झाकून नाही, परंतु मनापासून विश्वास ठेवायला हवा. एखादी गोष्ट नाही पटली तर आडून न विचारता, मोकळ्या मनाने आपल्या जोडीदाराला न दुखावता त्याचा खुलासा करून घ्यायला हवा. आणि नात्यातली ही पारदर्शकता नवरा बायको तसच घरातल्या प्रत्येकाने सांभाळायला हवी. आपल्या मुलांसमक्ष आईवडील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले, तर मुलांनाही त्याची सवय होऊ शकते.

अविश्वासातून समोरच्या व्यक्तीला डीवचण्याची (irritate) एक सवय अस्तित्वात येते. सततच्या त्याच उलटसुलट प्रश्नांनी, उलट तपासणीनी येणारा कंटाळा वाढीला लागतो. यामधूनच मी सांगतोय/सांगतेय ते जर खोटंच वाटत असेल, तर मी खरं कशाला बोलू ? या भावनेतून खोटेपणाचा उदय होतो. प्रत्येक गोष्टीकडे, तिरकस दृष्टीने पहाण्याची सवय लागते, आणि साधी,सरळ, स्वच्छ गोष्ट गुंतागुंतीची होऊन बसते. तथ्य काहीच नसतं, परंतु अविश्वासाच भूत मानगुटीवर बसलं की सगळंच संपतं.

काही वर्षांपूर्वी ‘ जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका प्रसारित झाली होती. सगळ्या बाजूंनी दर्जेदार असलेल्या या मालिकेमध्ये एकत्र कुटुंब आणि कुटुंबातल्या व्यक्तींचे एकमेकातले नातेसंबंध हा विषय फार चांगल्या प्रकारे हाताळला होता. यातल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार करण्याचे विविध कंगोरे , भाव भावना दाखवून दिल्या होत्या. परंतु अखेर वाईट कुणीच नसतं, तर ती त्यावेळी उमटलेली प्रतिक्रिया असते. म्हणून शेवटी नाती विसरायची नसतात, हा धडा या मालिकेतून फार सुंदर प्रकारे दाखवून दिला होता. चित्रपट, नाटक , मालिका हे समाजमनाचे आरसे असतात असं म्हणतात. आजकाल हे फार अभावानेच घडताना दिसतं म्हणा.

माझ्या मते विश्वासातूनच प्रेम वाढीला लागत असतं. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची आपलीच दृष्टी बरोबर आहे, हा हेका मला वाटतं असू नये. कारण विचार हा प्रत्येक व्यक्ती करत असते. फक्त प्रत्येकाची ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची पद्धत वेगळी असू शकते. अनेकदा अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीना फुंकर मारून त्याची धग करण्याची आणि स्वतःसकट संपूर्ण घराला त्यामध्ये होरपळवून टाकण्याची सवय अनेकांना असते. मुळात तिथे काहीच नसतं, तर बदललेली असते ती आपली नजर आणि त्यातला विश्वास. अविश्वासाच्या भावनेतून त्या क्षुल्लक गोष्टीला आपण प्रचंड मोठ्ठं करून ठेवलेलं असतं. आपली नजर एकदा गढूळ झाली, की सारासार विवेकबुद्धी लयाला जाते, आणि उरतो फक्त अविश्वास.

म्हणून म्हणतो प्रेम – विश्वास – आणि तडजोड या तिघांनी हातात हात मिळवले तर प्रत्येक संसार सुखाचा होईल…..
काय वाटतं तुम्हाला ???

प्रासादिक म्हणे

– प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..